नागपूर मनपात तिकीट मशीन खरेदीचा घोटाळा गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:17 AM2018-10-16T01:17:03+5:302018-10-16T01:19:07+5:30

महापालिकेच्या परिवहन समितीचा कुठलाही प्रस्ताव नसताना, तसेच परिवहन विभागाने कुठल्याही निविदा न काढता शहर बससाठी ८०० इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनची वर्षभरापूर्वी खरेदी करण्यात आली होती. तब्बल दोन कोटींच्या या ईटीएम मशीनच्या खरेदीत घोटाळा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Nagpur NMC ticket machine scam | नागपूर मनपात तिकीट मशीन खरेदीचा घोटाळा गाजणार

नागपूर मनपात तिकीट मशीन खरेदीचा घोटाळा गाजणार

Next
ठळक मुद्देनिविदा न काढताच खरेदी : सभागृहात चर्चेसाठी प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीचा कुठलाही प्रस्ताव नसताना, तसेच परिवहन विभागाने कुठल्याही निविदा न काढता शहर बससाठी ८०० इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनची वर्षभरापूर्वी खरेदी करण्यात आली होती. तब्बल दोन कोटींच्या या ईटीएम मशीनच्या खरेदीत घोटाळा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विशेष म्हणजे परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप संबंधितावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेत कुठलीही खरेदी करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते. स्थायी समितीची मान्यता घेऊन निविदा काढल्या जातात. पण परिवहन विभागासाठी इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनची खरेदी करताना कुठलेही नियम पाळण्यात आलेले नाहीत. परिवहन विभागाने परस्पर मुंबई येथील एका कंपनीकडून या ईटीएम मशीन्स खरेदी केल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची शक्यता असल्याचा आरोप नगरसेवक संदीप सहारे यांनी केला असून, याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करणार आहेत.
नागपूर मनपाने शहर परिवहन बससाठी नियमबाह्य पद्धतीने ८०० ईटीएम मशीन्स खरेदी केल्या. विशेष म्हणजे जुन्या ६०० मशीन्स असताना नवीन मशीन्सची खरेदी करण्यात आली. भविष्यात नागपूर मेट्रो आणि स्टार बससाठी एकच कार्ड असणार आहे. असे असतानाही नव्या ८०० ईटीएम खरेदीचा उद्देश काय होता, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
या प्रकरणामुळे आधीच आर्थिक डबघाईला आलेल्या नागपूर महापालिकेला मात्र मोठे नुकसान सहन करावे लागले. नियमाने निविदा काढून या मशीन्सची खरेदी झाली असती तर कंत्राटदारांमध्ये स्पर्धा वाढून महापालिकेच्या पैशांची बचत झाली असती, अशी चर्चा नगरसेवक करीत आहेत.

Web Title: Nagpur NMC ticket machine scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.