आता वाहन परवान्यातून शिक्षणाची अट होणार शिथिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 07:58 PM2019-06-24T19:58:26+5:302019-06-24T20:43:31+5:30

वाहन चालविण्याचा व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी किमान आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण असलेच पाहिजे, अशी अट होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ही अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे आता अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या कुशल चालकांना व्यावसायिक वाहन परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नागपुरात याचा फायदा शेकडो चालकांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Now the relaxation of the vehicle license | आता वाहन परवान्यातून शिक्षणाची अट होणार शिथिल

आता वाहन परवान्यातून शिक्षणाची अट होणार शिथिल

googlenewsNext
ठळक मुद्देअशिक्षित कुशल चालकांना रोजगाराची संधीउपराजधानीतील शेकडो चालकांना मिळणार व्यावसायिक परवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहन चालविण्याचा व्यावसायिक परवाना मिळविण्यासाठी किमान आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण असलेच पाहिजे, अशी अट होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ही अट शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे आता अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या कुशल चालकांना व्यावसायिक वाहन परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. नागपुरात याचा फायदा शेकडो चालकांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दररोज रस्त्यावर नव्या गाड्यांची भर पडत आहे. ‘ऑटोमोबाईल्स’ क्षेत्र कमालीचे वाढत आहे. देशात २२ लाखांहून अधिक वाहन चालकांची गरज आहे. मात्र सरकारच्या आधीच्या नियमानुसार अवजड वाहन परवाना मिळण्यासाठी किमान आठवा वर्ग पास असणे बंधनकारक होते. यामुळे अशिक्षित व्यक्ती व्यावसायिक वाहन परवानापासून वंचित होत्या. दूरदृष्टी आणि देशात उपलब्ध असलेले रोजगार याचा विचार करून, दळणवळण मंत्रालयाने यातील शिक्षणाची अटच शिथिल केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मोटार वाहन नियमावली १९८९ या कायद्यातील सुधारणेसाठी याबाबत थेट अध्यादेशाचा मार्ग निवडला. यामुळे चालक बनण्यासाठी आता पुस्तकी शिक्षणापेक्षा कौशल्याला महत्त्व येणार आहे. देशांतर्गत वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या संधी लक्षणीयरीत्या वाढण्याचीही शक्यता आहे.
१७ लाखांवर पोहचली वाहनांची संख्या
उपराजधानीत वाहनांची संख्याही १७ लाखांवर पोहचली आहे. साधारण दीड व्यक्तीमागे एक वाहन असे हे प्रमाण आहे. यात सर्वात जास्त दुचाकी, कार, ऑटोरिक्षा, कमी वजनांची मालवाहू वाहने, बस, ट्रक आदी वाहने आहेत. प्रवासी व मालवाहतुकीचे नवे पर्याय समोर येत आहे. यात व्यावसायिक परवानासाठी शिक्षणाची अट शिथिल करण्यात येणार असल्याने याचा फायदा उपराजधानीतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील कुशल चालकांना होणार आहे.

तरुणांना रोजगाराच्या संधी-भालेराव 
विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेराव म्हणाले, अनेक अशिक्षित तरुण रोजगार म्हणून ‘चालक’ या व्यवसायाकडे पाहतात. परंतु वाहन परवानासाठी आठवा वर्ग पास,  शिक्षणाची अट असल्याने ते रोजगारापासून मुकायचे. परंतु आता शिक्षणाची अट रद्द होणार असल्याने अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
अशिक्षित कुशल चालकांना संधी मिळणार-खान 
नागपूर ट्रेलर असोसिएशनचे प्यारे खान म्हणाले,  महामार्ग क्षेत्रात चालकांची फार कमतरता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यावसायिक वाहन परवान्यात शिक्षणाची अटच शिथिल केल्याने ही कमतरता दूर होईल. विशेषत: अशिक्षित कुशल चालकांना रोजगाराच्या संधी मिळतील. परिणामी, व्यवसायालाही मदत मिळेल. परवानासाठी लागणारी शिक्षणाची अट शिथिल करण्यासाठी असोसिएशनतर्फे आरटीओला निवेदनही देण्यात आले होते. 
 पुस्तकी शिक्षणापेक्षा वाहन कौशल्याचे प्रशिक्षण आवश्यक -कासखेडीकर
 जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर म्हणाले, व्यावसायिक परवान्यातून शिक्षणाची अट शिथिल करीत असताना, चालकाला वाहन कौशल्याचे प्रशिक्षण देणे, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणेही आवश्यक आहे. यामुळे अपघात कमी होतील. पूर्वीचे अनेक चालक शिक्षित नव्हते, परंतु ते कुशल चालक होते. लोक त्यांच्यावर विसंबून असायचे. नव्या कायद्यामुळे अशा अशिक्षित चालकांना संधी मिळणार आहे. 
कौशल्य असताना परवाना नाही-एजाज अहमद 
 एजाज अहमद मूर्तजा म्हणाला, मॅकेनिक म्हणूनच लहानाचा मोठा झालो. या व्यवसायात असल्याने कारपासून ते जड वाहने चालविण्याचे कौशल्य प्राप्त आहे. परंतु व्यावसायिक वाहन परवानासाठी आठवा वर्ग पास असल्याची अट असल्याने परवाना नाही. कौशल्य असूनही आवडत्या क्षेत्रात रोजगार करता येत नसल्याची खंत होती. परंतु आता शिक्षणाची अट शिथिल होणार असल्याने माझ्यासारख्या अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे.
अर्जच भरता येत नाही-आदे 
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, आठवी नापास असणाऱ्या उमेदवारांना व्यावसायिक वाहन परवान्याचा अर्जच भरता येत नाही. कारण, याचे प्रशिक्षण देणारे ड्रायव्हिंग स्कूल किंवा परवानासाठी ऑनलाईन अर्ज भरताना आठवा वर्ग पास असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. त्याशिवाय समोरील प्रक्रिया पूर्णच होत नाही. व्यावसायिक वाहन परवान्यातून शिक्षणाची अट शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

Web Title: Now the relaxation of the vehicle license

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.