नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैदी होणार आता ‘एमबीए’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 08:42 PM2018-01-19T20:42:40+5:302018-01-19T20:47:23+5:30

नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैदीदेखील ‘एमबीए’ होऊ शकणार आहे. ९ कैद्यांनी ‘ओपनमेट’ ही ‘एमबीए’ प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण केली असून लवकरच ते प्रत्यक्ष अभ्यासक्रमालादेखील प्रवेश घेणार आहेत.

Now the prisoners in Nagpur jail will appear for 'MBA' | नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैदी होणार आता ‘एमबीए’

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैदी होणार आता ‘एमबीए’

Next
ठळक मुद्दे‘इग्नू’चा पुढाकार९ कैदी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण तुरुंगातूनच केला अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकदा क्षणिक रागापोटी हातून गुन्हा घडतो व कारागृहात कैद्याचे आयुष्य जगावे लागते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर कैद्यांना स्वत:ची उपजिविका भागविण्यासाठी काय करावे हा मोठा प्रश्न असतो. कैद्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी ‘इग्नू’च्या माध्यमातून थेट कारागृहातच ज्ञानगंगा पोहोचविण्यात आली. आता तर एक पाऊल पुढे टाकण्यात आले असून मध्यवर्ती कारागृहातील कैदीदेखील ‘एमबीए’ होऊ शकणार आहे. ९ कैद्यांनी ‘ओपनमेट’ ही ‘एमबीए’ प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण केली असून लवकरच ते प्रत्यक्ष अभ्यासक्रमालादेखील प्रवेश घेणार आहेत.
‘इग्नू’तर्फे नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी पूर्व तयारी अभ्यासक्रम, बीए, एमए यासारखे अभ्यासक्रम राबविण्यात येतात. या कैद्यांना तुरुंगातच अभ्यासाचे साहित्य पुरविण्यात येते. ‘इग्नू’ व ‘वायसीएमओयू’च्या माध्यमातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या काही कैद्यांनी ‘एमबीए’ शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली. नव्या नियमांनुसार ‘इग्नू’ची पदवी घेणारे कैदी ‘एमबीए’ प्रवेशासाठी पात्र आहेत. त्यानुसार कारागृहातील ११ कैद्यांनी ‘ओपनमेट’ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केले. ‘इग्नू’तर्फे कैद्यांना प्रवेश परीक्षेचे मोफत मार्गदर्शनदेखील उपलब्ध करुन देण्यात आले. प्रवेश परीक्षेत ‘अ‍ॅप्टिट्यूड’, इंग्रजी भाषा, ‘अ‍ॅनॅलिटिकल स्कील्स’ इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आले होते. यातील ९ कैदी तुरुंगात घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाले. कारागृहात या कैद्यांचा सत्कार करण्यात आला.
‘इग्नू’चे प्रादेशिक संचालक डॉ.पी.शिवस्वरुप, अध्ययन केंद्राचे समन्वयक डॉ.मुकुल बुरघाटे, डॉ.पद्माकर सहारे, डॉ.सुनिल इखरकर, डॉ.तुषार टाले व डॉ.श्यामल रुईकर यांनी कैद्यांना मोफत मार्गदर्शन केले. ‘इग्नू’च्या विशेष अध्ययन केंद्राचे समन्वयक योगेश पाटील यांनी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हतवडे गुरूजी तसेच राजेश वासनिक हेदेखील उपस्थित होते.

शिक्षणातून येईल सकारात्मकता
तुरुंगात शिक्षा भोगून झाल्यानंतर येथील शिक्षण आयुष्यात नेहमी कामाला येईल. या शिक्षणाच्या भरवशावर स्वत:ला सिद्ध करता येईल. शिक्षणामुळे आमच्यातील सकारात्मकता वाढली आहे, असे मत प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणाºया एका कैद्याने व्यक्त केले. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचे पुनर्वसन व्हावे, या विचारातून आम्ही हा पुढाकार घेतला व याला चांगला प्रतिसाद मिळाला ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन डॉ.पी.शिवस्वरुप यांनी केले.

 

Web Title: Now the prisoners in Nagpur jail will appear for 'MBA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस