नागपुरातला पतंजलीचा ‘संथ योग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:00 PM2018-06-30T13:00:53+5:302018-06-30T13:02:58+5:30

यावर्षीच्या जुलै महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू करून पहिल्या टप्प्यात दोन हजार युवकांना रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या मिहानमधील पतंजलीचे उत्पादन आता वर्ष २०१९ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती आहे.

Patanjali's 'slow yoga' in Nagpur | नागपुरातला पतंजलीचा ‘संथ योग’

नागपुरातला पतंजलीचा ‘संथ योग’

Next
ठळक मुद्देउत्पादन पुढील वर्षी सुरू होणाररोजगारावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षीच्या जुलै महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू करून पहिल्या टप्प्यात दोन हजार युवकांना रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या मिहानमधील पतंजलीचे उत्पादन आता वर्ष २०१९ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पतंजलीमध्ये भरतीच्या जाहिराती सोशल मीडियावर प्रकाशित झाल्या आहेत. पण पतंजलीच्या संथ योगामुळे युवकांना पुन्हा काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
पतंजलीने मिहानमधील जागेवर सुरक्षा भिंत उभारून शेडचे काम सुरू केले आहे. काही शेड तयार झाले आहेत. मशीनही आयात केल्या आहेत. घोषणेनुसार बाबा रामदेव यांच्या घोषणेनुसार २०१७ च्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणे अपेक्षित होते. त्यानंतर कंपनीने उत्पादनासाठी पुढील तारखेची घोषणा केली, पण आताही काही तांत्रिक कारणांमुळे नियोजित वेळेत उत्पादन सुरू होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

२५४ एकर जागा
पतंजलीने मिहानमधील फूड पार्कमध्ये २५४ एकर जागा खरेदी केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन सप्टेंबर २०१६ ला झाले. त्यावेळी बाबा रामदेव यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कंपनीचे सीईओ आचार्य बालकृष्ण उपस्थित होते. त्यावेळी बाबा रामदेव यांनी वर्षभरात उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सप्टेंबर २०१७ पर्यंत उत्पादन सुरू होणार होते. पण प्रशासकीय अडचणींमुळे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊ शकले नाही. त्यानंतर जुलै २०१८ पर्यंत कंपनीचे एक युनिट सुरू होणार होते. पण तशी शक्यता दिसत नाही. आता शेड उभारणीचे काम सुरू आहे. मशीनरींची उभारणी आणि ट्रायलनंतरच प्रत्यक्ष उत्पादन पुढील वर्षी होणार आहे.

शेतकऱ्यांशी उत्पादनासाठी करार
पतंजलीने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत आवळा आणि कोरफड (अ‍ॅलोव्हिरा) या दोन पिकांसाठी करार केला असून कंपनी खरेदी करणार आहे. त्याकरिता कंपनी या उत्पादनांसाठी शेतकऱ्यांना सर्व मदत करणार आहे. नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे कंपनी आपली उत्पादने या ठिकाणाहून देशाच्या अन्य भागात नेऊ शकते. त्यामुळेच पतंजलीने नागपूरची निवड केली आहे. रोजगारासाठी कंपनीने लवकरच उत्पादन सुरू करावे, अशी युवकांची मागणी आहे.

हजारोंना रोजगार मिळणार
पतंजली फूड पार्कमध्ये विदर्भातील हजारो युवकांना रोजगार मिळणार आहे. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातही पतंजलीसारखे मोठे उत्पादन युनिट यावेत. त्यामुळे त्यावर आधारित १५० ते २०० लहान कंपन्या सुरू होऊन हजारोंना रोजगार मिळू शकतो. सध्या बुटीबोरीत नव्याने सुरू झालेल्या एका फूड कंपनीत ५०० युवकांना रोजगार मिळाला आहे.
- नितीन लोणकर, अध्यक्ष,
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.

Web Title: Patanjali's 'slow yoga' in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.