नागपुरात फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या ९० टक्के महिला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:44 PM2018-01-22T12:44:20+5:302018-01-22T12:44:44+5:30

रस्त्याच्या कडेला विविध वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे नागपूरच्या फूटपाथवर दिसून येतात. मात्र या कुटुंबातील ९० टक्के महिला आजही ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूरच असून अंधश्रद्धेपोटी त्या यांचा वापर टाळत आहेत.

Ninety percent of women who are employed in footpath in Nagpur are far from Sanitary Napkins | नागपुरात फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या ९० टक्के महिला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूर

नागपुरात फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्या ९० टक्के महिला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूर

Next
ठळक मुद्देपांढऱ्या कापडाबाबत अंधश्रद्धेचा पगडा

मेघा तिवारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्याच्या कडेला विविध वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे नागपूरच्या फूटपाथवर दिसून येतात. मात्र या कुटुंबातील महिलांच्या आरोग्याकडे समाज व प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे चित्र आहे. येथील ९० टक्के महिला आजही ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूरच असून अंधश्रद्धेपोटी त्या यांचा वापर टाळत आहेत. त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी फारसा पुढाकार नसल्याने नवीन पिढीदेखील याच मार्गाने जात असल्याचे वास्तव आहे.
‘लोकमत’ने शहरातील महाराज बाग मार्ग, सीताबर्डी, शंकरनगर, रेल्वेस्थानक यासारख्या विविध भागात ‘फूटपाथ’वर राहणाऱ्या महिलांकडून मासिक पाळीदरम्यानच्या आव्हानांबाबत जाणून घेतले. अवघ्या १९ व्या वर्षी २ मुलांची आई झालेल्या सीमाला (नाव बदललेले) यासंदर्भात विचारणा केली असता तिने धक्कादायकच माहिती दिली. ‘मी माझ्या अवघ्या आयुष्यात मासिक पाळीदरम्यान कधीही ‘सॅनिटरी नॅपकिन’चा उपयोग केलेला नाही. या काळात कपडा वापरण्यावरच आमचा भर असतो. ‘पॅड’ वापरणे हे आमच्या संस्कृतीचा भाग नाही. जी देवता कधीही पांढरे वस्त्र परिधान करत नाही, तिच्यावर आमची श्रद्धा आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे ‘सॅनिटरी नॅपकिन’ वापरणे म्हणजे आमच्या श्रद्धेवरच आघात करण्यासारखे आहे’, असे तिने सांगितले.
२०१५-१६ च्या ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’नुसार ४८.५ टक्के (ग्रामीण भाग) व ७७.५ टक्के (शहरी भाग) भारतीय महिला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चा उपयोग करतात. मात्र रस्त्यांवर राहणाऱ्या महिलांमध्ये हे प्रमाण अतिशय अत्यल्प आहे.

चक्क नागनदीत कपड्याची विल्हेवाट
मासिक पाळीत वापरलेल्या कपड्याची विल्हेवाट लावण्याची या महिलांची तऱ्हा तर अतिशय अयोग्य आहे. ज्या महिला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ वापरतात त्या त्यांची विल्हेवाट नागनदीमध्ये करतात. तर कपडेदेखील तेथेच फेकण्यात येतात, अशी माहिती एका महिलेने दिली.

अस्वच्छ कपड्याचा उपयोग धोकादायक
बहुतांश महिलांकडून मासिक पाळीदरम्यान अस्वच्छ कपड्याचा वापर करण्यात येतो. मात्र हा कपडाच आरोग्यासाठी सर्वात धोकादायक ठरु शकतो. मात्र याचीदेखील जाणीव या महिलांना नाही. आपली अंतर्वस्त्रे कपड्याची बनलेली असतात. जर ती धोकादायक नाही, तर मग त्यांचा मासिक पाळीदरम्यान उपयोग अयोग्य कसा, असा प्रश्न एका महिलेने उपस्थित केला. मात्र या कपड्यांमुळे जंतूसंसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. यातून गंभीर आजार होऊ शकतात. जर योग्य स्वच्छता ठेवली नाही, तर कर्करोगदेखील होण्याची शक्यता असते, अशी माहिती वंध्यत्व तज्ज्ञ डॉ.शिवांगी जहागीरदार यांनी दिली.

Web Title: Ninety percent of women who are employed in footpath in Nagpur are far from Sanitary Napkins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य