नागपूर जिल्ह्यात सॅटेलाईट कॅन्सर केअर केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 08:35 PM2018-07-14T20:35:11+5:302018-07-14T20:49:41+5:30

जिल्ह्याच्या ठिकाणीच कॅन्सर रुग्णांचे निदान होण्यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या (एनसीआय) मदतीने जिल्ह्यात सॅटेलाईट कॅन्सर केअर केंद्र सुरू करणे, ‘एनसीआय’मध्ये आवश्यक उपकरण उपलब्ध करून देऊन पायाभूत सोयींचे श्रेणीवर्धन करणे आणि मनुष्यबळाला कॅन्सरविषयी प्रशिक्षण देण्याला घेऊन टाटा ट्रस्ट व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्यात शनिवारी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

The satellite cancer care center in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात सॅटेलाईट कॅन्सर केअर केंद्र

नागपूर जिल्ह्यात सॅटेलाईट कॅन्सर केअर केंद्र

Next
ठळक मुद्देटाटा ट्रस्ट आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसोबत करारविदर्भातील रुग्णांना मिळणार अद्यावत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्याच्या ठिकाणीच कॅन्सर रुग्णांचे निदान होण्यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या (एनसीआय) मदतीने जिल्ह्यात सॅटेलाईट कॅन्सर केअर केंद्र सुरू करणे, ‘एनसीआय’मध्ये आवश्यक उपकरण उपलब्ध करून देऊन पायाभूत सोयींचे श्रेणीवर्धन करणे आणि मनुष्यबळाला कॅन्सरविषयी प्रशिक्षण देण्याला घेऊन टाटा ट्रस्ट व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्यात शनिवारी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘एनसीआय’चे सरचिटणीस शैलेश जोगळेकर व टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. वेंकटरामनन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी सर रतन टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्टचे मुख्य वित्तीय अधिकारी आशिष देशपांडे, ‘एनसीआय’चे अध्यक्ष अ‍ॅड. सुनील मनोहर, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक (शैक्षणिक) कैलाश शर्मा, एनसीआयचे उपाध्यक्ष व माजी खासदार अजय संचेती, एनसीआयचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, टाटा ट्रस्टचे मुख्य लक्ष्मण सेतुरामन, डॉ. आनंद बंग व एनसीआयचे आनंद औरंगाबादकर आदी उपस्थित होते.

हा करार मैलाचा दगड ठरेल -मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे कॅन्सरचे दुसरे ‘कॅपिटल’ होत आहे. उत्तर प्रदेशनंतर  महाराष्ट्रात सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण आढळून येतात. ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’मध्ये देशातूनच नव्हे तर जगभरातून रुग्ण येतात. यामुळे त्यांच्याकडे रुग्णांची गर्दी वाढत आहे. कॅन्सर रुग्णांची ही गर्दी कमी करण्यासाठी व रुग्णांना माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ स्थापन करण्यात आले आहे. या रुग्णालयात गरीब रुग्णांना व बालकांना सामाजिक संघटनांच्या मदतीने मोफत उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ‘एनसीआय’ आणि ‘टाटा ट्रस्ट’ यांच्या रुग्णसेवेला घेऊन झालेला हा करार एक मैलाचा दगड ठरणार आहे. याचा फायदा विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातील कॅन्सर रुग्णांनाही होणार आहे.

देशात १९ कॅन्सर सेंटर -वेंकटरामनन
टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. वेंकटरामनन म्हणाले, ‘एनसीआय’शी झालेला हा करार म्हणजे, विदर्भातील रुग्णांसाठी उच्च दर्जाच्या कॅन्सर शुश्रृषाव्यवस्थेविषयी असलेल्या आमच्या समर्पित भावनेचे द्योतक आहे. राज्यांच्या शासनाशी सहकार्य करून टाटा ट्रस्ट एक परिणामकारक कॅन्सर शुश्रृषा यंत्रणा घडविण्याचे काम करीत आहे. नुकतेच टाटा ट्रस्टने आसाम सरकारशी भागीदारी करून आसाम कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या मदतीने १९ अद्ययावत कॅन्सर सेंटर कार्यान्वित केले आहे. अशाच प्रकारच्या भागीदारीविषयी आंध्र प्रदेश, ओरिसा, तेलंगणासोबत चर्चा सुरू आहे.
‘एनसीआय’चे सरचिटणीस शैलेश जोगळेकर म्हणाले, डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्था यांच्या कार्यकारी समितीने कॅन्सरच्या निदानासाठी, सुरक्षेसाठी आणि उपचारांसाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. या इन्स्टिट्यूटमधून रुग्णांना सर्वाेत्तम शुश्रुषा, गुणवत्ता पद्धतीचे उपचार आणि उत्तम सोईसुविधा देण्याचे आमचे ध्येय आहे. ‘टाटा ट्रस्ट’शी झालेला करार आमच्या कॅन्सरशी सुरू असलेल्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि सर्वांगीण शुश्रुषा देण्यात मदत करेल, असा विश्वास आहे.

२४ हजार कॅन्सर रुग्णांवर उपचार
डॉ. आनंद पाठक म्हणाले, ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ने वर्षभरात २४५०० कॅन्सर रुग्णांवर उपचार केले असून यात ५ हजार नव्या कॅन्सर रुग्णांची संख्या आहे. यातील ८ हजार रुग्णांना भरती करून उपचार केले. ८०० रुग्णांवर शस्त्रक्रिया तर ७०० रुग्णांना रेडिएशन दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘चिल्ड्रन कॅन्सर युनिट’मधून १०० पेक्षा जास्त मुलांवर उपचार करण्यात आले. ‘एनसीआय’मध्ये शासनाच्या संपूर्ण योजना राबविल्या जात असल्याने गरीब रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे.

टाटा ट्रस्टकडून १०० कोटींची मदत
टाटा ट्रस्ट व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार टाटा ट्रस्ट हे ‘एनसीआय’मध्ये उपकरणांसह, इमारतीच्या श्रेणीवर्धनसाठी १०० कोटींची मदत करणार आहे, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना ‘एनसीआय’चे सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी दिली.

Web Title: The satellite cancer care center in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.