नागपूर जिल्ह्यातील  भिवापूर पंचायत समितीत भरली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:06 PM2018-07-18T23:06:51+5:302018-07-18T23:07:46+5:30

शाळेची पहिली घंटा २६ जून रोजी वाजली. मात्र तेव्हापासूनच नव्हे तर उन्हाळ्यात बंद झालेली शाळा आतापर्यंत उघडलीच नाही. हा प्रकार प्रकल्पग्रस्त गाव असलेल्या थुटाणबोरी येथील आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालकांनी प्रशासनाला साकडे घातले. परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही. परिणामी संतापलेल्या प्रकल्पग्रस्त पालकांनी बुधवारी (दि. १८) भिवापूर पंचायत समिती गाठत चक्क कार्यालयातच विद्यार्थ्यांची शाळा भरविली.

The school began in Bhivapur Panchayat Samiti of Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील  भिवापूर पंचायत समितीत भरली शाळा

नागपूर जिल्ह्यातील  भिवापूर पंचायत समितीत भरली शाळा

Next
ठळक मुद्देथुटाणबोरीचे विद्यार्थी संतप्त : कुलूपबंद शाळा उघडण्यासाठी प्रशासनाला घातले साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळेची पहिली घंटा २६ जून रोजी वाजली. मात्र तेव्हापासूनच नव्हे तर उन्हाळ्यात बंद झालेली शाळा आतापर्यंत उघडलीच नाही. हा प्रकार प्रकल्पग्रस्त गाव असलेल्या थुटाणबोरी येथील आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालकांनी प्रशासनाला साकडे घातले. परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही. परिणामी संतापलेल्या प्रकल्पग्रस्त पालकांनी बुधवारी (दि. १८) भिवापूर पंचायत समिती गाठत चक्क कार्यालयातच विद्यार्थ्यांची शाळा भरविली.
थुटाणबोरी हे गोसेखुर्द प्रकल्पातील बुडीत गाव आहे. या गावाचे पुनर्वसन कारगाव शिवारात प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु योग्य मोबदला मिळाला नसल्याने तसेच पुनर्वसन ठिकाणी असलेल्या समस्यांमुळे प्रकल्पग्रस्तांनी बुडीत गाव सोडण्यास नकार दिला आहे. बुडीत गावातील नागरिकांना गावाबाहेर काढण्यासाठी प्रशासनाने नानाविध क्लृप्त्य योजल्या. गावातील विद्युतपुरवठा खंडित करणे, रेशन पुरवठा थांबविणे यासोबतच इतरही सुविधा बंद केल्या. त्यामुळे काही प्रकल्पग्रस्त नागरिकांनी अखेर पुनर्वसनस्थळी मुक्काम हलविला. परंतु अनेक कुटुंब अद्यापही बुडीत गावातच आहे.
यावर्षी तर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार न करता शाळाच बंद करण्याचा विचार केलेला दिसतो. शैक्षणिक सत्र सुरू होऊन २२ दिवस झाले असले तरी अद्याप थुटाणबोरीतील शाळा अद्याप उघडलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन दिले, साकडे घातले. त्यानंतरही काहीच परिणाम न झाल्याने अखेर बुधवारी शालेय विद्यार्थी, अंगणवाडीतील चिमुकल्यांना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालय गाठले. त्या कार्यालयातच विद्यार्थ्यांची शाळा भरली. त्यात पहिली ते चौथीचे पाच विद्यार्थी, पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणारे आठ, अंगणवाडीतील १६ चिमुकल्यासंह त्यांचे पालक उपस्थित होते. परंतु वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही स्पष्ट भूमिका घेत नसल्याने पंचायत समितीच्या शिक्षण विभागही चूप आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता बैठकीत असून त्यानंतर चर्चा करतो, असे सांगितले.
शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार
प्रकल्पग्रस्त असलो म्हणून काय झाले, आम्हीही माणसंच आहोत. मात्र प्रशासन आमच्याशी दुजाभाव करीत आहे. आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे. प्रशासनाच्या या हेकेखोर धोरणामुळे वैनगंगेच्या खोऱ्यातील पिढी नेस्तनाबूत करण्याचेच काम केले जात आहे. मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे ‘पाप’ शासन आणि प्रशासन करीत आहे, हे खरेच दुर्दैवी आहे.
 डुबराज गुरुपुडे,
उपसरपंच, थुटाणबोरी.

बदली आॅनलाईन; शाळा आॅफलाईन
पुनर्वसित आणि बुडीत थुटाणबोरी या दोन्ही गावातील शाळा गतवर्षी सुरू होत्या. यावर्षी झालेल्या ‘आॅनलाईन’ बदल्यांमुळे बुडीत गावातील शाळा मात्र ‘आॅफलाईन’ झाली आहे. थुटाणबोरी शाळेत दिलीप जिभकाटे आणि अविनाश हाके हे दोन शिक्षक कार्यरत होते. यातील जिभकाटे हे पुनर्वसित शाळा तर हाके बुडीत गावातील शाळा सांभाळायचे. यावर्षी झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये थुटाणबोरी येथे नारदेलवार आणि फुलझेले हे दोन शिक्षक रुजू झाले. मात्र यापैकी एकही शिक्षक बुडीत गावातील शाळेत गेले नाही. शिवाय लांब अंतर, जंगलातून प्रवास आणि उखडलेल्या रस्त्यामुळे तेथे शिक्षकसुद्धा जाण्यास तयार नसल्याची माहिती आहे.

Web Title: The school began in Bhivapur Panchayat Samiti of Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.