डिजिटल माध्यमांवर साहित्याचा आकृतिबंध राखणे आवश्यक : वसंत आबाजी डहाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 09:17 PM2019-02-16T21:17:05+5:302019-02-16T21:18:50+5:30

आधुनिक युगाचा बदल स्वीकारून समूह माध्यमे किंवा डिजिटल माध्यमांवर व्यक्त होणे, लेखन करणे ही स्वागतार्ह अशी गोष्ट आहे. मात्र यावर लेखन करताना कथा ही कथेसारखी व कविता ही कवितेसारखी वाटली पाहिजे. आपण काय लिहितो, याचे भान ठेवून लेखन करणे अत्यावश्यक आहे. शिवाय स्वत:चे लेखन योग्य आहे का, याचे संपादन करण्याची जबाबदारीही तुमच्यावरच असते. बंधन नाही म्हणून काहीही आणि कितीही लिहिण्यात अर्थ नाही. डिजिटल माध्यमांवरही लेखन करताना साहित्याचा आकृतिबंध राखला जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत आबाजी डहाके यांनी केले.

Need to have a pattern of material on digital media: Vasant Abaji Dahake | डिजिटल माध्यमांवर साहित्याचा आकृतिबंध राखणे आवश्यक : वसंत आबाजी डहाके

डिजिटल माध्यमांवर साहित्याचा आकृतिबंध राखणे आवश्यक : वसंत आबाजी डहाके

Next
ठळक मुद्देतिसऱ्या नुक्कड साहित्य संमेलनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधुनिक युगाचा बदल स्वीकारून समूह माध्यमे किंवा डिजिटल माध्यमांवर व्यक्त होणे, लेखन करणे ही स्वागतार्ह अशी गोष्ट आहे. मात्र यावर लेखन करताना कथा ही कथेसारखी व कविता ही कवितेसारखी वाटली पाहिजे. आपण काय लिहितो, याचे भान ठेवून लेखन करणे अत्यावश्यक आहे. शिवाय स्वत:चे लेखन योग्य आहे का, याचे संपादन करण्याची जबाबदारीही तुमच्यावरच असते. बंधन नाही म्हणून काहीही आणि कितीही लिहिण्यात अर्थ नाही. डिजिटल माध्यमांवरही लेखन करताना साहित्याचा आकृतिबंध राखला जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत आबाजी डहाके यांनी केले.
डिजिटल माध्यमांवरील लेखकांची साहित्य चळवळ व्यासपीठावर आणणाऱ्या नुक्कड व्यासपीठ व हंगामा बुक डॉट कॉम यांच्यातर्फे आयोजित तिसऱ्या नुक्कड साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. डहाके बोलत होते. याप्रसंगी कथा समीक्षक व अभ्यासक गणेश कनाटे, नुक्कडचे प्रवर्तक विक्रम भागवत, ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने, माधवी वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. डहाके पुढे म्हणाले, समूह माध्यमांवर काहीही लिहून स्वत:ला लेखक, कवी म्हणविणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, मात्र साहित्य लेखन ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी वाचन असणे आणि जगाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.
कथालेखनात वैश्विक जाणीव महत्त्वाची : कनाटे
यावेळी बोलताना गणेश कनाटे यांनी नवकथाकारांच्या उणिवा अधोरेखित केल्या. जगातील उत्तम कथा ज्यांनी लिहिल्या त्यांचे साहित्य शेकडो वर्षांपासून जिवंत आहे. मराठी साहित्यामध्ये जीएंच्या कथा जागतिक दर्जाच्या होत्या. गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर अशा लेखकांचे योगदानही स्मरणात येते. याचे कारण या लेखकांना आसपासच्या समाज वास्तवाची वैश्विक जाण होती. त्यांनी मनोरंजनासाठी, पैसा किंवा प्रसिद्धीसाठी लेखन केले नाही. कथा लिहिताना आपण काय आणि का लिहितो, याची प्रेरणा जाणली पाहिजे. आपण वास्तवाकडे कसे बघतो आणि त्याचे लेखन करताना आपल्या जीवनाची दृष्टी काय आहे, हेही ओळखणे गरजेचे आहे. कथा ही वास्तवाचे प्रतिरुपण आहे व त्यात तर्कतेची व शास्त्राची जोड देणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी पाश्चात्य चिंतनासह आपल्याकडील पारंपरिक साहित्याचा अभ्यास असणेही आवश्यक आहे.
मराठी कथा या जागतिक कथाकारांच्या तुलनेत कमी पडतात, हे वास्तव आहे. कारण आपण चिंतनात कमी पडलो. कथा लेखकाला अर्थकारण आणि तत्त्वज्ञानाचीही जाणीव असणे आवश्यक आहे. कथा लिहीत असल्याने इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चालत नाही. लेखकांच्या भावनेनुसार कथेचा पोत बदलतो. त्यामुळे आत्मभान व विश्वभान राखून कथा लिहिली गेली तर त्याचा पोत सर्वोत्कृष्ट होतो. त्यामुळे पैसा आणि प्रसिद्धीसाठी लेखन करणार असाल तर लिहूच नका, असा सल्लाही कनाटे यांनी दिला. मराठीसह जागतिक लेखकांच्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे, परंपरेतील श्रेष्ठत्त्वाचे मूळ शोधले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
संमेलनाच्या सुरुवातीला जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन स्वाती धर्माधिकारी यांनी केले.
बालचित्रकारांनी रेखाटला कवितांचा भावार्थ
संमेलन परिसरात लागलेले एक चित्रप्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधणारे आहे. ‘एक पान कवितेचे एक पान चित्रांचे’ या शीर्षकांतर्गत चंद्रकांत चन्ने यांच्या मार्गदर्शनात हे प्रदर्शन सजविण्यात आले आहे. विविध कवींच्या कवितांचा भावार्थ सांगणारी चित्रे चन्ने यांच्या बालकलावंतांनी रेखाटली असून हे प्रदर्शन आकर्षक ठरले आहे.

 

Web Title: Need to have a pattern of material on digital media: Vasant Abaji Dahake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.