समृद्धी महामार्गाने घेतली गती :९० टक्के भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 09:48 PM2019-01-31T21:48:08+5:302019-01-31T21:49:30+5:30

समृद्धी महामार्गाच्या कामाने नागपूर जिल्ह्यात गती घेतली आहे. नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ९० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली असून एकूण ७०० किलोमीटरच्या मार्गापैकी २८ किलोमीटर मार्ग नागपूर जिल्ह्यातून जाणार आहे.

Samrudhhi highway took speed: 90 percent land acquisition completed | समृद्धी महामार्गाने घेतली गती :९० टक्के भूसंपादन पूर्ण

समृद्धी महामार्गाने घेतली गती :९० टक्के भूसंपादन पूर्ण

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातून जाणार २८ किलोमीटरचा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समृद्धी महामार्गाच्या कामाने नागपूर जिल्ह्यात गती घेतली आहे. नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ९० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली असून एकूण ७०० किलोमीटरच्या मार्गापैकी २८ किलोमीटर मार्ग नागपूर जिल्ह्यातून जाणार आहे.
समृद्धी महामार्गाचे सुरू असलेले काम पाहण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे बुधवारी पत्रकारांच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी ० ते ३१ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी मेघा कन्स्ट्रक्शन कंपनीला १ जानेवारी २०१९ रोजी १५६५ कोटीचे काम देण्यात आले आहे. या कंपनीला ३० महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा कालावधी शासनाच्या वतीने ठरवून देण्यात आला आहे. या कालावधीत हे काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील ३१ ते ८९ किलोमिटरचे काम अ‍ॅफकॉन नावाच्या कंपनीला देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम १५ जानेवारी २०१९ रोजी देण्यात आले असून हे काम संबंधित कंपनीला ३३ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावयाचे आहे. १ जानेवारी २०१९ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता अशोक जगशेट्टीवार यांनी दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता अशोक जगशेट्टीवार आणि अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील २० गावातून जाणार महामार्ग
समृद्धी महामार्ग नागपूर जिल्ह्याच्या २० गावामधून जाणार आहे. त्यासाठी ९० टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. यात शेतकऱ्यांना ५ पट पैसे देऊन त्यांच्या मर्जीनुसार जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी जमिनी विकल्यानंतरही त्यांच्या जमिनीवरील पिके वाया जाऊ नयेत यासाठी पीक निघेपर्यंत शासनाने त्यांनी मुभा दिली, अशी माहिती हिंगणाचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी दिली.
मिहानच्या मागील बाजूने महामार्गाचा शुभारंभ
हिंगणा तालुक्यातील शिवमडला हे समृद्धी महामार्गाचा झिरो पॉईंट  राहणार असून येथून समृद्धी महामार्गाला सुरुवात होणार आहे. हा भाग मिहानच्या मागील असून येथून मिहान, हिंगणा तालुका, अमरावती येथील वाहने या मार्गावर प्रवेश करू शकतील.
कामावर राहील ‘एनएमएससीईडब्ल्यू’चा वॉच
समृद्धी महामार्गाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कंपनी तयार करण्यात आली आहे. ‘एनएमएससीईडब्ल्यू’ (नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे) असे कंपनीचे नाव आहे. ही कंपनी समृद्धी महामार्गाच्या कामावर लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी कंपनीला २३.७३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात तीन ठिकाणी ‘इंटर चेंज’
समृद्धी महामार्ग हिंगणा तालुक्यातील शिवमडका येथून सुरू होणार आहे. शिवमडका येथे मिहानमधील वाहने, नागपूर, हिंगणा तसेच अमरावतीकडून येणारी वाहने समृद्धी महामार्गाने जाऊ शकतील. त्यानंतर मध्ये कोणतेच वाहन या महामार्गावर जाण्याची सुविधा नाही. शिवमडकानंतर ६.५ किलोमिटर अंतरावर दाताळा येथे दुसरा ‘इंटर चेंज’ राहील. दाताळा या इंटर चेंजवर बुटीबोरीकडून येणारी वाहने समृद्धी महामार्गावर जाऊ शकतील आणि समृद्धी महामार्गावर मुंबईकडून येणारी वाहने दाताळा येथे महामार्गाच्या बाहेर पडू शकतील. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील सेलडोह या तिसऱ्या ठिकाणी ‘इंटर चेंज’ राहणार आहे. तर वर्धा जिल्ह्यातत येळाकेळी आणि विरुळ असे दोन इंटरचेंज राहतील.
सव्वातीन मीटरच्या भिंतीचे कवच
समृद्धी महामार्गाला दोन्ही बाजूने सव्वातीन मीटर उंच असलेलल्या भक्कम भिंतीचे सुरक्षा कवच राहणार आहे. या भिंतीमुळे आजूबाजूच्या शेतातील पाळीव प्राणी, नागरिक, असामाजिक तत्त्व या मार्गावर प्रवेश करू शकणार नाहीत. भिंतीच्या वर ताराची जाळी बसविण्यात येणार आहे.
हळदगावला फ्लाय ओव्हर
हिंगणामधील शिवमडका येथून २६ किलोमीटरवर समृद्धी हायवे फ्लाय ओव्हरवरून जाणार आहे. खालून राष्ट्रीय महामार्गाची वाहने जाणार आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गात अडथळा येऊ नये यासाठी हळदगाव या पॉईंटवर फ्लाय ओव्हर तयार करण्यात येणार आहे.
दाताळाला वाढणार रुंदी
समृद्धी महामार्गाची सुरुवात शिवमडका येथून होणार आहे. शिवमडका ते दाताळा हा महामार्ग ६.५ किलोमीटरपर्यंत ८० मीटर रुंदीचा राहणार आहे. परंतु दाताळापासून समृद्धी महामार्गाच्या रुंदीत वाढ होणार आहे. दाताळा येथून हा महामार्ग तब्बल १२० मीटर रुंदीचा होणार आहे.
ताशी १५० किलोमीटरने धावतील वाहने
समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई ७०० किलोमीटरचा राहणार आहे. सहा पदरी (लेन) असलेल्या या महामार्गावर वाहने दर तासाला १५० किलोमीटरप्रमाणे धावणार आहेत. यानुसार नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ सात तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.

 

Web Title: Samrudhhi highway took speed: 90 percent land acquisition completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.