नागपुरातील महाठग बघेल मध्य प्रदेशात सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:17 AM2018-01-14T00:17:19+5:302018-01-14T00:21:49+5:30

विविध ठिकाणी साई प्रकाश प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने शाखा सुरू करून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात ठगबाज पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल याच्या मध्य प्रदेशात जाऊन गुन्हे (आर्थिक) शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या.

Nagpurian cheater Baghel has been found in in Madhya Pradesh | नागपुरातील महाठग बघेल मध्य प्रदेशात सापडला

नागपुरातील महाठग बघेल मध्य प्रदेशात सापडला

Next
ठळक मुद्देहजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडागुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध ठिकाणी साई प्रकाश प्रॉपर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने शाखा सुरू करून हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात ठगबाज पुष्पेन्द्रसिंग कृष्णप्रतापसिंग बघेल याच्या मध्य प्रदेशात जाऊन गुन्हे (आर्थिक) शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या.
बघेल याने जयपूर (राजस्थान) मध्ये सर्वप्रथम आपल्या कंपनीचे कार्यालय उघडले होते. २०१० मध्ये त्याने धंतोलीतील भिवापूरकर चेंबरमध्येही शाखा सुरू केली. आपल्या कंपनीत मासिक आणि वार्षिक मुदतीत हप्त्याने रक्कम जमा करायची. मुदतीनंतर दीडपट रक्कम आणि अपघाती विमा क्लेम देण्यात येतो, असे तो सांगत होता. फिक्स डिपॉझिट केल्यास साडेपाच वर्षांत दुप्पट आणि नऊ वर्षांत तिप्पट परतावा मिळेल, असा दावा केला जात होता. गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणात एजंट नेमले होते. बँकेत रक्कम गुंतविल्यास दुप्पट रक्कम मिळायला आठ वर्षे लागतात, असे सांगून एजंट गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढायचे. स्वत: बघेल मोठ्या थाटामाटात सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना आकर्षित करायचा. अशा प्रकारे त्याने हजारो गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीत रक्कम जमा करायला बाध्य केले आणि कोट्यवधी रुपये जमा करून आरोपीने नागपुरातून गाशा गुंडाळला. २०१६ मध्ये त्याने कंपनीला टाळे लावले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा पहिला गुन्हा नंदा विष्णू गोणेकर यांच्या तक्रारीवरून जरीपटका ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर फसवणूक झालेल्यांची संख्या वाढल्याने तो गुन्हे शाखेत वर्ग करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बी. एस. नरके यांनी आरोपी बघेलचा कसून तपास केला. तो मध्य प्रदेशातील ग्राम सेमरपाखा, ब्योहारी (जि. शहडोल) मध्ये दडून असल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या (आर्थिक) पथकाने त्याच्या तेथे जाऊन मुसक्या बांधल्या. ११ जानेवारीला त्याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करून त्याचा १७ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे.
विदर्भात अनेकांची फसवणूक
महाठग बघेल याने नागपूरच नव्हे तर गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि अकोला या ठिकाणीसुद्धा शाखा उघडल्या होत्या. तेथेही त्याने शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची चर्चा आहे. पीडितांनी गुन्हे शाखेत संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Nagpurian cheater Baghel has been found in in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.