नागपूर : जुना फुटाळा परिसरातील बनावट सेतू कार्यालय चालविणा-याच्या घरी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. तेथे तयार करण्यात येणारी विविध प्रकारची बनावट प्रमाणपत्रे तसेच विविध उपकरणेही पोलिसांनी जप्त केली. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेली ही कारवाई मंगळवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होती, हे विशेष!
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरस्वती अशोक सहारे राहतात. त्यांच्याकडे त्यांचा भाऊ नितीन ईश्वर वासनिक (वय २८, रा. संजयनगर, ट्रस्ट लेआऊट, अंबाझरी) राहतो. तो मूळचा देवलापार, ता. रामटेक येथील रहिवासी आहे. प्रारंभी तो जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू कार्यालय परिसरात छोटी-मोठी कामे करायचा. या भागातील दलालांच्या संपर्कात आल्यानंतर नितीन वासनिकने बनावट प्रमाणपत्रे तयार करवून घेण्याचे तंत्र शिकले. त्यासाठी लागणारे विविध सरकारी कार्यालयातील रबर स्टॅम्प बनवून घेतले. संगणक, स्कॅनर, प्रिंटर विकत घेतले. त्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने बहिणीच्या घरात समांतर सेतू कार्यालय सुरू केले. तेथून ड्रायव्हिंग लासन्सस, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, लिव्हिंग, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, इन्श्युरन्स, इन्कम सर्टिफिकेट, शपथपत्र, जन्म-मृत्यू दाखले तयार करू लागला. तो आणि त्याचे साथीदार शासन आणि नागरिकांची फसवणूक करून त्यांना सर्रास हे बनावट प्रमाणपत्र अनेक दिवसांपासून देत होते. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-१ला ही माहिती कळाल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी सहारेच्या घरी छापा घातला. पोलिसांना तेथे मोठ्या प्रमाणात बनावट प्रमाणपत्रे तसेच विविध उपकरणे, रबरी स्टॅम्प आढळले. पोलिसांनी ते सर्व जप्त केले.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे, उपायुक्त (डिटेक्शन) संभाजी कदम, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, संजय चव्हाण, राजकुमार देशमुख, हवालदार सुनील चौधरी, अफसरखान पठाण, राजेंद्र सेंगर, नायक अमित पात्रे, राहुल इंगोले, मंगेश मडावी आणि नीलेश वाडेकर यांनी ही कामगिरी बजावली.

त्यांचे काय?
पोलिसांनी ही बनावट कागदपत्रे जप्त केली. शिवाय यात नितीन वासनिकसह त्याच्या अन्य साथीदारांनाही पोलीस अटक करतील. मात्र, ज्या शेकडो नागरिकांनी ही बनावट कागदपत्रे यांच्याकडून घेतली आणि ती शाळा-महाविद्यालयासह विविध कार्यालयात दिली, त्यांचे काय होणार, असा प्रश्न आता चर्चेला आला आहे.