नागपुरातील बहुसंख्य स्कूलबस ‘जीपीएस’ विनाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:25 PM2018-01-13T22:25:27+5:302018-01-13T22:27:06+5:30

नागपुरातील स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा लावण्याचा सूचना स्वत: पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. परंतु मोजक्या काही शाळा सोडल्यास बहुसंख्य स्कूलबसमध्ये ही यंत्रणाच लागली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nagpur's majority school bus have not 'GPS' system ! | नागपुरातील बहुसंख्य स्कूलबस ‘जीपीएस’ विनाच !

नागपुरातील बहुसंख्य स्कूलबस ‘जीपीएस’ विनाच !

Next
ठळक मुद्देसूचनांचे पालन नाही : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शालेय बसमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेग नियंत्रक बसविण्याबाबत दिल्ली सीबीएसईकडून सुधारित मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. नागपुरातील स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा लावण्याचा सूचना स्वत: पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. परंतु मोजक्या काही शाळा सोडल्यास बहुसंख्य स्कूलबसमध्ये ही यंत्रणाच लागली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, ज्या स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही व जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे त्याचा खर्च हा पालकांवर टाकला जात आहे. वर्षाला एक हजार रुपये मोजावे लागत असल्याने या यंत्रणेला घेऊन पालकांमध्येही उदासीनता असल्याचे दिसून येते.
‘सीबीएसई’च्या परिपत्रकानुसार, स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि जीपीएस प्रणाली बंधनकारक आहे. ही उपकरणे कायम चालू स्थितीत असावीत व याचे चित्रीकरण मुख्याध्यापकांसह संबंधित पालकांच्या मोबाईलमध्ये दिसण्याची व्यवस्था करण्याच्याही सूचना आहेत. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी यासंदर्भातील सूचना दिल्या होत्या. प्रायोगिक स्तरावर शहरातील पाच मोठ्या शाळांच्या बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु नवे शैक्षणिक सत्र संपायला आले असताना मोजक्याच बसमध्ये ही यंत्रणाच लागलेली आहे. सूत्रानुसार, शाळांकडूनच याला प्रतिसाद मिळत नसल्याने ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित होत नसल्याचे चित्र आहे.
पालकांच्या मोबाईलवर माहिती
स्कूलबसमधील ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे स्कूलबस कुठे आहे, कुठे थांबलेली आहे, याची माहिती पालकांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार होती. विशेष म्हणजे, बस येण्याच्या पाच मिनिटांपूर्वी व शाळा सुटल्यानंतर मुलांना निर्धारित ठिकाणी सोडण्याच्या वेळेआधी पाच मिनिटांपूर्वी पालकांना संदेशही यातून मिळणार होते. तर स्कूलबसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मुख्याध्यापकांच्या कक्षात दिसणार होते. परंतु तूर्तास तरी प्रायोगिकस्तरावरच यावर काम सुरू आहे.
 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व जीपीएस यंत्रणा लावण्याच्या सूचना आहेत. याची अंमलबजावणी शाळांना करायची आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक स्कूलबसमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असणे गरजेचे आहे.
- रवींद्र भुयार
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Nagpur's majority school bus have not 'GPS' system !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.