Nagpur University's Study Board Elections in April | नागपूर विद्यापीठ अभ्यास अभ्यासमंडळांच्या निवडणुका एप्रिलमध्ये

ठळक मुद्दे२२ अभ्यास मंडळे राहणार अध्यक्षाविना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता अभ्यासमंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अभ्यासमंडळावर कुलगुरूंकडून प्रत्येक सहा जणांचे नामनिर्देशन केले जाणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणुका होतील. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठातील २२ अभ्यासमंडळात एकही उमेदवार निवडून आलेला नसल्यामुळे ही मंडळे अध्यक्षाविना राहणार आहेत.
नागपूर विद्यापीठात एकूण ७३ अभ्यासमंडळे आहेत. यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये निवडणुकादेखील झाल्या होत्या. ४४ अभ्यासमंडळांवर प्रत्येकी तीन जण निवडून आले होते, तर २२ अभ्यासमंडळांवर एकही पात्र उमेदवारच सापडला नव्हता. उर्वरित नऊ अभ्यासमंडळांवर तीनहून कमी उमेदवार निवडून आले. प्रत्येक अभ्यासमंडळावर कुलगुरू सहा उमेदवारांचे नामनिर्देशन करणार आहे. त्यातील एक उमेदवार हा विद्यापीठाच्या विभागातील असेल तर उर्वरित जण संलग्नित व संचालित महाविद्यालयातील असतील. यांच्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड होईल व अभ्यासमंडळाची स्थापना होईल. त्यानंतर सदस्य अभ्यासमंडळावर आणखी पाच जणांची नियुक्ती करू शकतील, असे विद्यापीठ कायद्यात स्पष्टपणे नमूद आहे.
विद्यापीठात एकूण ४४ अभ्यासमंडळं स्थापन होतील व तेथे अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल, तर २२ ठिकाणी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाही.

कायद्याचा फटका
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ नुसार अभ्यासमंडळांसाठी असलेली पात्रता अनेक प्राध्यापकांकडे नसल्याचा फटका बसतो आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार निवडला जाणारा अध्यक्ष पदव्युत्तर शिक्षक म्हणून १० वर्षांचा अनुभव, त्याच्याद्वारे दोन विद्यार्थ्यांना पीएच.डी.चे मार्गदर्शन आणि तीन संशोधन पुस्तक प्रकाशित करणे आदी निकषांचा समावेश आहे. शिवाय विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातही १० वर्षे अनुभव आणि इतर निकषांची पूर्तता करणारे प्राध्यापक बरेच कमी आहेत. त्यामुळे २२ अभ्यासमंडळावर एकही सदस्य नेमता येणे अशक्य झाले. त्यामुळे या मंडळावरील अध्यक्षपद रिक्त राहणार आहे.


Web Title: Nagpur University's Study Board Elections in April
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.