Registration is done by the fourth person in the insurance hospital in Nagpur | नागपुरातील विमा रुग्णालयात चतुर्थ कर्मचारी करतो रजिस्ट्रेशन
नागपुरातील विमा रुग्णालयात चतुर्थ कर्मचारी करतो रजिस्ट्रेशन

ठळक मुद्देअल्प कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाचे कामकाज प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव व रिक्त पदांमुळे आता रुग्णालय प्रशासनही अडचणीत आले आहे. ज्युनिअर क्लार्कच्या १९ जागा मंजूर असताना केवळ सहाच कर्मचारी आहेत. त्यांच्या मदतीला चार कर्मचाऱ्यांना उसनवारी तत्त्वावर देण्यात आले आहे. अल्प कर्मचाऱ्यांमुळे रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांचे रजिस्ट्रेशनची जबाबदारी चतुर्थ कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे.
सोमवारीपेठेतील या विमा रुग्णालयाशी तीन लाख कामगार जुळलेले आहेत. त्यांचे कुटुंब धरून सुमारे १२ लाख व्यक्तींच्या आरोग्याची जबाबदारी या रुग्णालयावर आहे. या कामगारांकडून वर्षाला कोट्यवधी रुपये रुग्णालयाला मिळतात. याच पैशांतून रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांचे पगारही होतात. परंतु गेल्या दीड वर्षांपासून असलेला औषधांचा तुटवडा, मोजकेच डॉक्टर, आऊटसोर्सिंग केलेल्या चाचण्या यामुळे कामगार रुग्णांना दुसऱ्या इस्पितळात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.
विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासनाचा कणा असलेल्या ज्युनिअर क्लार्कची मंजूर पदेही भरण्यात आलेली नाहीत. तब्बल १३ पदे रिक्त आहेत. सहा कायमस्वरूपी क्लार्कवर तीन लाख कामगारांची भिस्त आहे. त्यांच्या मदतीला गेल्या वर्षी सहा जणांना उसनवारी तत्त्वावर पाठविण्यात आले होते. परंतु जानेवारी महिन्यात या सहाही जणांना परत बोलावून घेतले. यामुळे कामकाज चांगलेच प्रभावित झाले. याची माहिती वरिष्ठांना दिल्यावर त्यांनी पुन्हा चार जणांना ३१ मेपर्यंत उसनावारी तत्त्वावर दिले आहे.
रुग्णालयात सोयी नसल्याने येथील रुग्ण खासगीमध्ये जाऊन औषधोपचार करतात. त्याचे बिल कार्यालयात पाठवितात. परंतु अल्प कर्मचाऱ्यांमुळे बिलाचे पैसे मिळण्याकरिता आठ ते नऊ महिन्यावर कालावधी लागत आहे. दहाच कर्मचारी असल्याने रुग्णालयाचे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांचे रजिस्ट्रेशन करण्यास हाताशी कर्मचारी नाहीच. चतुर्थ कर्मचाऱ्यांचा तुटवडा असताना त्यांचे एक काम कमी करून त्यांना रुग्णांच्या रजिस्ट्रेशनसाठी बसविले जात आहे. या कर्मचाऱ्यांच्या कमी शिक्षणामुळे अनेकांची नावे चुकीची लिहिली जात असल्याच्याही तक्रारी आहेत.

समस्या मार्गी लावण्यासाठी उरला एकच महिना
नागपूरच्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील पदे, यंत्रसामुग्री व औषधांच्या तुटवड्याची समस्या वेळीच सोडविली असती तर ही वेळ आली नसती, असे स्पष्ट मत राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त ए.बी. धुळाज यांनी जानेवारी महिन्यात या रुग्णालयाला दिलेल्या भेटीत व्यक्त केले होते. पुढील चार महिन्यात या सर्व समस्या मार्गी लागतील, अशी कबुलीही दिली होती. परंतु मागील तीन महिन्यात यातील एकही समस्या सुटलेली नाही. उरलेल्या एक महिन्यात यातील किती समस्या सुटतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Web Title: Registration is done by the fourth person in the insurance hospital in Nagpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.