नागपूर विद्यापीठातील एकही महाविद्यालय पूर्णत: दिव्यांग ‘फ्रेंडली’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:03 AM2018-11-16T10:03:55+5:302018-11-16T10:06:40+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आजच्या घडीला पावणेसहाशेहून अधिक महाविद्यालये आहेत. मात्र सर्वच महाविद्यालयांत दिव्यांग विद्यार्थी व कर्मचाऱ्यांबाबत अनास्था दाखविण्यात येत आहे.

No college in Nagpur University is completely ' divyang friendly' | नागपूर विद्यापीठातील एकही महाविद्यालय पूर्णत: दिव्यांग ‘फ्रेंडली’ नाही

नागपूर विद्यापीठातील एकही महाविद्यालय पूर्णत: दिव्यांग ‘फ्रेंडली’ नाही

Next
ठळक मुद्देविद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत अनास्था केवळ ११ टक्के महाविद्यालयांत अंशत: सुविधा

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आजच्या घडीला पावणेसहाशेहून अधिक महाविद्यालये आहेत. यातील अनेक महाविद्यालयांत दिव्यांग विद्यार्थीदेखील शिक्षण घेत आहेत. मात्र सर्वच महाविद्यालयांत दिव्यांग विद्यार्थी व कर्मचाऱ्यांबाबत अनास्था दाखविण्यात येत आहे. ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार विद्यापीठातील केवळ ११ टक्के महाविद्यालयांतच दिव्यांगांसाठी अशंत: सुविधा उपलब्ध आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे एकही पदव्युत्तर विभाग किंवा महाविद्यालय पूर्णत: दिव्यांग ‘फ्रेंडली’ झालेले नाही.
नागपूर विद्यापीठातील काही मोजक्या विभागात व संलग्नित महाविद्यालयांत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. परंतु काही अपवाद सोडले तर महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या व्हिलचेअरसाठी रॅम्प, वरच्या मजल्यावरील वर्गात जाण्यासाठी लिफ्ट, व्हिलचेअरवरून वापरता येण्याजोगे स्वच्छतागृह अशा मूलभूत सुविधा निर्माण करण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसते. १९९५ पासून अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम अस्तित्वात असून,वारंवार सूचना, परिपत्रके काढूनही अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधाच निर्माण केलेल्या नाहीत व विद्यापीठ प्रशासनानेदेखील याची गंभीरतेने दखल घेतली नाही.
नागपूर विद्यापीठात ५८४ संलग्नित महाविद्यालये आहेत. तर विविध पदव्युत्तर विभाग व केंद्र यांची संख्या ४५ इतकी आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीनुसार यापैकी केवळ ११० ठिकाणीच दिव्यांग विद्यार्थी व कर्मचाºयांसाठी अंशत: सुविधा आहेत. यात ६५ महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यापीठाचा एकूण विस्तार लक्षात घेता ही आकडेवारी अतिशय कमी आहे. शहरी भागातदेखील यासंदर्भात उदासिनताच असल्याचे चित्र आहे.

विद्यार्थ्यांची रोजच परीक्षा
महाविद्यालयांत पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांची दररोज परीक्षाच होते.
संलग्नित महाविद्यालयेच नव्हे तर विद्यापीठाची प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन तसेच विद्यापीठाच्या विभागांमध्येदेखील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

या सुविधा असणे आहे अपेक्षित

  • ‘रॅम्प’
  • दिव्यांग ‘फ्रेंडली’ स्वच्छतागृहे
  • व्हिलचेअर्स
  • लिफ्ट
  • साईन बोर्ड
  • इलेक्ट्रॉनिक आॅडीओ अ‍ॅन्ड व्हिडीओ नोटीस बोर्ड
  • व्हाईट केन
  • ब्रेललिपीतील साहित्य


२०२४ पर्यंत कशी वाढणार संख्या ?
यासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बृहत् आराखड्यात यावर भर देण्यात आला आहे. २०२४ पर्यंत १०० संलग्नित महाविद्यालये पूर्णत: दिव्यांग ‘फ्रेंडली’ तर ३५ महाविद्यालयांत अंशत: सुविधा निर्माण करण्यात येतील. मात्र विद्यापीठातील महाविद्यालयांचे एकूण धोरण पाहता खरोखरच ही संख्या वाढेल का, असा प्रश्न उपस्थित होतो.

न्यायालयाच्या नियमांचे पालन नाही
उच्च न्यायालयाने सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयांना दिव्यांगांसाठी प्राथमिक सुविधा पुरवण्याचे आदेश दिले होते. सोबतच केंद्र सरकारनेदेखील सरकारी कार्यालये, विद्यापीठातील कार्यालये, विद्यापीठ परिसर तसेच सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ‘दिव्यांग फ्रेंडली कॅम्पस’ तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात विद्यापीठातच अशा प्रकारचे वातावरण नसल्याचे चित्र आहे. न्यायालयाच्या नियमांचे पूर्णपणे पालनच होत नाही.

Web Title: No college in Nagpur University is completely ' divyang friendly'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.