काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधीतूून राऊत, धवड यांना वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 10:47 AM2018-03-19T10:47:14+5:302018-03-19T10:47:24+5:30

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून निष्काषित केल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक असलेले माजी मंत्री नितीन राऊत व माजी आमदार अशोक धवड यांना प्रदेश प्रतिनिधीच्या यादीतूनही वगळण्यात आले आहे.

Rauat and Dhawad were excluded from Congress's representative by the Congress | काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधीतूून राऊत, धवड यांना वगळले

काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधीतूून राऊत, धवड यांना वगळले

Next
ठळक मुद्देआवारी, गुडधे यांना सामावून घेतलेहुसैन, वंजारी, महाकाळकर, सहारे यांचा समावेश

कमलेश वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून निष्काषित केल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक असलेले माजी मंत्री नितीन राऊत व माजी आमदार अशोक धवड यांना प्रदेश प्रतिनिधीच्या यादीतूनही वगळण्यात आले आहे. तर दुसरीकडे कालपर्यंत चतुर्वेदींसोबत दिसणारे माजी खासदार गेव्ह आवारी, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, पुरुषोत्तम हजारे व माजी नगरसेवक दीपक कापसे यांना सामावून घेत चतुर्वेदी गट तोडण्याची रणनीती प्रदेश काँग्रेसने आखली आहे.
दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे नागपुरातून प्रदेश प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली. त्यांना पासही देण्यात आले. प्रदेश प्रतिनिधींच्या नियुक्तीत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुत्तेमवार-ठाकरे गटाला झुकते माप देत विरोधी गटातील काही नेत्यांनाही जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदेश काँग्रेसतर्फे अद्याप प्रदेश प्रतिनिधींच्या नियुक्तीची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल मुत्तेमवार, शेख हुसैन, अभिजित वंजारी, संजय महाकाळकर यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कालपर्यंत नितीन राऊत यांचे खंदे समर्थक असलेले व नुकतेच दिल्ली दौऱ्यात विकास ठाकरे यांच्या शिष्टमंडळात सहभागी झालेले नगरसेवक संदीप सहारे यांचीही प्रदेश प्रतिनिधी म्हणून वर्णी लागली आहे. महाकाळकर यांना हटविण्याच्या प्रक्रियेत सहारे हे चतुर्वेदी गटासोबत होते. मात्र, वनवे यांची निवड झाल्यापासून ते काहीसे दुरावले होते. यानंतर ते उघडपणे मुत्तेमवार-ठाकरे गटात सहभागी झाले होते.
गेल्या प्रदेश कार्यकारिणीत नितीन कुंभलकर सचिवपदी होते. मात्र, यावेळी त्यांना कुठल्याही ब्लॉकमधून प्रदेश प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले नाही. आता प्रदेशाध्यक्षांच्या अधिकारातील प्रदेश प्रतिनिधींच्या नियुक्तीतही त्यांचा नंबर लागलेला नाही. विशेष म्हणजे त्यांच्याऐवजी त्यांचे वडील ज्येष्ठ नेते मारोतराव कुंभलकर यांना सामावून घेण्यात आल्याची माहिती आहे. मारोतराव यांनी माणिकराव ठाकरे यांच्या कार्यकारिणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय प्रदेश प्रतिनिधी म्हणून माजी मंत्री अनिस अहमद, अ.भा. काँग्रेस समितीचे खंदे समर्थक असलेले ईश्वर चौधरी यांच्यासह कृष्णकुमार पांडे, गिरीश पांडव, राजेंद्र कोरडे, अतुल कोटेचा यांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, प्रदेश काँग्रेसकडून अंतिम यादी प्रसिद्ध होताना यात आणखी काहींचा समावेश होण्याची तर काहींची नावे गळण्याची शक्यताही प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

नियुक्त्यांवरून नाराजी अन् आक्षेपही
प्रदेश काँग्रेसने राऊत, धवड यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना दूर ठेवले. त्यामुळे प्रदेश काँग्रेसला शहरात सर्वांना एकत्र करून पक्षाची ताकद वाढवायची आहे की गटबाजी, असा सवाल राऊत, धवड समर्थकांनी करीत नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे गुडधे यांच्या नियुक्तीवर मुत्तेमवार-ठाकरे गट नाराज आहे. राऊत, धवड गटाने तर या नियुक्त्यांवरच आक्षेप घेतला आहे. नागपूरची संघटनात्मक निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे नागपुरातून एकाही ब्लॉकमधून प्रदेश प्रतिनिधी नेमण्यात आले नव्हते. असे असतानाही आता या नियुक्त्या कशा करण्यात आल्या, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर राज्यातील ८० टक्क्यांहून जास्त जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली तर उर्वरित जिल्ह्यातील नियुक्तीचे अधिकार प्रदेशाध्यक्षांना पक्षाच्या घटनेनुसार प्राप्त होतात व त्या अधिकारातूनच या नियुक्ती झाल्याचा दावा मुत्तेमवार-ठाकरे गटाने केला आहे.

निलंबित दीपक कापसेंच्या नियुक्तीवर आश्चर्य
महापालिकेच्या निवडणुकीत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक दीपक कापसे यांचे काँग्रेसचे तिकीट कटले होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला व काँग्रेसचे संजय महाकाळकर विजयी झाले होते. कापसे यांच्या रूपातील बंडखोर उमेदवाराचा प्रचार केल्याचा माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. तसेच बंडखोरीमुळे कापसे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी इतर बंडखोर उमेदवारांनाही निलंबित करण्यात आले होते. कापसे यांचे निलंबन रद्द करण्यात आलेले नाही. असे असतानाही त्यांची प्रदेश प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी अशा आशयाचा फोन मुंबई प्रदेश कार्यालयातून दीपक कापसे यांना आला होता व दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित राहण्याचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले होते. मात्र, कापसे दिल्लीला गेले नाहीत. चतुर्वेदी यांना पक्षातून निष्कासित करण्यात आल्यानंतर त्यांचा गट तोडण्यासाठी कापसे यांना पक्षात स्थान देण्याची रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आहे.

 

Web Title: Rauat and Dhawad were excluded from Congress's representative by the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.