समाजाची नि:स्वार्थ सेवा करणारे इतिहास घडवितात : सत्यपाल सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:44 PM2017-12-30T23:44:48+5:302017-12-30T23:46:34+5:30

जे लोक नि:स्वार्थ भावनेतून समाजाची व राष्ट्राची सेवा करतात तेच इतिहास घडवितात. समाजातही अशाच लोकांचा सन्मान होतो व ते चिरंतन आठवणीत राहतात, अशी भावना केंद्रीय मानव संसाधन व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले. मैत्री गौरव पुरस्कार वितरण समारोहाच्या वेळी ते बोलत होते.

Selfless service of the society creates history : Satyapal Singh | समाजाची नि:स्वार्थ सेवा करणारे इतिहास घडवितात : सत्यपाल सिंह

समाजाची नि:स्वार्थ सेवा करणारे इतिहास घडवितात : सत्यपाल सिंह

googlenewsNext
ठळक मुद्देमैत्री गौरव पुरस्कारांचे थाटात वितरण

आॅनलाईन लोकमत
नागपूर : ईश्वराने प्रत्येकाला एक विशेष उद्देश ठेवून जन्म दिला आहे. जी व्यक्ती कुटुंबाचे, समाजाचे आणि राष्ट्राचे कल्याण करू शकत नाही त्याने जन्म व्यर्थ गेला असे समजावे. जे लोक नि:स्वार्थ भावनेतून समाजाची व राष्ट्राची सेवा करतात तेच इतिहास घडवितात. समाजातही अशाच लोकांचा सन्मान होतो व ते चिरंतन आठवणीत राहतात, अशी भावना केंद्रीय मानव संसाधन व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले. मैत्री गौरव पुरस्कार वितरण समारोहाच्या वेळी ते बोलत होते.
मैत्री परिवाराच्यावतीने शनिवारी अंध विद्यालयाच्या मुंडले सभागृहात भव्य समारोहात मैत्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दिव्यांग असूनही उद्योगाच्या क्षेत्रात भरारी घेणारे उद्योजक जयसिंह चौहान यांना मानाच्या मैत्री गौरव पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. २१ हजार रुपयाचा धनादेश, मानपत्र, मानचिन्ह व पुस्तक असे पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, उपाध्यक्ष विजय शाहाकर, सचिव प्रमोद पेंडके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. सत्यपाल सिंह यांनी वेद मंत्राद्वारे मार्गदर्शनास सुरुवात करीत आध्यात्मिक बोध घडवून दिला. आज समाजात गुंड व बदमाश प्रवृत्तीच्या लोकांचा नाही तर चांगल्या लोकांचा सन्मान करण्याची गरज आहे. लोकांनीही अशा लोकांच्या सोबत ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. कुप्रवृत्तीच्या लोकांचा सन्मान केल्यास राष्ट्रावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. भीतीमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर अशा सेवाभावी लोकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी मैत्री परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले. व्यक्तींनी समाजाला काही देणे शिकले पाहिजे. नि:स्वार्थ दान आणि चांगल्या लोकांच्या बाजूने उभे राहा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय भेंडे यांनी केले. संचालन माधुरी यावलकर यांनी केले. प्रमोद पेंडके यांनी आभार मानले.
यांचाही मैत्री गौरव पुरस्काराने सन्मान
जयसिंह चौहान यांच्यासह विविध क्षेत्रात सेवा देणाऱ्या आठ नामवंत व्यक्तींचा यावेळी मैत्री गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये अंध मुलांसाठी सेवा देणाऱ्या मायाताई ठोंबरे, गडचिरोली येथे सर्च संस्थेसोबत आदिवासींना सेवा देणारे डॉ. योगेश काळकोंडे, खराशी, जि. भंडारा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुबारक अली उमर अली सैयद, रायफल शुटर व प्रशिक्षक अनिल पांडे, पर्यावरण स्नेही व पक्षीमित्र कौस्तुभ पांढरीपांडे, ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर यांच्यासह नागपूर पोलिसांची भरोसा सेल व वाहतूक पोलिसांच्या ‘एफ-कॉप’ टीमला यावेळी सन्मानित करण्यात आले. भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक शुभदा संखे यांच्या नेतृत्वात संपूर्ण टीम आणि वाहतूक पोलिसांचे जयेश भांडारकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण टीमला यावेळी सन्मानित करण्यात आले.

सायकल नको, दिव्यांगांना सक्षम करा : चौहान
सत्काराला उत्तर देताना जयसिंह चौहान यांनी दिव्यांग लोकांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी सरकारकडे करीत त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. दिव्यांगांना विविध योजनाद्वारे ट्रायसिकल वाटपाचा कार्यक्रम केला जातो. मात्र त्यांना सायकली देण्यापेक्षा दिव्यांग सक्षम होतील यासाठी उद्योग स्थापण्यात मदत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भारतात सात कोटी दिव्यांगजन आहेत. त्यांना निराधार भत्ता आणि सायकली देण्यात पैसा खर्च करण्यात अर्थ नाही. आम्ही २६० प्रकारच्या लघुउद्योगांची यादी तयार केली आहे. शासनाने दिव्यांगांना हे लघुउद्योग करण्यासाठी मदत करावी. ते सक्षम झाल्यास तेही सरकारला कर देतील असा विश्वास त्यांनी दिला.

Web Title: Selfless service of the society creates history : Satyapal Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर