आता सलाईन ‘ऑनलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:48 PM2019-02-11T22:48:59+5:302019-02-11T22:50:24+5:30

सलाईन हे खरे तर उपयुक्त आणि जीवदान देणारे औषध. अनेक आजारांमध्ये याचा वापर अटळ असतो. परंतु रुग्णाला सलाईन लावल्यानंतर सातत्याने त्याकडे लक्ष ठेवावे लागते. सलाईन थांबली तर नाही, संपली तर नाही, हे पाहत राहावे लागते. यावर उपाय म्हणून ‘व्हीएनआयटी सेंट्रल ऑफ एक्सलन्स’ विभागाच्या एमटेक विद्यार्थ्यांनी ही ‘ऑनलाईन’ सलाईन तयार केली आहे. कुतूहल प्रदर्शनात हे उपकरण आकर्षण ठरले.

Now saline 'Online' | आता सलाईन ‘ऑनलाईन’

आता सलाईन ‘ऑनलाईन’

Next
ठळक मुद्दे‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांनी तयार केले अ‍ॅप : कुतूहल प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलाईन हे खरे तर उपयुक्त आणि जीवदान देणारे औषध. अनेक आजारांमध्ये याचा वापर अटळ असतो. परंतु रुग्णाला सलाईन लावल्यानंतर सातत्याने त्याकडे लक्ष ठेवावे लागते. सलाईन थांबली तर नाही, संपली तर नाही, हे पाहत राहावे लागते. यावर उपाय म्हणून ‘व्हीएनआयटी सेंट्रल ऑफ एक्सलन्स’ विभागाच्या एमटेक विद्यार्थ्यांनी ही ‘ऑनलाईन’ सलाईन तयार केली आहे. कुतूहल प्रदर्शनात हे उपकरण आकर्षण ठरले.
विज्ञान भारती, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट व विश्वेश्वरय्या राष्ट्रीय औद्योगिक संस्थानच्या (व्हीएनआयटी)वतीने आयोजित ‘कुतूहल’ या नाविन्यपूर्ण व आगळेवेगळे प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसह नागरिकांची गर्दी उसळली.
‘ऑनलाईन सलाईन’ हे उपकरण विभागाचे डॉ. अविनाश केसकर व डॉ. अश्विनी कोठारी यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आले. अधिक माहिती देताना ‘व्हीएनआयटी’चा विद्यार्थी योगेश नांदूरकर म्हणाला, सलाईन संपल्यावर अनेकदा रक्त ‘रिव्हर्स’ येते, शिरेमध्ये हवा जाऊन गाठ निर्माण होण्याची शक्यता असते, जी पुढे धोकादायक ठरू शकते. यावर हे ‘ऑनलाईन सलाईन’ उपयुक्त ठरते. सलाईन एका ‘डिव्हाईस’शी जोडून यासाठी एक अ‍ॅप तयार करण्यात आले. हे ‘अ‍ॅप’ संबंधित डॉक्टर, परिचारिका किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी डाऊनलोड केल्यास त्यांना सलाईनची स्थिती मोबाईलवर दिसून येते. सलाईन संपण्याच्या स्थितीत आल्यावर ‘व्हाईस मॅसेज’, ‘टेक्स्ट मॅसेज’ देते, संपल्यावर ‘अलार्म’ही वाजतो. हे उपकरण तयार करण्यास मोनाली हिंगणे, योगेश नांदूरकर, रसिका देशपांडे, पूजा मधुमटके, अपर्णा मर्जीवे, रोमा गायल आदींनी सहकार्य केले.
रुट कॅनल ‘लेझर’द्वारे
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंत शल्यशास्त्र विभागाचा स्टॉल्सवर दुखरा दात वाचविण्यासाठी रुट कॅनल कसे केले जाते, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. हे देताना या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी सांगितले, दात किडला की प्रत्येक वेळी ‘रुट कॅनल’च करावे लागते असे नाही. पण दाताची कीड त्याच्या आतील संवेदनाक्षम भागापर्यंत पोहोचून असह्य ठणका लागतो तेव्हा मात्र रुट कॅनल उपचाराने दात वाचवणे शक्य आहे. या रुट कॅनलमध्ये आता ‘लेझर’चाही वापर होऊ लागला आहे; शिवाय ‘एन्डोडॉन्टीक्स मायक्रोस्कोप’मुळे आणखी अचूकता आली आहे. या उपचार पद्धतीमुळे दात काढण्याचे प्रमाण कमी झाले असून आयुष्यमान सुधारले आहे.
अंधांसाठी ‘ब्लाईंड नेव्हीगेशन’
मार्गक्रमण करताना खाचखळग्याचा अचूक शोध घेण्यासाठी ‘पांढरी काठी’अंधांना दिशा देणारी ठरते. परंतु अनेकदा गर्दीच्या ठिकाणी अडचणीचेही जाते. याची दखल घेत ‘व्हीएनआयटी सेंट्रल ऑफ एक्सलन्स’ विभागाच्या एमटेक विद्यार्थ्यांनी ‘ब्लाईंड नेव्हीगेशन’ हे खास उपकरण अंध बांधवांसाठी तयार केले आहे. उजव्या हातात हे उपकरण घातल्यास त्याला लागलेल्या सेन्सर्समुळे पुढे काही आल्यास किंवा खड्डा असल्यास किंवा डोक्यावर काही आल्यास ‘व्हायब्रेट’ करते, आणि पुढीला धोका टाळता येतो. हे उपकरणही डॉ. अविनाश केसकर व डॉ. अश्विनी कोठारी यांच्या मार्गदर्शनात योगेश नांदुरकर, मोनाली हिंगणे, रसिका देशपांडे, पूजा मधुमटके, अपर्णा मर्जीवे, रोमा गायल आदींच्या सहकार्यातून तयार केले आहे.
आत्महत्या की खून, असा लावला तपास
शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. जयराम खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख प्रा. आशिष बडिये यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी तीन दिवस तीन वेगवेगळे घटनाक्रम ‘स्टॉल’वर प्रदर्शित केले. यात सादर केलेली घटना आत्महत्या की खून, असा प्रश्न थेट दर्शकांना विचारला जात होता. त्यावर उत्तर आत्महत्या असावी, असे उत्तर येताच, हे प्रकरण खुनाचे असून आत्महत्या असल्याचा कसा देखावा करण्यात आला, याचे विश्लेषण व पुरावे देताच आश्चर्यव्यक्त करीत होते. ‘लाईट डिटेक्टर’च्या मदतीने खोटे बोलणे कसे पकडता येते याची प्रात्यक्षिकासह प्रा. बडिये यांनी माहिती दिले. त्या मागील कारणेही त्यांनी सांगितली. यासह स्वाक्षरीतून संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे आहे, गुन्ह्याच्या घटनेत बोटांचे ठसे कसे घेतले जातात, कवटीवरील खुणाच्या मदतीने तो पुरुष आहे, की स्त्री, त्याचे वय काय, शरीरात शिरलेली गोळी कोणत्या बंदुकीच्या प्रकारातील आहे, याची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली.

Web Title: Now saline 'Online'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.