आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘नोगा’चे पुनरुज्जीवन करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 03:25 AM2017-12-17T03:25:44+5:302017-12-17T06:47:43+5:30

To revive Ngo at international level - Chief Minister Devendra Fadnavis | आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘नोगा’चे पुनरुज्जीवन करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘नोगा’चे पुनरुज्जीवन करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next

‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शानदार उद्घाटन, शेतक-यांची गर्दी

नागपूर : संत्रा उत्पादकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘नोगा’चे (नागपूर आॅरेंज ग्रोवर्स असोसिएशन) पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल. यासाठी सरकारतर्फे ४९ टक्के व खासगी ५१ टक्के भागीदारी घेतली जाईल आणि नोगाची उत्पादने देश-विदेशात पोहोचवून आंतरराष्ट्रीय पातळीवर नागपूरच्या संत्र्याची नवी ओळख निर्माण केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.
‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शनिवारी शानदार उद्घाटन झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या सोहळ्यात सन्माननीय पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ 
वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत उपस्थित होते. याशिवाय राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, ‘यूपीएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजूभाई श्रॉफ, बजाज इलेक्ट्रीकल्स लि.च्या कन्झ्युमर्स प्रोडक्ट्सचे कार्यकारी अध्यक्ष व कंट्री हेड अतुल शर्मा, आॅरेंज ग्रोवर असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष पी. जी. जगदीश, कार्यकारी अध्यक्ष अमोल तोटे, उपाध्यक्ष हरजिंदरसिंग मान, सचिव जगदीश पाटीदार उपस्थित होते.
शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर नियोजनबद्ध ‘क्लस्टर’ उभारावे लागतील, असे गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले.
राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी शेतक-यांना जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. अ‍ॅग्रो टुरिझमचे धोरण आखले जाईल, असे आश्वासन जयकुमार रावल यांनी दिले.
पुढील पाच वर्षात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ जगातील महत्त्वाचा उत्सव बनेल व जगभरातून येथे लोक येतील असा विश्वास विजय दर्डा यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.
शेतकरी, उद्योग व सरकाने एकत्र येत यासाठी काम केले तर राज्यातील कृषी क्षेत्राची नक्कीच प्रगती होईल, असा विश्वास ‘यूपीएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजूभाई श्रॉफ यांनी व्यक्त केला. तर अतुल शर्मा यांनी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मुळे नागपूर व येथील संत्र्यांचे नाव जगभरात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.
श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले तर खा.अजय संचेती यांनी आभार मानले.

कलम संशोधनासाठी कृषी विद्यापीठाला २ कोटी - फडणवीस
संत्रा कलम संशोधनासाठी कृषी विद्यापीठाला दोन कोटी रुपये दिले जातील. संत्रा ‘टेबल फ्रुट’ म्हणून जगात पाठविण्यावर मर्यादा आहेत. पण जेव्हा त्यावर प्रक्रिया होईल तेव्हाच शाश्वत बाजारपेठ मिळेल. यासाठी प्रक्रिया उद्योग उभारावे लागतील.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ‘कोल्ड स्टोरेज’ची साखळी उभारण्यात येणार आहे. याचा शेतकºयांना फायदाच मिळेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

विमानतळावर मद्य विकले जाते, संत्री का नाही? - गडकरी
देशातील विमानतळावर मद्य विकले जाते. मग शेतकºयांनी उत्पादित केलेल्या संत्र्याची विक्री का होत नाही, असा सवाल नितीन गडकरी यांनी या वेळी केला. विमानतळ, रेल्वे स्थानक येथे संत्रा विक्रीला आला तर बाजारपेठ विस्तारेल आणि नागपूर संत्र्याची चव जगापर्यंत जाईल, असेही गडकरी म्हणाले.

‘लोकमत’च्या पुढाकाराचे कौतुक
सर्वच मान्यवरांनी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यासाठी ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. संत्र्याला वैश्विक ओळख निर्माण करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी ‘लोकमत’ने पाऊल उचलले ही अभिनंदनीय बाब आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. गडकरी यांनीही या उपक्रमाची आवश्यकता होतीच, असे आवर्जून सांगितले. ‘या ‘फेस्टिव्हल’मुळे नागपूर व येथील संत्रा जगभरात पोहोचेल असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला.

- उद्घाटनानंतर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर सर्वच सन्मानीय पाहुण्यांनी प्रदर्शनातील स्टॉल्सना भेटी दिल्या. यानंतर ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या लोगोचे प्रकाशन करण्यात आले.
- यूपीएल समूह आणि बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), सहप्रायोजक मिनिट-मेड यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हे लोकमत इनिशिएटिव्ह असून १८ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे.

Web Title: To revive Ngo at international level - Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.