नागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 09:59 PM2018-12-10T21:59:31+5:302018-12-10T22:02:03+5:30

दुचाकीवरील सशस्त्र लुटारूंनी रविवारी मध्यरात्रीनंतर उपराजधानीतील विविध विभागात हैदोस घालून अनेकांना लुटले. एकापाठोपाठ घडलेल्या दोन लुटमारीच्या घटनांची माहिती मिळाल्याने शहर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली होती.

The robbers robbed the two wheelers by threatening knife in Nagpur | नागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले

नागपुरात लुटारूंचा हैदोस : चाकूचा धाक दाखवून दुचाकीचालकांना लुटले

Next
ठळक मुद्देरोख आणि मोबाईल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीवरील सशस्त्र लुटारूंनी रविवारी मध्यरात्रीनंतर उपराजधानीतील विविध विभागात हैदोस घालून अनेकांना लुटले. एकापाठोपाठ घडलेल्या दोन लुटमारीच्या घटनांची माहिती मिळाल्याने शहर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचारी संभाजी सुरेश शिंदे एक समारंभ आटोपून दुचाकीने बेलतरोडी मार्गाने जात होते. मागून दोन दुचाकींवर आलेल्या सहा लुटारूंनी शिंदे यांना मनीषनगर टी पॉर्इंटजवळच्या रुद्र बारजवळ रोखले. चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ करून आरोपींनी शिंदे यांच्याजवळचे १० हजार तसेच मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर शिवीगाळ करीत आरोपी पळून गेले. या घटनेमुळे प्रचंड घाबरलेले शिंदे बेलतरोडी पोलीस ठाण्यात पोहचले. ते पोलिसांकडे तक्रार नोंदवत होते. तर, त्याचवेळी लुटारू जरीपटक्यातील मंगळवारी पुलाजवळ मोहम्मद नावेद मोहम्मद असलम परवेज (रा. सदर) यांना लुटत होते. पुतणीच्या लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून पहाटे २.१५ च्या सुमारास नावेद दुचाकीने घराकडे जात होते. कडबी चौकातून मंगळवारी पुलावर चढताच मागून दोन दुचाक्यांवर आलेल्या चौघांनी समोर जाऊन सिनेस्टाईल नावेद यांना रोखले. चाकूचा धाक दाखवून लुटारूंनी नावेद यांच्या जॅकेटमध्ये जबरदस्तीने हात घालून त्यांच्याजवळचे तीन हजार रुपये तसेच दुचाकीची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर आरोपी दुचाकीवर बसून पळून गेले.
बेलतरोडी पोलिसांनी घटनेची माहिती कळताच नाकेबंदी केली. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना माहिती देऊन लुटारूंना पकडण्याचे पोलीस प्रयत्न करीत असतानाच अशाच प्रकारच्या घटना जरीपटका तसेच कोराडी परिसरात घडल्याचेही उघड झाले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. पोलिसांनी लुटारूंना पकडण्यासाठी ज्या भागात घटना घडल्या त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. मात्र, डोळे वगळता लुटारूंनी चेहऱ्याचा संपूर्ण भाग स्कार्फने बांधून ठेवल्यामुळे त्यांची ओळख पटणे कठीण झाले आहे. दुसरे म्हणजे त्यांच्या दुचाक्यांच्या नंबरप्लेटही नव्हत्या. त्यामुळे लुटारू सराईत असावे आणि त्यांनी असे गुन्हे यापूर्वीही केले असावे, असा संशय आहे.
कोराडी मार्गावरीही प्रयत्न ?
तिसरी घटना कोराडी-गिट्टीखदान मार्गावर घडली. कोराडी मार्गाने जाणाऱ्या दुचाकीचालकाला ओव्हरटेक करून लुटारूंनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दुचाकीचालकाने वायुवेगाने पळून जाऊन स्वत:ला वाचवले, अशी चर्चा आहे. या घटनेची तक्रार न झाल्यामुळे पोलिसांनी ती रेकॉर्डवर घेतली नाही.

 

Web Title: The robbers robbed the two wheelers by threatening knife in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.