त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात नांदतय शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 09:53 PM2018-01-01T21:53:53+5:302018-01-01T22:01:44+5:30

समाजात सेवाभावाने कार्य करणारी माणसे कुठल्या सत्कारासाठी कार्य करीत नाही तर या सेवेतच त्यांना आनंद मिळतो. मात्र अशा व्यक्तींचा सत्कार करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. कारण अशा त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात शांतता नांदत आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. सी.मो. झाडे फाऊंडेशनच्या सत्कार समारोहात ते बोलत होते.

The peace of the society only due to the service of dedicated persons | त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात नांदतय शांतता

त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात नांदतय शांतता

googlenewsNext
ठळक मुद्देझाडे फाऊंडेशनच्या पुरस्कारांचे वितरणगणेश खवसे, पान्हेरकर, बिजमवार, बनकर, धाबेकर यांना प्रदान

आॅनलाईन लोकमत
नागपूर : समाजात सेवाभावाने कार्य करणारी माणसे कुठल्या सत्कारासाठी कार्य करीत नाही तर या सेवेतच त्यांना आनंद मिळतो. मात्र अशा व्यक्तींचा सत्कार करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. कारण अशा त्यागमूर्तींच्या सेवाकार्यामुळेच समाजात शांतता नांदत आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. सी.मो. झाडे फाऊंडेशनच्या सत्कार समारोहात ते बोलत होते.
सामाजिक, शैक्षणिक, अपंग-क्रीडा, आरोग्य व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या  मान्यवरांना सी.मो. झाडे फाऊंडेशनच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवीन वर्षाचे निमित्त साधून सर्वोदय आश्रम येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारोहात मेळघाटात सेवा देणारे डॉ. रवींद्र कोल्हे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत अ‍ॅड. मा.म. गडकरी, फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास झाडे, विश्वस्त नारायण समर्थ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक गणेश खवसे यांना सी.मो. झाडे ग्रामीण पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांच्यासह श्रीराम पान्हेरकर यांना डॉ. गोविंद समर्थ अपंग सेवाकार्य पुरस्कार, सुशीला बिजमवार यांना मीराबेन शाह उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार, डॉ. डी.बी. बनकर यांना ना.बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार आणि डॉ. अशोक धाबेकर यांना डॉ. अतुल कल्लावार आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिवाजीराव मोघे म्हणाले, ४५० गावांत केलेल्या सर्वेक्षणानुसार व्यसनाधीनता ही ग्रामीण भागातील मोठी समस्या असून, गरिबीचे कारण असल्याचे लक्षात आले. त्यासाठी व्यसनमुक्तीचे धोरण राबविणे आवश्यक आहे. साहित्यिकांनी या विषयावर व्यापक लेखन न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. खर्चिक लग्नकार्य टाळण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले, देशात गरीब व श्रीमंतामधील दरी वाढत आहे. शिक्षण महाग होत असल्याने गरीब घरच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. ही दरी संपविण्यासाठी लोकनीती ठरविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मा.म. गडकरी म्हणाले, समाज उत्थानाच्या कामात आपला सहभाग असला पाहिजे. गांधी विचार व  राष्ट्राच्या  विचारातून काम करणारे लोक विपरीत परिस्थितीवर मात करून जगाला तारू शकतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बळवंत मोरघडे यांनी केले. विकास झाडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला माजी मंत्री हरिभाऊ नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, प्राचार्य बबनराव तायवाडे, काँग्रेस नेते अतुल कोटेचा, योगतज्ज्ञ विठ्ठलराव जीभकाटे, सुधा गडकरी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: The peace of the society only due to the service of dedicated persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.