Sanso ki Jarurat hai jaise ...: The Geeta Festival of the 90th | सांसो की जरूरत है जैसे... :९० च्या दशकातील गीतांची मेजवानी
सांसो की जरूरत है जैसे... :९० च्या दशकातील गीतांची मेजवानी

ठळक मुद्देहार्मोनी इव्हेन्ट्सचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील गीतांची जादू रसिकांवर कायम आहे. त्यानंतर आलेल्या काही गीतांनीही त्याकाळी श्रोत्यांना भुरळ घातली होती. विशेषत: ८० व ९० च्या दशकातील गाणी श्रोत्यांच्या ओठांवर आजही रेंगाळतात. याच काळातील गीतांची मेजवानी देणारा ‘नाईंटिज नॉट आउट’ हा कार्यक्रम शनिवारी सादर झाला आणि ९० च्या दशकातील गीतांच्या चाहत्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
हार्मोनी इव्हेन्ट्सतर्फे सायंटिफीक सभागृह, लक्ष्मीनगर येथे हा कार्यक्रम सादर करण्यात आला. हार्मोनीचे संचालक राजेश समर्थ यांची ही संकल्पना होती. गगन पुरी, उमा रघुरामन, हेमंत दारव्हेकर, प्रमोद पेडके, परिणिता मातुरकर, स्वप्ना पांडे, डॉ. रश्मी कोल्हे, मनीषा तिवारी, स्वप्नील तितरे, पल्लवी दामले या गायक कलावंतांनी या काळातील एकल आणि युगल गीते दिलखुलासपणे सादर केली. सादरीत गाण्यांच्या मूळ चित्रीकरणाच्या व्हिडीओजमुळे कार्यक्रमात अधिक रंगत आणली. आपल्या आवडीच्या गीतांसह आवडत्या सिनेताऱ्यांना पडद्यावर अनुभवण्याचा अनुभव श्रोत्यांना रोमांचित करणारा होता. ‘सांसो की जरूरत है जैसे..., दिल दिवाना बिन सजना के..., मै हुं प्रेमरोगी..., और इस दिल मे क्या रखा है..., दिल मे हो तुम..., तू शायर है मै तेरी शायरी..., गली मे आज चांद निकला..., माये नि मायई मुंडेर पे तेरी..., मेरी बिंदिया..., ये दिल दिवाना..., कभी तु छलिया लगता है...’ अशी काही सुमधूर गाणी दिलखुश अंदाजात गायकांनी सादर केली. हळुवार, भावविभोर करणाऱ्या आणि मस्तीभऱ्या गीतांना श्रोत्यांकडून वन्स मोअरचा प्रतिसाद मिळाला. श्वेता शेलगावकर यांचे रोचक निवेदन कार्यक्रमाला साजेसे ठरले. गीतांचा वाद्यमेळ कुशलतेने स्वरांकित करणाऱ्या वादक कलावंतांनीही कार्यक्रमाची रंगत वाढविली. महेंद्र ढोले (किबोर्ड), अमर शेंडे (व्हायोलिन), प्रकाश चव्हाण (गिटार), अशोक टोकलवार (तबला-ढोलक), नंदू गोहणे (ऑक्टोपॅड), राजेश धामणकर (तुंबा-कोंगो) या वादक कलावंतांनी सुरेल साथसंगत केली. प्रकाश व्यवस्था मायकल व व्यासपीठ सजावट राजेश अमिन यांची होती. विजय जथ्थे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.


Web Title: Sanso ki Jarurat hai jaise ...: The Geeta Festival of the 90th
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.