१६ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 09:50 AM2017-12-07T09:50:14+5:302017-12-07T09:55:30+5:30

नागपूर व विदर्भातील संत्र्याचे भारताच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात ‘ब्रॅण्डिंग’ व्हावे व सोबतच येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर फोकस करून त्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपुरात १६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे.

Organizing 'World's Orange Festival' in Nagpur from December 16 to 18 | १६ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ चे आयोजन

१६ ते १८ डिसेंबरदरम्यान नागपुरात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ चे आयोजन

Next
ठळक मुद्देभरगच्च सांस्कृतिक मेजवानीसंत्र्यापासून तयार होणाऱ्या रेसिपी शिका

आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपूर व विदर्भातील संत्र्याचे भारताच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात ‘ब्रॅण्डिंग’ व्हावे व सोबतच येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर फोकस करून त्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपुरात १६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादक सहभागी होतील. या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदान-प्रदान होऊन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग तयार होईल.
यूपीएल समूह हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सहकार्याने आयोजित केला आहे. हे लोकमतचे इनिशिएटिव्ह आहे. १६ डिसेंबर रोजी येथील सुरेश भट सभागृहात या महोत्सवाचे उद्घाटन होईल. या महोत्सवात संगीत, कला, नृत्याची मेजवानी असेल. पण याहून महत्त्वाचे म्हणजे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा लागवडीपासून ते संत्रा वाहतुकीपर्यंतच्या ‘आॅरेंज चेन’ची माहिती विविध चर्चासत्र आयोजित करून दिली जाईल. यासाठी आॅरेंज ग्रोवर असोसिएशन आॅफ इंडिया, आयसीएआर- सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचे सहकार्य लाभले आहे.
विदर्भ, महाराष्ट्रासह पंजाब, आंध्र प्रदेश, मणिपूर आदी राज्यांसह इस्रायल, टर्कीमधूनही संत्रा उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी होतील. संत्र्याचे उत्पादन कसे वाढवावे, गुणवत्ता कशी राखावी यावर ते आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभागी होऊन लाभ घेण्याची ही एक संधी चालून आली आहे. संत्रा उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. तर देशात संत्रा उत्पादनात नागपूरचे अव्वल आहे. संत्रा उत्पदानाच्या मोहिमेत नागपूर नेतृत्व करून भारताला जगात पहिल्या क्रमांकावर पोहचवू शकते. नागपुरी संत्रा भारताच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचावे यासाठी ‘ब्रॅण्डिंग’ करण्याचा हा प्रयत्न आहे. हा महोत्सव एका वर्षापुरता मर्यादित नाही. तर ही एक चळवळ असून ती वर्षानुवर्षे पुढे न्यायची आहे. नागपूरच्या संत्र्याला जगात महत्त्वाचे स्थान मिळवून द्यायचे आहे.

भरगच्च सांस्कृतिक मेजवानी
महोत्सवात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचे गायन होईल. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे दिलखेचक नृत्य, बॉलिवूडचे आघाडीचे गायक बेनी दयाल यांचा ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ होईल. याशिवाय युरोप, आफ्रिका, आशिया खंडातून कलाकार येऊन आपली कला सादर करतील. नागपूरकरांसाठी ही एक सांस्कृतिक मेजवानी असेल. क्रीडा संकुल (मानकापूर), ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र या प्रमुख ठिकाणी कार्यक्रम होतील.
याशिवाय शहरातीत महत्त्वाच्या ठिकाणी ‘मोबाईल स्टेज’च्या माध्यमातून कलाकार आपली कला सादर करतील. त्यामुळे शहराच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागपूरकरांना या महोत्सवाचा आनंद लुटला येर्ईल. महोत्सवादरम्यान जे.जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबई व नागपूरचे कलाकार मिळून नागपुरात विविध ठिकाणी संत्राविषयक इन्स्टॉलेशन उभारतील. संत्र्यापासून तयार केलेला ताजमहाल, संत्र्यापासून साकारलेली शेतकरी महिला आदी कलाकृती लक्षवेधी ठरतील.
या महोत्सवात होणारी ‘कार्निव्हल परेड’ ही महोत्सवाचा सर्वोच्च बिंदू असेल. यात नागपूरचे कलाकार सहभागी होतील. फिटनेस प्रोग्रामही आयोजित केले जातील. एकूणच महोत्सवातील तीन दिवस नागपूरकरांसाठी कार्यक्रमांची रेचलेच असेल.


संत्र्यापासून तयार होणाऱ्या रेसिपी शिका
प्रसिद्ध मास्टर शेफ विकी रत्नानी हे संत्र्यापासून देशभरात तयार होणाऱ्या विविध रेसिपीची माहिती देतील. तर टी.व्ही. स्टार प्रसिद्ध आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ सारा टोड जगभरात संत्र्यापासून तयार होणाऱ्या रेसिपी कशा बनवायच्या याचे प्रात्यक्षिक सादर करतील. त्यामुळे अनेकांसाठी संत्रा रेसिपी शिकण्याची ही एक मोठी संधी असेल.
नागपूर शहराने जगासाठी आयोजित केलेला हा महोत्सव आहे. या महोत्सवाला शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपणा सर्वांना मिळून तो यशस्वी करायचा असून नागपूरचे नाव जगाच्या नकाशावर न्यायचे आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसोबतच येत्या काही वर्षात ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल नागपूर’ची जगाच्या इव्हेंट कॅलेंडरमध्ये प्रकर्षाने नोंद होईल व देशविदेशातील पर्यटक यात सहभागी होण्यासाठी रीघ लावतील, यात शंका नाही. महोत्सवात आयोजित प्रदर्शनीत स्टॉलसाठी लोकमत कार्यालयाशी संपर्क साधता येईल.

अधिक माहितीसाठी पुढील लिंक्सवर संपर्क साधावा.

Facebook.com/worldorangefestival, Twitter.com/worldorangefest, instagram.com/worldorangefestival 

Web Title: Organizing 'World's Orange Festival' in Nagpur from December 16 to 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती