नागपूरनजीकच्या डोंगरगाव येथील एटीएमवर दरोडा, २० लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 07:57 PM2018-01-12T19:57:11+5:302018-01-12T20:05:10+5:30

एटीएम फोडून त्यातील रक्कम लंपास करणे हे काम कठीण मानले जात असले तरी अज्ञात लुटारूंनी एकच एटीएम दोन महिन्यांत दुसऱ्यांदा फोडले. विशेष म्हणजे, पहिल्याच घटनेतील लुटारूंना हुडकून काढण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यातच ही दुसरी घटना घडली. यावेळी लुटारूंनी या एटीएममधून १९ लाख ७३ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केली.

The robbery of the ATM at Dongargaon near Nagpur, 20 lakh looted | नागपूरनजीकच्या डोंगरगाव येथील एटीएमवर दरोडा, २० लाख लुटले

नागपूरनजीकच्या डोंगरगाव येथील एटीएमवर दरोडा, २० लाख लुटले

Next
ठळक मुद्देदोन महिन्यातील दुसरी घटना : लुटारू बेपत्ताच

लोकमत न्यूज नेटवर्क
 नागपूर  : एटीएम फोडून त्यातील रक्कम लंपास करणे हे काम कठीण मानले जात असले तरी अज्ञात लुटारूंनी एकच एटीएम दोन महिन्यांत दुसऱ्यांदा फोडले. विशेष म्हणजे, पहिल्याच घटनेतील लुटारूंना हुडकून काढण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. त्यातच ही दुसरी घटना घडली. यावेळी लुटारूंनी या एटीएममधून १९ लाख ७३ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केली. त्यामुळे एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव येथे गुरुवारी (दि. ११) मध्यरात्री घडली असून, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथे डोंगरगाव - गुमगाव मार्गावर बँक आॅफ इंडियाचे एटीएम आहे. येथे एकाच खोलीत दोन एटीएम मशीन बसविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, हा परिसर गजबजलेला आहे. हे एटीएम २४ तास सुरू असायचे. मात्र, दरोडेखोरांनी दोन महिन्यांपूर्वी या एटीएमला लक्ष्य करीत ते फोडून त्यातील रक्कम लंपास केल्याने रात्रीच्यावेळी ते बंद करण्यात येत होते. शिवाय, एटीएमच्या खोलीचे शटरही बंद केले जायचे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी एटीमएच्या परिसरात राहणाºया नागरिकांना एटीएमच्या खोलीचे शटर उघडे दिसले. त्यांनी त्या खोलीची पाहणी केली असता, आतील दोन्ही एटीएम मशीन फोडल्या असल्याचे तसेच मशीनमध्ये रोख रक्कम ठेवण्याचे ट्रे जवळच्या कचऱ्यात फेकण्यात आले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे लगेच हिंगणा पोलिसांना सूचना देण्यात आली.
माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शिंदे व हिंगण्याचे ठाणेदार बारापात्रे यांनी घटनास्थळ गाठून या दोन्ही मशीनची पाहणी केली. लुटारूंनी या दोन्ही मशीन गॅस कटरच्या मदतीने व्यवस्थित कापल्या आणि त्यातील रोख रक्कम ठेवण्याचे तीन ट्रे बाहेर काढून त्यातील १९ लाख ७३ हजार ४०० रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. लुटारूंनी जाताना तिन्ही ट्रे जवळच्या कचऱ्यात फेकून दिले होते. एकच एटीएम दुसऱ्यांदा फोडण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी बँक शाखा व्यवस्थापक नरेंद्र धोटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात लुटारूंविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
बँक व्यवस्थापनाचे सूचनांकडे दुर्लक्ष
लुटारूंनी डोंगरगाव येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम दुसऱ्यांदा फोडले. पहिल्यावेळी या एटीएममधून १० लाख रुपये लांबवण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी या एटीएममध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात यावे तसेच येथे कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी सूचना बँक व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र, बँक व्यवस्थापनाने पोलिसांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि दुसऱ्यांदा एटीएम फोडण्याची घटना घडली. विशेष म्हणजे, घटनेच्या रात्रीही येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सुरक्षा वाऱ्यावर
ग्रामीण भागातील विविध बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्तीच केली जात नसल्याचे तसेच काही ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे आढळून येते. यातील बहुतांश एटीएम २४ तास सुरू असतात. लुटारूंनी डोंगरगाव येथील एकच एटीएम दुसऱ्यांदा फोडले. लुटारूंनी १ जानेवारीच्या पहाटे कुही येथील एटीएम गॅस कटरने कापण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र, मशीन गरम आल्याने आतील ३ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या नोटा पूर्णपणे जळाल्या होत्या. अशा प्रकारच्या घटना यारपूर्वीही घडल्या आहेत. प्रशासनाचा हा हलगर्जीपणा लुटारूंच्या पथ्यावर पडणारा आहे.

Web Title: The robbery of the ATM at Dongargaon near Nagpur, 20 lakh looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.