निकालाचे फटाके, दाव्यांच्या फुलझड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:30 AM2017-10-18T01:30:56+5:302017-10-18T01:31:18+5:30

जिल्ह्यातील २३८ ग्राम पंचायतींचे निकाल धनत्रयोदशीच्या दिवशी लागले. अनेकांना विजयाचे फटाके फोडण्याची संधी मिळाली. तर काहींचे बार फुसके ठरले.

Removal crackers, lit swords | निकालाचे फटाके, दाव्यांच्या फुलझड्या

निकालाचे फटाके, दाव्यांच्या फुलझड्या

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात भाजपा ‘खालसा’ : बावनकुळेंच्या मूळ गावात विजयाचा झेंडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील २३८ ग्राम पंचायतींचे निकाल धनत्रयोदशीच्या दिवशी लागले. अनेकांना विजयाचे फटाके फोडण्याची संधी मिळाली. तर काहींचे बार फुसके ठरले. जसजसे निकाल लागत गेले तसतसे काँग्रेस, भाजपाच्या नेत्यांकडून विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांच्या फुलझड्या उडविल्या गेल्या. भाजपाने जिल्ह्यात १३२ ठिकाणी आपले सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे तर काँग्रेसने आपले ९३ व भाजपाचे ९१ सरपंच विजयी झाल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ६६ तर शिवसेनेने ४८ ग्राम पंचायतींवर भगवा फडकल्याचा दावा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नागपूर ग्रामीण तालुक्यातील फेटरी व पालकमंत्री तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवी या गावात भाजपा ‘खालसा’ झाला. येथे भाजपा समर्थित सरपंचपदाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. तर बावनकुळे यांचे मूळ गाव असलेल्या खसाळा येथे मात्र सरपंचासह भाजपाचे अख्खे पॅनल विजयी झाले. फेटरीत भाजप समर्थित गटाने विद्यमान सरपंच ज्योती राऊत यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेस समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या धनश्री ढोमणे यांनी त्यांना ९७ मतांनी पराभूत केले. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात भाजपाला काट्याच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. या ग्राम पंचातीमध्ये ९ सदस्य व एक सरपंच अशा १० जागांसाठी निवडणूक झाली. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस गटाने सरपंचासह ५ जागा जिंकल्या. तर भाजपा समर्थित गटाला पाच सदस्यांचा विजयश्री खेचण्यात यश आले. तर बावनकुळे यांचे मूळ गाव असलेल्या खसाळा येथे सरपंचासह भाजपाचे अख्खे पॅनल विजयी झाले. सरपंचासह आठही जागा जिंकल्या. रवींद्र पारधी यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. बावनकुळे यांची सासुरवाडी असलेल्या सिंदी (उमरी) ता.नरखेड येथेही भाजपाच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या गटाचा पूर्ण पराभव करून सरपंचासह संपूर्ण नऊ सदस्य निवडून आले आहेत.
जि.प. अध्यक्षांच्या जाऊ पराभूत
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांच्या धानला या गावी त्यांच्या जाऊ ज्योती सावरकर या भाजपा समर्थित गटाकडून रिंगणात होत्या. त्यांचा शिवसेनेचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांच्या पत्नी वनिता वैद्य यांनी पराभव केला. येथे धनुष्य बाणाने कमळावर नेम साधला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या या येरखेडा या गावी काँग्रेस समर्थित पॅनलने सरपंचासह १२ जागा जिंकत बाजी मारली. येथे मंगला मनीष कारेमोरे या सरपंचपदी विजयी झाल्या.

Web Title: Removal crackers, lit swords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.