सेंद्रिय धान्य, भाजीपाला, देसी बियाण्यांचा गावरान बाजार : बीजोत्सवला उत्साही सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:28 PM2019-03-15T23:28:38+5:302019-03-15T23:29:36+5:30

आपल्या जेवणाचे ताट शुद्ध व आरोग्यदायी अन्नाने सजवायचे असेल तर विषयुक्त रासायनिक खतांचा वापर करून निर्मित अन्नधान्याला नकार द्यावा लागेल आणि पारंपरिक देशी बियाण्याचा स्वीकार करावा लागेल. हा संदेश देत देशी वाणाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि ग्राहकांना थेट शेतकऱ्यांशी जोडणाऱ्या बीजोत्सव प्रदर्शनाला शुक्रवारी उत्साहात सुरूवात झाली. रासायनिक खतांचा वापर न करता पिकविलेले धान्य, भाजीपाला, फळे आणि अगदी शहरातील लोकही आपल्या घरी पिकवू शकतील अशा देशी बियाण्यांचा बाजारच बीजोत्सवच्या माध्यमातून नागपूरकरांसाठी उपलब्ध झाला आहे.

Organic grains, vegetable and Gavran bazaar of indigenous seeds: The enthusiasm of the celebration of the festival of seeds | सेंद्रिय धान्य, भाजीपाला, देसी बियाण्यांचा गावरान बाजार : बीजोत्सवला उत्साही सुरुवात

सेंद्रिय धान्य, भाजीपाला, देसी बियाण्यांचा गावरान बाजार : बीजोत्सवला उत्साही सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्देग्राहकांना शेतकऱ्यांशी जोडणारे प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या जेवणाचे ताट शुद्ध व आरोग्यदायी अन्नाने सजवायचे असेल तर विषयुक्त रासायनिक खतांचा वापर करून निर्मित अन्नधान्याला नकार द्यावा लागेल आणि पारंपरिक देशी बियाण्याचा स्वीकार करावा लागेल. हा संदेश देत देशी वाणाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि ग्राहकांना थेट शेतकऱ्यांशी जोडणाऱ्या बीजोत्सव प्रदर्शनाला शुक्रवारी उत्साहात सुरूवात झाली. रासायनिक खतांचा वापर न करता पिकविलेले धान्य, भाजीपाला, फळे आणि अगदी शहरातील लोकही आपल्या घरी पिकवू शकतील अशा देशी बियाण्यांचा बाजारच बीजोत्सवच्या माध्यमातून नागपूरकरांसाठी उपलब्ध झाला आहे.
म्यूर मेमोरियल हास्पिटल परिसर, महाराज बाग रोड, सीताबर्डी येथे हे कृषी प्रदर्शन एक वेगळेपण दर्शविणारे आहे. प्रदर्शनात महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, केरळ, पंजाब व देशभरातील विविध भागातून आलेल्या ७० च्या जवळपास शेतकऱ्यांचे, कृषीमालावर जैविक पद्धतीने प्रक्रिया करणारे लघु उद्योजकांचे स्टॉल लागले आहेत. यामध्ये जैविक शेतीतून पिकविलेल्या सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य, तांदूळ, गहू, मिरची पावडर, हळद, मसाले, ज्वारी, बाजरी, काळे तांदूळ बीजोत्सवच्या बाजारात नागपूरकरांसाठी उपलब्ध आहे. मात्र त्यापेक्षा या सर्व कृषीमालाचे पारंपरिक देशी बी-बियाणे प्रदर्शनात उपलब्ध आहेत, ही या प्रदर्शनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. शहरातही आपल्या घरी असलेल्या मोकळ्या जागेवर, टेरेसवर भाजीपाला किंवा इतर कृषीमाल उगविण्याची इच्छा लोकांमध्ये असते. अशावेळी चांगल्या प्रतीचे बी शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो. आरोग्यास अत्यंत उपयोगी असलेल्या देशी वाणाचे लाल मका, गोड मका, गाजराचे बी, गहू, टमाटर, बीट, मुळा, काकडी, सूर्यफुल, शेवगा, काळले, कोथिंबीर, लवकी, भोपळा, झेंडू फुल, गुलाब फुल, ज्वारी, बाजरी, लसूण, वांगे, कांदा, रानभाज्या, चिंच, तूर डाळ, मटकी, बरबटी, वाल, चणा, लाखोळी अशा सर्व प्रकारचे देशी वाणांचे बी प्रदर्शनात उपलब्ध आहेत. अंबाडी आणि मोहापासून तयार विविध पदार्थ हेही या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे. विविध पदार्थांपासून तयार खास पारंपरिक पद्धतीचे जेवण भेट देणाऱ्यांना आकर्षित करते. यासोबतच आलेल्या शेतकऱ्यांना आणि शहरातील नागरिकांनाही तज्ज्ञांचे मार्गदर्शन यादरम्यान चालणाऱ्या सत्रामध्ये मिळते. सर्वार्थाने परिपूर्ण असे हे कृषी प्रदर्शन नागरिकांनी चुकवू नये असे आहे.
शुक्रवारी सकाळी पहिल्या सत्रात भूक्षरण, जलसंकट, तापमानवाढ आणि वातावरणातील बदल तसेच जीएम बियाणे या बाबींवर पांडुरंग शितोळे, डॉ. महादेव पाचेगावकर, डॉ. गोपाल पालीवाल यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी येतेवाही जि. भंडारा येथील वीणा अमृत कुंभरे व कुंभीटोला, जि. गोंदिया येथील गायत्री देवेंद्र राऊत या महिला शेतकऱ्यांच्याहस्ते बीजोत्सव प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कृषितज्ज्ञ डॉ. शरद पवार, वसंत फुटाणे, अमिताभ पावडे व प्रदर्शनाच्या संयोजिका डॉ. किर्ती मंगरूळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पोपटीच्या घुगऱ्या, मोहफुलांचे गुलाबजामुन, ढोकळा
मोह म्हटले की आपल्याला केवळ दारू लक्षात येते. पण हे मोहफुले जंगलात राहणाऱ्या आदिवासींचे जीवन होय, याचा प्रत्यय बीजोत्सवमध्ये येतो. मोहापासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे चवदार खाद्यपदार्थ प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधणारे आहेत. ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा व पारंपरिक बियाणे महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रमांतर्गत गायत्री राऊत आणि वीणा कुंभरे यांच्या पाककलेतून मोहाचे गुलाबजाम, ढोकळा व लाडू एकदा चाखून पहावे असे आहेत. यासोबत खास पोपटीच्या घुगऱ्यांची चवही गावची आठवण यावी अशीच आहे. यासोबत प्रदर्शनात खास पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी लोकांना मिळत आहे. तेही सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या अन्नधान्यातून. आंबाडीपासून तयार केलेल्या वस्तूही या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
७८ प्रकारच्या धानाचे जतन
विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. पण धानाचे किती प्रकार आहेत, याची आपण कल्पनाही केली नसेल. गडचिरोलीच्या संस्थेतर्फे लागलेल्या स्टॉलवर कृषी विद्यार्थी संजय घोरपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या भागातील ७८ प्रकारच्या धानाचे जतन केले आहे. यामध्ये एचएमटीचे जनक दादासाहेब खोब्रागडे यांनी संशोधित केलेल्या डीआरके-१, २, ३, नांदेड हिरा अशा आठ ते दहा जातींचा समावेश आहे. याशिवाय गोदल, पेट्रीस, पांढरी लुचई, एरीकुस्मा, गाडाकुट्टा वंजी, काळा धान, काटेवर लाल अशा धानाच्या प्रजातींचे दर्शन आपल्याला होते.
हळद, आंबाडीची कॅप्सूल व टॅब्लेट
आजार झाल्यावर डॉक्टरांकडून मिळालेल्या टॅब्लेट किंवा कॅप्सूल आपणाला माहिती आहेत. पण खाण्याची हळद आणि आंबाडीच्या कॅप्सूलबाबत कधी विचार केला आहे का? मनोहर परचुरे यांच्या श्रीराम सेंद्रीय संस्थेने या हळद व आंबाडीच्या कॅप्सूल तयार केल्या आहेत. आजार झाल्यावर नाही तर तो होऊ नये यासाठी या कॅप्सूल आहेत. सुषमा खोब्रागडे यांनी याबाबत माहिती दिली. हळदीची ही गोळी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गुणकारी आहे. सोबत त्यांनी तयार केलेल्या कर्कुमिना कॅप्सूल कॅन्सर रुग्णांसाठी लाभदायक आहेत. शरीरातील हिमोग्लोबिन वाढविणाºया आंबाडीच्या कॅप्सूलही त्यांनी विकसित केल्या आहेत. याशिवाय आंबाडीचा चहा, सरबत आणि हळदीचे लोणचे नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

Web Title: Organic grains, vegetable and Gavran bazaar of indigenous seeds: The enthusiasm of the celebration of the festival of seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.