ठळक मुद्दे२०१९ पर्यंत महाराष्ट्रातील सिंचन दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भाचे नशीब बदलवणारा गोसेखुर्द प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. इतकेच नव्हे तर गोसेखुर्दसह बावनथडी, खडकपूर्णा, डोंगरगाव, निम्न वर्धा, बेंबळा आणि निम्न पेढी प्रकल्प हे विदर्भातील सातही प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. ३० हजार कोटी रुपयांच्या योजनेचे हे प्रकल्प असून यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास विदर्भातील १० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी आणि जलसंपदा मंत्री व अ‍ॅग्रो व्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला.
गडकरी पुढे म्हणाले, राज्यात फडणवीस सरकारने अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. यातही जलयुक्त शिवार हे सर्वोत्कृष्ट असे काम आहे. सिंचनाच्या क्षेत्रात सरकार आणखी काम करीत आहे. केवळ विदर्भच नव्हे तर मराठवाडा व संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी महाराष्ट्रातील ३८५ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. २५ हजार कोटी रुपयांचा दमणगंगा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यात या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. यासोबतच आणखीही काही प्रकल्प आहेत. आत्महत्यग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांच्या विकासासाठी १० हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. उघडे कॅनलऐवजी आता पाईपद्वारे पाणी पोहोचवण्यास सुरुवात झाली असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील सिंचनाचे क्षेत्र २१ टक्के असून २०१९ पर्यंत दुप्पट वाढवून ४२ टक्केपर्यंत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपुरात मदर डेअरी सुरू केली. सध्या १ लाख ३० हजार लिटर दूध संकलित केले जात आहे. ज्या दिवशी २५ लाख लिटर दूध संकलित केले जाईल, त्यादिवशी शेतकºयांना आत्महत्या करावी लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विदर्भातही ऊस होऊ शकतो, हे आम्ही करून दाखविल्याचेही ते म्हणाले. रोजगारासाठी लोक शहरात येण्याऐवजी शहरातून लोक रोजगारासाठी गावांमध्ये जावे, हे आपले स्वप्न असल्याचेही गडकरी म्हणाले.