‘नो हॉर्न प्लीज’; नागपूर आरटीओची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:53 AM2018-01-09T10:53:42+5:302018-01-09T10:54:04+5:30

गरज नसताना व नको तिथे कर्णकर्कश हॉर्न वाजवून हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर नागपूरने चौकाचौकातील वाहनांना ‘नो हॉर्न प्लीज’चे स्टिकर लावून ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

'No horn please'; Nagpur RTO campaign | ‘नो हॉर्न प्लीज’; नागपूर आरटीओची मोहीम

‘नो हॉर्न प्लीज’; नागपूर आरटीओची मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देवाहनांना लावले स्टिकर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गरज नसताना व नको तिथे कर्णकर्कश हॉर्न वाजवून हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर नागपूरने चौकाचौकातील वाहनांना ‘नो हॉर्न प्लीज’चे स्टिकर लावून ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. सुरुवातीला जागृती व नंतर कठोर कारवाई, अशी ही मोहीम असणार आहे.
शहरातील शांतता झोनसह अनेक चौक कर्णकर्कश ‘हॉर्न’च्या गोंगाटाने नेहमीच गजबजले असते. डोके भंडावून सोडणाऱ्या या ‘हॉर्न’चा वापर नियमाप्रमाणे होणे आवश्यक असताना चौकाचौकात व रस्त्यांवर या नियमाचे उल्लंघनच जास्त होत असल्याचे चित्र आहे. कर्णकर्कश ‘हॉर्न’मुळे लहान मुले व वृद्धांना धोका निर्माण झाला असून, हृदयाचे रुग्णही वाढले आहेत. याबाबत वाहनधारकांमध्ये जागृती करण्यासाठी वाहनाच्या पाठीमागे इंग्रजी शब्दात ‘हॉर्न नॉट ओके’ व मराठी शब्दात ‘हॉर्न नको’ अशाप्रकारचे स्टिकर्स लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली. सोमवारी ‘नो हॉर्न डे’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. आरटीओ शहर कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक, अधिकारी-कर्मचारी याच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरले. सकाळपासून चौकाचौकातील सिग्नलवर थांबलेल्या वाहनांवर स्टिकर लावण्यात आले.
‘लोकमत’शी बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार म्हणाले, गरज नसतानाही ‘हॉर्न’ वाजविण्याच्या घाणेरड्या सवयीमुळे लोक जाणते-अजाणतेपणी इतरांना त्रास देतात. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेक शारीरिक व्याधी जडतात. रक्तदाब वाढणे, कमी ऐकू येणे, मानसिक संतुलन ढळणे यासारख्या शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते. अनावश्यक ठिकाणी हॉर्न वाजविण्याची वाहनधारकांची सवय सुटावी, यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.

Web Title: 'No horn please'; Nagpur RTO campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.