No water in the river and expense of million rupees! | नदीत नाही पाणी अन् लाखोंची उधळपट्टी!
नदीत नाही पाणी अन् लाखोंची उधळपट्टी!

ठळक मुद्देनागपूर मनपा जलप्रदाय विभागाचा प्रस्ताव : अभ्यासासाठी ‘पीएमसी’वर ९७.६२ लाख खर्च करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळ्यातच कन्हान नदीचे पात्र कोरडे पडले आहे. शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. समस्या सोडविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. असे असतानाही महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने कन्हान नदीतून पाणी उचलून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याच्या प्रकल्प अहवालाचा अभ्यास व विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी महापालिका प्रकल्प प्रबंधन सल्लागार(पीएमसी) यावर लाखो रुपये खर्च करण्याची तयारी के ली आहे. नदीत पाणी नसताना सल्लागारावर लाखोंची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कन्हान नदीपात्रात पाणी नसल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील ‘इन्टेक वेल’मधून पूर्णक्षमतेने पाण्याची उचल करताना अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसात २५ एमएलडी पाणी कमी उचलण्यात आले. यामुळे पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील बहुसंख्य भागाला अपेक्षित पाणीपुरवठा करता आला नाही. खापानजीकच्या कोच्छी गावाजवळ नदीवर बंधारा उभारण्यात आल्याने कन्हान नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. परिणामी दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा होत नाही. हा पाणीपुरवठ्यासाठी धोक्याची इशारा मानला जात आहे.
दरम्यान जलप्रदाय विभागातर्फै स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. या प्रस्तावात जून-जुलै ते डिसेंबर दरम्यान कन्हान नदीत भरपूर पाणी असते. या कलावधीत रोहणा गावाजवळ नदी पात्रातील पाण्याची उचल करुन पेंच प्रकल्पापर्यंत वाहून नेण्यासाठी २३०० मि.मी.व्यासाची जलवाहिनी व तेथून गोरेवाडा व गोधनी जलशुद्धकीरण केंद्रापर्यंत पोहचवण्याचा विचार आहे. याचा अभ्यास करण्यासाठी व संबंधित प्रकल्पाचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी प्रकल्प प्रबंधन सल्लागाराची नियुक्ती करावयाची आहे. याबाबतच्या निविदा काढल्या जातील. त्यानंतर सल्लागाराला ९७ लाख ६२ हजार २१० रुपये अदा करण्यात येतील.
विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी काही नगरसेवक नी कन्हान नदीवर बंधारा उभारण्याची मागणी केली होती. सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावर दोन कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु हा प्रस्ताव विचारात घेतला नव्हता.
टँकरने पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढविला
महापालिकेच्या जलप्रदाय विभागातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे दर निश्चित क रण्यात आले आहेत. निविदा काढून निश्चित दरानुसार काम दिले जाते. ३१ ऑक्टोबर २०१८ला या निविदांचा कालावधी संपला. तो वाढवून ३१ जानेवारी २०१९ पर्यंत करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केला जाणार आहे. यात २ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३२८ रुपये, ३ हजार लिटरच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३५८ रुपये, ४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ३८६ तर ६ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिफेरी ४२४ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.


Web Title: No water in the river and expense of million rupees!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.