भारतासाठी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक सोपे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:41 PM2019-01-21T13:41:09+5:302019-01-21T13:45:49+5:30

अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक प्राप्त करणे भारतासाठी सोपे नाही, असे मत राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने व्यक केले.

Olympic medal in athletics for India is not easy | भारतासाठी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक सोपे नाही

भारतासाठी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक सोपे नाही

Next
ठळक मुद्देअंजू बॉबी जॉर्जने केले मत व्यक्त राष्ट्रकुल व विश्व स्पर्धेच्या तुलनेत ऑलिम्पिकचा दर्जा वेगळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक प्राप्त करणे भारतासाठी सोपे नाही, असे मत राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने व्यक केले. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेच्या उदघाट्नसाठी अंजू रविवारी नागपुरात आली होती.
पॅरिसमध्ये २००३ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये अ‍ॅथ्लेटिक्समध्ये कांस्यपदक पटकावण्याचा इतिहास घडविणारी अंजू पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाली,‘राष्ट्रकुल व विश्व चॅम्पियनशिपच्या तुलनेत ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथ्लेटिक्समध्ये पदक पटकावणे भारतासाठी सोपे नाही. ऑलिम्पिकचा दर्जा वेगळा असतो.’
याबाबत कारण विषद करताना अंजू म्हणाली,‘तुम्हाला भारतातील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. तुम्हाला देशात अधिक ट्रॅक व सुविधांची गरज आहे.सध्या येथील सुविधा पुरेशा नाहीत. आपले ज्युनिअर खेळाडू निश्चितच चांगली कामगिरी करीत आहेत. आपल्याकडे विश्वविक्रमी भालफेकपटू आहे. त्यामुळे आपल्याला सध्याच भाकीत करता येणार नाही.’
उदयोन्मुख खेळाडू १८ वर्षीय हिमा दासबाबत बोलताना अंजू म्हणाली,‘अल्प वेळात हिमाने बरेच काही मिळवले आहे. तिच्यावर दडपण यायला नको.’
अंजूने प्रतिभावान युवा खेळाडू शंकरचीही प्रशंसा केली. तो क्रीडा पार्श्वभूमी लाभलेल्या कुटुंबातील आहे. त्याने आपली छाप सोडली आहे. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्याने कसून मेहनत घेण्याची गरज आहे.
डोपिंगबाबत बोलताना अंजू म्हणाली,‘डोपिंग दुसरे तिसरे काही नसून गुन्हा आहे. डोपिंगच्या दुष्परिणामांबाबत खेळाडूंना शिक्षित करायला हवे. मलाही डोपिंगाची झळ बसली आहे. त्यामुळे प्रशिक्षकांना दोष देण्यापेक्षा खेळाडूंनी स्वत:च माहिती करुन घ्यायला हवी.’
बेंगळुरूमध्ये अ‍ॅथ्लेटिक्स अकादमी चालवित असलेल्या अंजूने भारतीय प्रशिक्षकांना अधिक प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये पाचव्या स्थानी राहिलेल्या अंजूने भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाची प्रशंसा करताना आता खेळाडूंसाठी शिबिर व स्पर्धांचे आयोजन होत असल्याचे म्हटले.
क्रिकेटच्या तुलनेत कार्पोरेट जगताकडून अ‍ॅथ्लेटिक्सला मदत मिळत नसल्याचे सांगताना ऑलिम्पिक पदक मिळवता न आल्याचे शल्य असल्याचे अंजूने सांगितले.

नागपुरात सुविधांमध्ये सुधारणा व्हायला हवी
अंजू सध्या टॉप्सची (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम) अध्यक्ष व खेलो इंडिया प्रोजेक्टची कार्यकारी सदस्य आहे. नागपूरने लांब पल्ल्याचे चांगले धावपटू दिले असले तरी येथे सुविधांची वानवा आहे. अंजू म्हणाली,‘नागपूर लांब पल्ल्याच्या धावपटूंचे शहर म्हणून ओळखले जाते, पण त्याचसोबत सरकारच्या सहकार्याने येथे सुविधांमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे.’

Web Title: Olympic medal in athletics for India is not easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.