Nagpur's dashing lady brings shame to the smugglers | नागपूरच्या डॅशिंग लेडी उषाने आणले तस्करांच्या नाकीनऊ

ठळक मुद्देवर्षभरात २७ दारु तस्करांचा बंदोबस्त

दयानंद पाईकराव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: वडील खासगी संस्थेत चालक म्हणून कामाला. आई गृहिणी. लहाणपणापासून खाकी वर्दी घालण्याची इच्छा उषाच्या मनात होती. त्यानुसार जीवापाड मेहनतही केली. विविध स्पर्धा गाजवून मेडल पदरात पाडले. मेहनतीच्या भरवशावर रेल्वे सुरक्षा दलात नोकरी मिळविली. नोकरी करताना उषाने इमानदारीने आपले कर्तव्य बजावत तस्करांच्या नाकीनऊ आणले. मागील वर्षभराच्या कालावधीत तिने २७ दारू तस्करांसह प्रवाशांचे साहित्य पळविणाऱ्या अन् गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींचा बंदोबस्त करून त्यांच्या नाकीनऊ आणले आहे.
उषा तिग्गा असे या आरपीएफमधील ‘डॅशिंग लेडी’चे नाव आहे. उषाचे आईवडील मूळचे छत्तीसगडमधील. घरची परिस्थिती बेताची असतानाही उषाने एम.ए. (लायब्ररी सायन्स), एम. ए. (एशियन इंडियन हिस्ट्री कल्चर अँड आर्केलॉजी) पर्यंत शिक्षण घेतले. केवळ शिक्षणच न घेता १०० मिटर रनिंग, लाँग जम्प, शॉटपुट, थालीफेक, भालाफेक, रिले दौड या स्पर्धातही तिने बाजी मारली. रिले दौडमध्ये बेंगळुरु, गोवा आणि म्हैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक पटकावला तर शॉटपुट, थालीफेक आणि भालाफेकच्या राज्यस्तरीय स्पर्धेत मेडल मिळविले. इंटर रेल्वेच्या १०० मिटर रनिंग स्पर्धेत विशाखापट्टणम येथे बेस्ट अ‍ॅथ्लिटचा किताबही मिळविला. आपल्या मेहनतीने उषा रेल्वे सुरक्षा दलाच्या नोकरीत पात्र ठरली. नोकरीतही आजपर्यंत तिने अनेक महत्त्वाच्या कारवाया केल्या आहेत. यात प्रवाशांचे मोबाईल, महागडे साहित्य, ट्रॉलीबॅग पळविणाऱ्या अनेक चोरट्यांना तिने रंगेहाथ पकडून संबंधित प्रवाशांना त्यांचे साहित्य परत केले.
दारूची तस्करी पकडणे हे रेल्वे सुरक्षा दलाचे नव्हे तर लोहमार्ग पोलिसांचे काम आहे. परंतु ड्युटी करताना मागील वर्षभरात तब्बल २७ वेळा दारूची तस्करी पकडून उषाने रेल्वे सुरक्षा दलाची मान उंचावण्याचे काम केले. यात गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या बांधण्यात उषाला यश मिळाले. रेल्वेस्थानकावर अनेकदा घरून पळून आलेले बालक आढळतात. ते असामाजिक तत्त्वांच्या हाती लागल्यास त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. परंतु अशा अल्पवयीन २२ मुले आणि ३ मुलींना उषाने सुखरुप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले. तिची जिद्द, मेहनत पाहून रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा हे सुद्धा नेहमीच तिला प्रोत्साहन देतात.


Web Title: Nagpur's dashing lady brings shame to the smugglers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.