नागपूरच्या व्यापाऱ्यांकडे ७०० कोटींचा एलबीटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 08:50 PM2018-06-20T20:50:50+5:302018-06-20T20:51:00+5:30

एकीकडे महापालिकेची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसताना दुसरीकडे एलबीटीचे सुमारे ७०० कोटी रुपये व्यापाऱ्यांकडे थकीत आहेत. अद्यापही ४० हजार व्यापारांचा डेटा मनपाकडे आला नाही. एलबीटीचे लेखाशीर्ष बंद करणे आवश्यक आहे. यासाठी आता महापालिकेने एलबीटीची थकीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.

Nagpur traders yet to pay Rs. 700 crore of local body tax | नागपूरच्या व्यापाऱ्यांकडे ७०० कोटींचा एलबीटी थकीत

नागपूरच्या व्यापाऱ्यांकडे ७०० कोटींचा एलबीटी थकीत

Next
ठळक मुद्देतोडगा काढण्यासाठी शिबिर : एनव्हीसीसीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे महापालिकेची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसताना दुसरीकडे एलबीटीचे सुमारे ७०० कोटी रुपये व्यापाऱ्यांकडे थकीत आहेत. अद्यापही ४० हजार व्यापारांचा डेटा मनपाकडे आला नाही. एलबीटीचे लेखाशीर्ष बंद करणे आवश्यक आहे. यासाठी आता महापालिकेने एलबीटीची थकीत प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. व्यापारी आणि अधिकाऱ्यांच्या समन्वयातून एलबीटीची संपूर्ण प्रकरणे निकालात काढण्यासाठी विशेष शिबिरे लावण्यात आली आहेत.
महापालिकेतर्फे एलबीटीची थकीत प्रकरणे निकालात काढण्यासाठी नागविदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या सहकार्याने सिव्हिल लाईनस्थित त्यांच्या कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी सभापती प्रगती पाटील, नगरसेवक निशांत गांधी, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, नागविदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी, माजी अध्यक्ष प्रकाश मेहाडिया उपस्थित होते. यावेळी कुकरेजा म्हणाले, अर्थसंकल्पापूर्वी विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर त्यांच्याच पुढाकाराने सदर शिबिर लावण्यात आले. एलबीटी जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा तो समजण्यात व्यापाऱ्यांनाही अडचणी गेल्या. त्यामुळेच प्रलंबित प्रकरणांची स्थिती उद्भवली. व्यापारी चुकीच्या भावनेने व्यवसाय करीत नाही, हे अधिकाऱ्यांनी ध्यानात ठेवून या शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी समजावून घ्याव्यात. त्यांची प्रलंबित प्रकरणे या शिबिरातच मिटवावी, असे निर्देश त्यांनी दिले. या शिबिराच्या माध्यमातून वसुली होईल, त्यासाठी व्यापारी आणि अधिकारी सहकार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मनपा अर्थसंकल्पापूर्वी व्यापाऱ्यांनी मनपाकडून ज्या अपेक्षा व्यक्त केला त्याचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. बाजार परिसरातील कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे नियमित खुली राहावी यासाठी आपण स्वत: पेट्रोलपंप मालकांना पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम म्हणाले, स्थानिक संस्था कर भरणे ही व्यापाऱ्यांसाठी आवश्यक बाब आहे. सर्व प्रलंबित प्रकरणांवर कायद्याच्या चौकटीत राहून तोडगा काढण्याचा मनपाचा प्रयत्न राहील. मनपाचे अधिकारी, कर्मचारी नियमांच्या अधीन राहून व्यापाऱ्यांचे समाधान करण्यासाठीच येथे आले आहेत. या शिबिराचा लाभ अधिकाधिक व्यापाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकातून नागविदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी यांनी भूमिका मांडली. व्यापाऱ्यांनी नेहमीच शासकीय नियमांचे पालन केले आहे. नागपूर महानगरपालिका ही आपली संस्था आहे. त्यामुळे मनपाला सहकार्य करणे हे व्यापाऱ्यांचे कर्तव्यच आहे. या शिबिराच्या माध्यमातून सारीच प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. संचालन नागविदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे सचिव संजय अग्रवाल यांनी केले. आभार फारुखभाई अकबानी यांनी मानले. कार्यक्रमाला नागविदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, राजू व्यास, अश्विन मेहाडिया, सहसचिव रामअवतार तोतला, उमेश पटेल, गिरीश मुंधडा, जनसंपर्क अधिकारी जब्बार झाकीर, बडी मारवाड माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष पुरुषोत्तम मालू, स्टील अ‍ॅण्ड हार्डवेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश लखोटिया उपस्थित होते.
शिबिराचा अवधी २७ जूनपर्यंत
 एलबीटी शिबिराचा कालावधी २० जून ते २७ जून असा असून शनिवार आणि रविवार या सुट्यांच्या दिवशीही व्यापाऱ्यांच्या सोईसाठी शिबिर सुरू राहील. या शिबिरात झोननिहाय काऊंटर लावण्यात आले आहेत. शिबिरात एलबीटीची अपीलमध्ये असलेली प्रकरणे, असेसमेंट आॅर्डर प्राप्त झाला नसेल अशी प्रकरणे, असेसमेंट संदर्भातील प्रलंबित प्रकरणे आदी निकालात काढण्यात येतील.

 

Web Title: Nagpur traders yet to pay Rs. 700 crore of local body tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.