शासनाच्या टार्गेटवर आता नर्सिंग कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:19 PM2017-11-04T12:19:46+5:302017-11-04T12:26:33+5:30

नर्सिंगचे शिक्षण देणाऱ्या काही ‘एएनएम’, जीएनएम व बीएससी नर्सिंग कॉलेज नियमांना हरताळ फासून या पवित्र कार्यालाच गालबोट लावत आहे. यामुळे हे नर्सिंग कॉलेज कधी नव्हे ते आता राज्य शासनाच्या ‘टार्गेट’वर आले आहेत.

Now the nursing college on the government's targets | शासनाच्या टार्गेटवर आता नर्सिंग कॉलेज

शासनाच्या टार्गेटवर आता नर्सिंग कॉलेज

googlenewsNext
ठळक मुद्देनियमांना हरताळ फासणारे कॉलेज अडचणीतराज्यातील १४ कॉलेजेस्ना बजावली नोटीस

सुमेध वाघमारे ।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नर्सिंगचे शिक्षण देणाऱ्या काही ‘एएनएम’, जीएनएम व बीएससी नर्सिंग कॉलेज नियमांना हरताळ फासून या पवित्र कार्यालाच गालबोट लावत आहे. यामुळे हे नर्सिंग कॉलेज कधी नव्हे ते आता राज्य शासनाच्या ‘टार्गेट’वर आले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने या कॉलेजेस्ची झाडाझडती घेणे सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत २५ कॉलेजची तपासणी झाली असून योतील १४ कॉलेजमध्ये धक्कादायक त्रुटी समोर आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांची मान्यता रद्दही होण्याची शक्यता आहे.
नर्सिगचे ‘आॅक्झिलिअरी नर्सिग अ‍ॅण्ड मिडवाईफ’ (एएनएम), आणि ‘जनरल नर्सिग अ‍ॅण्ड मिडवायफरी’ (जीएनएम) हे अभ्यासक्रम ‘इंडियन नर्सिग कौन्सिल’च्या मान्यतेने तर नाशिक येथील विज्ञान विद्यापीठाच्या मान्यतेने ‘बीएससी’ नर्सिंग हा अभ्यासक्रम राबविला जातो. या क्षेत्रात नोकरीची हमी मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळत आहे. परिणामी, गेल्या सहा-सात वर्षांत राज्यभरात या तिन्ही अभ्यासक्रमाचे कॉलेज मोठ्या प्रमाणात उघडण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीत राज्यात ‘एएनएम’च्या ५०६, ‘जीएनएम’च्या २१७ तर बीएससी नर्सिंगच्या १०५ कॉलेज आहेत. यातील बोटावर मोजण्या इतक्या संस्था सोडल्यास इतर संस्था इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. दहा प्रशिक्षणार्थी परिचर्यांमागे एक पाठ्यनिर्देशक हा नियम असताना कुठे २० तर कुठे ३० परिचर्यांमागे एक शिक्षक आहे. त्यातही अनेकांकडे गुणवत्ता नाही. काही संस्थाचालकांनी आपल्याच नातेवाईकांना शिक्षक म्हणून दाखविले आहे. रुग्णालय, प्रयोगशाळा व वसतिगृहांची अट असताना काही संस्थांकडे या वास्तू केवळ कागदोपत्री आहे.
आर्ट-कॉमर्स सारखे शिकविले जात असल्याने विद्यार्थी प्रात्याक्षिकांपासून दूर आहेत. भरमसाट शुल्क आकारूनही कौशल्यप्राप्त विद्यार्थी घडत नसल्याचे वास्तव आहे. काही नर्सिंग संस्थांनी बोगस विद्यार्थी दाखवून शिष्यवृत्तीच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटल्याचेही उघडकीस आले आहे. या संस्थाच्या कामकाजांना घेऊन तक्रारी वाढल्याने राज्य सरकारने याच्या तपासणीची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमईआर) सोपविले आहे. यामुळे अनेकांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.
धुळ्यातील दोन तर विदर्भातील १२ कॉलेज
नोटीस बजावण्यात आलेल्या नर्सिंग संस्थांमध्ये धुळ्यातील दोन तर विदर्भातील १४ संस्था आहेत. यात पलक नर्सिंग इन्स्टिट्यूट धुळे, सरोजिनी नर्सिंग स्कूल धुळे, राधिका नर्सिंग स्कूल अकोला, महात्मा फुले नर्सिंग स्कूल अकोला, सरस्वती नर्सिंग स्कूल वर्धा, चेतना नर्सिंग इन्स्टिट्यूट वर्धा, जनता नर्सिंग स्कूल वर्धा, डी.पी. नर्सिंग स्कूल अ‍ॅण्ड रिसर्च वर्धा, डायमंड नर्सिंग इन्स्टिट्यूट वर्धा, पार्वतीबाई नर्सिंग स्कूल वर्धा, आशीर्वाद नर्सिंग कॉलेज आॅफ एएनएम भंडारा, पवनराज नर्सिंग स्कूल भंडारा, पूजा नर्सिंग इन्स्टिट्यूट भंडारा व स्पनंदन नर्सिंग कॉलेज भंडारा आदींचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात १५० कॉलेजची तपासणी
‘डीएमईआर’ने मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेजमधील विश्वासू शिक्षकांची चमू तयार करून नर्सिंग कॉलेजची तपासणी सुरू केली आहे. यात नियमबाह्य असलेल्या कॉलेजची नोंदणी रद्द करण्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ८२८ कॉलेजेमधून १५० कॉलेजची तपासणी हाती घेण्यात आली आहे. यात आतापर्यंत २५ कॉलेजची तपासणी झाली असून १४ कॉलेजना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

Web Title: Now the nursing college on the government's targets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य