आॅनलाईन चिटरला सायबर सेलने केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:37 AM2018-09-05T00:37:49+5:302018-09-05T00:39:57+5:30

एका निवृत्त महिला पोलीस उपनिरीक्षकेसह तिघांची फसवणूक करून त्यांना १ लाख, ५५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका ठगबाजाला सायबर सेलच्या पथकाने नाशिकमध्ये अटक केली. प्रशांत श्रीकृष्ण गारमोडे (वय २८, रा. सैलानी टॉप, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.

Online cheater has been arrested by cyber cell | आॅनलाईन चिटरला सायबर सेलने केले जेरबंद

आॅनलाईन चिटरला सायबर सेलने केले जेरबंद

Next
ठळक मुद्देनाशिकमध्ये केली अटक : तीन गुन्ह्यांचा छडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका निवृत्त महिला पोलीस उपनिरीक्षकेसह तिघांची फसवणूक करून त्यांना १ लाख, ५५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका ठगबाजाला सायबर सेलच्या पथकाने नाशिकमध्ये अटक केली. प्रशांत श्रीकृष्ण गारमोडे (वय २८, रा. सैलानी टॉप, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे.
यशोधरानगरात राहणाऱ्या सुहासिनी मेश्राम यांनी काही महिन्यांपूर्वी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्यांकडे आपली कागदपत्रे आणि मोबाईल नंबर दिला होता. आरोपीने तो मिळवला आणि मेश्राम तसेच अन्य दोघांना त्याने फोन करून आपण बजाज फायनान्स कार्ड मधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे आयडीकार्ड नवीन बनवायचे आहे, आधार कार्ड लिंक करायचे आहे, अशी थाप मारून आरोपी गारमोडेने या तिघांनाही विश्वासात घेतले. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती विचारून घेतल्यानंतर त्यांच्या कार्डचा गैरवापर करीत आरोपीने त्या आधारे १ लाख, ५४ हजार, ८९७ रुपयांची फ्लिपकार्टवरून मोबाईल खरेदी केली. हे मोबाईल त्याने जालना आणि औरंगाबादमध्ये विकले होते. मेश्राम यांनी तक्रार दाखल केल्यानंतर यशोधरानगरात गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडून त्याची चौकशी सुरू झाली. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर, उपनिरीक्षक जमदडे, नायक सूर्यकांत चांभारे, शिपायी राहुल धोटे यांना आरोपीचे लोकेशन नाशिकला मिळाले. त्यावरून पोलीस पथकाने तेथे जाऊन आरोपीच्या तीन दिवसांपूर्वी मुसक्या बांधल्या.

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
सुहासिनी मेश्राम या पोलीस दलातून निवृत्त झाल्या आहेत. त्यांनाही ठगबाज गारमोडेने बेमालूमपणे गंडा घातला. दरम्यान, अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे जालना तसेच औरंगाबादमध्ये विकलेले ७२,८९९ रुपयांचे दोन मोबाईलही जप्त करण्यात आले. आरोपींकडून आणखी अशाच प्रकारचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.

Web Title: Online cheater has been arrested by cyber cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.