नागपुरात यापुढे एक दिवसाआड मिळेल पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:10 AM2019-07-16T10:10:42+5:302019-07-16T10:13:13+5:30

उपराजधानीवर पाणीसंकटाचे ढग दाटले आहेत. पहिल्यांदाच शहरात पाणीकपात होणार असून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. येत्या बुधवार, शुक्रवार व रविवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा होणार नाही.

In Nagpur, water will get on alternate days | नागपुरात यापुढे एक दिवसाआड मिळेल पाणी

नागपुरात यापुढे एक दिवसाआड मिळेल पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देमान्सूनने पाठ फिरविल्याने निर्णयबुधवार, शुक्रवार व रविवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मान्सूनने पाठ फिरविल्यामुळे उपराजधानीवर पाणीसंकटाचे ढग दाटले आहेत. पहिल्यांदाच शहरात पाणीकपात होणार असून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. येत्या बुधवार, शुक्रवार व रविवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा होणार नाही. या कालावधीत टँकरदेखील चालणार नाहीत. मनपा प्रशासन व सत्तापक्षाच्या आशा आता संपूर्णपणे मान्सूनवर केंद्रित झाल्या आहेत. जर योग्य प्रमाणात पाऊस आला तर स्थिती सामान्य होईल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र जर असे झाले नाही तर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय पुढेदेखील लागू करण्यात येणार आहे. यासंबंधात २२ जुलै रोजी परत बैठक बोलविण्यात आली आहे. यात पुढील निर्णय घेण्यात येईल.
भीषण उन्हाळ््याचा सामना करत मे आणि जून महिने गेले. या काळात पाणीकपात झाली नाही. मात्र जुलै महिन्यापर्यंत आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा न होऊ शकल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. येणारा काळ नागपूरकरांसाठी फारसा सुखद राहणार नसल्याचीच ही चिन्हे आहेत. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनीदेखील वर्तमान स्थिती ही सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी अनुकूल नसल्याचे मान्य केले आहे. जर मान्सूनची पाठ कायम राहिली तर येत्या काळात स्थिती आणखी वाईट होऊ शकते.
पाणीपुरवठ्यासंदर्भात सोमवारी मनपाच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, जलप्रदाय समिती सभापति पिंटू झलके, अपर आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी यांच्यासह ओसीडब्लूचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत तोतलाडोह आणि नवेगाव खैरी येथील पाणीसाठ्यावर चर्चा झाली. जर मान्सूनचा पाऊस लवकर सुरू झाला नाही तर पाणीपुरवठा संकटात येऊ शकतो, त्यामुळे एक दिवसाआड पाणी दिले पाहिजे, असे सर्वांनीच मान्य केले. १५ जुलैपर्यंत नागपूर शहर व आजुबाजूच्या क्षेत्रात २८ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर तोतलाडोह येथे पाण्याचा संचय शून्य पातळीपर्यंत पोहोचला आहे. अशा स्थितीत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात अडचण येत आहे. यामुळेच बुधवार (१७ जुलै), शुक्रवार (१९ जुलै), रविवार २१ जुलै रोजी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. हा निर्णय सखोल विचार करून घेण्यात आला आहे. याअगोदर कधीच पाणी कपात झाली नाही. मात्र जलाशयातच पाणी उपलब्ध नाही. जर पाऊस आला तर या निर्णयावर फेरविचार करण्यात येईल. सद्यस्थितीत शहरात ६५० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे, अशी माहिती संदीप जोशी यांनी दिली.

अनेक पर्यायांवर विचार झाला : झलके
जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले की पाणीपुरवठा ६५० हून कमी करुन ३५० एमएलडी करण्यावर विचार झाला. मात्र त्यात मंगळवारी व लक्ष्मीनगर झोन मध्येच पाणीपुरवठा होऊ शकला असता. त्यामुळेच एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला. जर पाऊस झाला तर निर्णय बदलण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाणी व्यवस्थापनात मनपा अपयशी : वनवे
मनपाजवळ आवश्यक प्रमाणात पाणी होते, मात्र त्याचे योग्य व्यवस्थापन होऊ शकले नाही. यामुळेच आता कधी नव्हे ती पाणीकपातीची वेळ आली आहे. नागपूरच्या इतिहासात असे अगोदर कधीही झाले नाही. पाणीपुरवठा थोडा मर्यादित करून तसेच लिकेजच्या माध्यमातून वाया जाणारे ३०० एमएलडी पाणी वाचवून पाणीसंकटाचा सामना करता आला असता, असे प्रतिपादन मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केले.

२० जुलैपर्यंत पावसाची चिन्हे नाहीत
हवामान खात्याच्या अंदाजानुसार २० जुलैपर्यंत नागपूर व आजुबाजूच्या क्षेत्रात पावसाची चिन्हे नाहीत. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दबावाचे क्षेत्र व चक्रीवादळाच्या भरवशावर मध्य भारतात पाऊस होतो. सद्यस्थितीतील पावसामुळे मान्सूनचा ‘बॅकलॉग’ भरुन निघालेला नाही.

तोतलाडोहमध्ये शून्य स्टॉक
तोतलाडोह तलाव क्षेत्रात मागील वर्षी ३९४ मिमी पाऊस झाला होता. मात्र या वर्षी १५८ मिमी पाऊस झाला आहे. त्याप्रकारे नवेगाव खैरी येथे मागील वर्षी ५३६ मिमी पाऊस झाला. यंदा केवळ १७२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. तोतलाडोहमध्ये वर्तमान स्थितीत पाण्याचा ‘स्टॉक’ शून्य आहे. मागील वर्षी १५ जुलैपर्यंत तोतलाडोहमध्ये १३६.५६८ एमएमक्यूब म्हणजेच १३.४३ टक्के पाणी होते. ‘डेड स्टॉक’मधून मनपाने ३० एमएमक्यूब पाणी उचलले. त्यामुळे आता पाणी घेण्याची स्थिती शून्य झाली आहे. याच तलावाच्या आधारावर शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा होतो. यावेळी नागपूर शहर व जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत २८ टक्के कमी पाऊस झाला आहे.

 

Web Title: In Nagpur, water will get on alternate days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.