Now the road will be prepared by putting the block: Nitin Gadkari | आता ‘ब्लॉक’ टाकून तयार होणार रस्ते : नितीन गडकरी
आता ‘ब्लॉक’ टाकून तयार होणार रस्ते : नितीन गडकरी

ठळक मुद्देरिंगरोडवर सुरू आहे प्रयोगडांबरात काचेचाही वापर, प्लास्टिक व रबरही मिक्स करणार

लोकमत न्यूज नेटवर्क                 
नागपूर : रस्ते बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि पर्यावरणपूरक विकासासाठी आता सिमेंट रोड हे ‘ब्लॉक’ तयार करून बनवण्याबाबतच्या विकल्पावर विचार केला जात आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. नागपुरात तयार होत असलेल्या रिंग रोडवर एका ठिकाणी ३०० मीटरच्या भागात याबाबतचा प्रयोग करण्यात आला असून त्याचे निरीक्षण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपुरात आयोजित इंडिया रोड काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी नवनवीन इनोव्हेशनची (प्रयोगांची) माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नागपुरात नवनवीन प्रयोग केले जात आहे. याच अंतर्गत सिमेंट रोड बनवताना अनेक दिवस लागतात. लोकांना त्रास होतो. त्यामुळे आता एका ठिकाणी सिमेंटचे ‘ब्लॉक’ तयार करून ते आणून एका ठिकाणी फिट करून रस्ता तयार होऊ शकतो. याचा प्रयोग व्हीएनआयटीमध्ये करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाने वेळ आणि पैशाची बचत होईल. दिल्लीत प्रदूषण वाढण्याचे एक मोठे कारण म्हणजे रस्ते बांधकाम हे सुद्धा आहे. या तंत्रज्ञानाने प्रदूषण नियंत्रित होईल. त्याचप्रकारे रस्ते बनवण्यासाठी लागणारा वेळही कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहे. याअंतर्गत डांबरामध्ये रबर आणि प्लास्टिक मिळविले जाणार आहे. डांबरमध्ये १० टक्के मिश्रणाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. आॅस्ट्रेलियातील तज्ञांनी यात काच मिश्रणाला मंजुरी दिली आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल. सोबतच खर्चाचीही बचत होईल. गडकरी यांनी सांगितले की, इनोव्हेशनला साकारण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती बनवण्यात आली आहे. या समितीकडून इनोव्हेशनला साकार केले जाईल.

फ्लोटिंग सोलर पॉवर प्रोजेक्ट
गडकरी यांनी आणखी एका अभिनव प्रयोगाचा उल्लेख करीत सांगितले की, वडगाव धरणाच्या बॅक वॉटरमध्ये फ्लोटिंग सोलर प्रकल्प तयार केला जात आहे. अभियंता जनबंधू यांनी ही संकल्पना साकार केली आहे. यामुळे परिसरातील आदिवासी नागरिकांना शेतीसाठी कृषी पंपाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होत आहे.

मेट्रोच्या एक कोटी वर्गफूट जागेचा व्यावसायिक उपयोग
गडकरी यांनी सांगितले की, मेट्रो रेल्वे प्रकल्पातील एक कोटी वर्गफूट जागेचा व्यावसायिक उपयोग केला जाणार आहे. जर्मनीच्या रादुतांनी रविवारी शहरात होत असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी करून कौतुक केले. त्यांचे म्हणणे होते की, नागपूर मेट्रो ही जगातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प आहे. मेट्रो इलेक्ट्रीक बस, आॅटोने जुळलेली राहील. ९ हजार कोटी रुपयाच्या मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचा पाच टक्के हिस्सा मनपाला द्यायचा आहे. आर्थिकदृष्ट्या ते मनपाला देणे शक्य नाही. त्यामुळे मार्केट आदी विकसित करून मेट्रो हा हिस्सा घेईल. यातून मनपालाही उत्पन्न मिळेल.

‘स्टील फायबर’ने पिलरशिवाय बांधकाम
गडकरी यांनी सांगितले की, बांधकाम खर्च कमी करण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहे. यात आता लोखंडाऐवजी स्टील फायबरचा उपयोग करण्यात येत आहे. याच्या उपयोगाने ३० टक्के खर्च कमी होईल. १०० मीटरपर्यंतच्या बांधकामात पीलर उभारण्याची गरज पडणार नाही. या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी एक टीम मलेशियाला पाठवण्यात आली आहे. तिथे याचा उपयोग केला जात आहे.

बांबूपासून एवीएशन बायोफ्यूल, गडचिरोलीत होणार प्लांट
गडकरी यांनी सांगितले की, बांबूपासून विमानांमध्ये लागणारे बायोफ्यूल इंधन तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहे. पूर्वी जट्रोपापासून हे इंधन तयार करण्यात आले. बोइंग, एअर बस सारख्या कंपन्यांनी या इंधनाच्या उपयोगास मंजुरी दिली आहे. याच धर्तीवर बांबूपासून धिंन बनवण्यास सुरुवात झाली आहे. देहरादून येथील पेट्रोलियम रिसर्च इन्स्टीट्यूटने याला प्रमाणित केले आहे. याचा प्लांट गडचिरोलीमध्ये उभारण्याची योजना आहे. जेणेकरून आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. यामुळे एव्हीएशन फ्यूलच्या आयात खर्चातही कमी येईल. यावर सध्या ३० हजार कोटी रुपये खर्च होत आहेत.

१५ दिवसात तुटणार रेल्वे स्टेशन उड्डाणपूल
रेल्वे स्टेशनसमोर बनलेला उड्डाणपूल तोडण्याचे काम १५ दिवसात सुरु होईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. यानंतर त्या जागेवर रस्ता तयार केला जाईल. त्यामुळे मानस चौक ते रामझुलापर्यंत होणाऱ्या ट्रॅफीक जॅमपासून सुटका मिळेल. याच प्रकारे केळीबाग आणि तुळशीबाग येथील वाहतूक समस्याही लवकरच दूर करण्याची योजना आहे.

नासुप्रची घरे स्वस्त
गडकरी यांनी सांगितले की, पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत नागपूर सुधार प्रन्यास २४०० वर्गफूटाच्या दराने घर बनवत आहे. त्यांनी अधिकाऱ्यांनी हे दर कमी करण्यास सांगितले होे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे दर आता १७०० पर्यंत आले आहेत. ते १२०० वर्गफुटापर्यंत यावेत, असे प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी बिल्डींग कोड बनवले होते. आज हे कोड संपूर्ण देशात मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंडियन अकॅडमी आॅफ इंजिनियरिंगची शाखा नागपुरातही
शहरात देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांच्या शाखा उघडत आहेत. एम्स, लॉ कॉलेज, आयआयएम आदीनंतर आता इंडियन अकॅडमी आॅफ इंजिनियरिंग इन्स्टिट्यूट, नोएडाची शाखा नागपुरात उघडण्यात येणार आहे.

 


Web Title: Now the road will be prepared by putting the block: Nitin Gadkari
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.