नागपुरात पैशासाठी नागरिकांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:15 PM2018-04-18T22:15:33+5:302018-04-18T22:15:44+5:30

बुधवारी शहरातील बहुतांश एटीएममधील पैसे संपल्यामुळे एटीएमच्या बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना हे बोर्ड पाहून पैसे काढण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. तेथेही तीच परिस्थिती असल्यामुळे दिवसभर एटीएमच्या शोधात नागरिकांना भटकंती करण्याची पाळी आली. एखाद्या एटीएममध्ये पैसे असल्याचे दिसले परंतु तेथेही बराच काळ रांगेत उभे राहून पैसे काढावे लागल्यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप झाला.

People's wander for money in Nagpur | नागपुरात पैशासाठी नागरिकांची भटकंती

नागपुरात पैशासाठी नागरिकांची भटकंती

Next
ठळक मुद्दे‘नो कॅश’चे बोर्ड : एटीएममध्ये दुसऱ्या दिवशीही ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारी शहरातील बहुतांश एटीएममधील पैसे संपल्यामुळे एटीएमच्या बाहेर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना हे बोर्ड पाहून पैसे काढण्यासाठी दुसऱ्या भागात जावे लागते. तेथेही तीच परिस्थिती असल्यामुळे दिवसभर एटीएमच्या शोधात नागरिकांना भटकंती करण्याची पाळी आली. एखाद्या एटीएममध्ये पैसे असल्याचे दिसले परंतु तेथेही बराच काळ रांगेत उभे राहून पैसे काढावे लागल्यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप झाला.
मंगळवारपासून नागपूर शहरातील बहुतांश एटीएममध्ये ठणठणाट आहे. बुधवारीही तीच परिस्थिती शहराच्या विविध भागात पाहावयास मिळाली. पैसे नसल्याच्या पाट्या अनेक एटीएमच्या बाहेर लावण्यात आल्या होत्या. पैशाचे काम असल्यामुळे अनेक नागरिक आपण राहत असलेल्या भागातून दुसऱ्या परिसरात एटीएमच्या शोधासाठी निघाले. परंतु तेथेही एटीएम रिकामे असल्याचे पाहून त्यांना रिकाम्या हाताने परतण्याची पाळी आली. काही एटीएममध्ये पैसे होते. परंतु तेथे नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. तर अनेक नागरिकांना उन्हात एटीएमच्या शोधात फिरावे लागले. शहराच्या अनेक भागातील एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट पाहावयास मिळाला. यात गोधनी रोडवरील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये नेहमी पैसे राहतात. परंतु तेथेही आज पैसे नव्हते. छावणीच्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे नव्हते. पूनम चेंबर येथील आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे नव्हते. सदर चौकातील इन्डसइंड बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिक परत गेले. एनआयटी कार्यालयाजवळील ई लाऊंज एटीएममध्ये पैसे नव्हते. सीताबर्डी परिसरातील बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्येही पैसे नव्हते. तर नंदनवन परिसरातील बहुतांश एटीएममध्ये पैसे नसल्याचे दिसले.
महत्त्वाची कामे खोळंबली
शहराच्या विविध भागातील एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेक नागरिक सीताबर्डी परिसरात खरेदीसाठी आले होते. परंतु एटीएममध्ये पैसेच नसल्यामुळे त्यांना उन्हात फिरावे लागले. अखेर पैसे नसल्यामुळे बºयाच नागरिकांना खरेदीचा बेत रद्द करण्याची पाळी आली. तर अनेक नागरिकांची पैशाअभावी महत्त्वाची कामे खोळंबून पडल्यामुळे त्यांना मनस्ताप झाला.

नागरिकांच्या प्रतिक्रिया...

एटीएमच्या शोधात फिरावे लागले
‘नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी सीताबर्डीला आलो होतो. परंतु खूप फिरूनही एटीएममधून पैसे निघाले नाहीत. त्यामुळे मोबाईल खरेदीचा बेत आज रद्द करावा लागला.’
शेखर गौरखेडे, युवक

किराणा खरेदी थांबली
‘मी किराणा दुकानदार आहे. खरेदीसाठी सीताबर्डीला आलो होतो. येथे पैशासाठी एटीएममध्ये फिरलो. परंतु कुठेच पैसे नव्हते. पैसे काढण्यासाठी खूप फिरावे लागले.’
वासु सोमणकर, व्यावसायिक

खूप मनस्ताप झाला
‘कुटुंबीयांसह सीताबर्डी परिसरात कपडे खरेदीसाठी आलो होतो. तीन-चार एटीएममध्ये शोध घेतला. परंतु कुठेच पैसे नव्हते. उन्हात पैशासाठी फिरावे लागले. एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे मनस्ताप झाला.
संतोष वाढई, नागरिक

खूप फिरावे लागले
‘नंदनवन परिसरातील एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे खुप फिरावे लागले. दुसऱ्या भागातील एटीएममध्येही तीच परिस्थिती असल्यामुळे नाईलाज झाला. एटीएमच्या शोधात भर उन्हात फिरण्याची पाळी आली.’
डॉ. आमीर खान, नागरिक

Web Title: People's wander for money in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.