नागपूर खासदार महोत्सव : हेमामालिनींच्या नृत्यनाटिकेने रसिक भावविभोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:35 AM2018-12-17T10:35:21+5:302018-12-17T10:36:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय हिंदू जनमानसात दुर्गा मातेचे अनेक रूप कायम श्रद्धेने पुजले जाणारे आहेत. पती भगवान ...

Nagpur Festival: Hema Malini's dance drama mesmerizes | नागपूर खासदार महोत्सव : हेमामालिनींच्या नृत्यनाटिकेने रसिक भावविभोर

नागपूर खासदार महोत्सव : हेमामालिनींच्या नृत्यनाटिकेने रसिक भावविभोर

googlenewsNext
ठळक मुद्दे‘दुर्गा’रूपी आविष्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय हिंदू जनमानसात दुर्गा मातेचे अनेक रूप कायम श्रद्धेने पुजले जाणारे आहेत. पती भगवान शिवाच्या अपमानाने अग्नीत स्वत:ला अर्पण करणारी सती, दुसऱ्या जन्मात शिवाची आराधना करून त्यांचे सानिध्य प्राप्त करणारी देवी पार्वती आणि पुढे रौद्र रुप धारण करून महिषासुराचा वध करणारी दुर्गा. मॉ दुर्गेच्या या विविध रुपांची ओळख बनलेले नाव म्हणजे ड्रीमगर्ल (स्वप्नसुंदरी) अर्थात अभिनेत्री, नृत्यांगना व खासदार हेमा मालिनी. देवी दुर्गाचे प्रेम, कारुण्य आणि रौद्र रुप दर्शविणारे चेहऱ्यावरील मोहमयी हावभाव आणि विविध अवतारातील अभिनयाला साजेसे पदलालित्य नजाकतीने ठेवत ही अभिनेत्री देवी दुर्गा अतिशय ताकदीने उभी करते, तेव्हा दर्शक अगदी ध्यान लागल्यासारखे हे रुप मंत्रमुग्ध होऊन पाहत असतात. या अभिनेत्रीच्या साभिनय नृत्याची जादू नागपूरकर रसिकांनी ‘दुर्गा’ या नृत्यनाटिकेच्या माध्यमातून अनुभवली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात रविवारी हेमा मालिनी यांच्या दुर्गा या नृत्यनाटिकेचे सादरीकरण झाले. अद््भूत असामान्य व अविस्मरणीय म्हणावी अशी त्यांची नृत्यनाटिका दुसºयांदा या महोत्सवात सादर झाली. प्रेक्षकांची भरगच्च उपस्थिती पाहता या वयातही हेमा मालिनी यांच्या मोहमयी रुपाची आणि दुर्गा अवतारातील साभिनय नृत्याची जादू कायम असल्याची जाणीव होते. गणेश वंदनेने सुरुवात झाल्यानंतर भगवान शिवाच्या पत्नीच्या रुपातील आनंदमय ‘सती’ अवतार दर्शकांसमोर येतो.
आमंत्रण आले नसतानाही शिवजींना आग्रह करून पिता राजा दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञात ती सामील होते. मात्र यावेळी पतीच्या अपमानाने निराश होऊन स्वत:ला यज्ञाच्या अग्निकुंडात झोकून देते. प्रिय पत्नीच्या अकस्मात विरहाने व्याकुळ आणि क्रोधित झालेले शिव तांडव करून यज्ञ नष्ट करतात. भगवान शिवाच्या वेगवेगळ्या रुपाचेही दर्शन यावेळी दर्शकांना होते. पुढे दुसऱ्या जन्मात सती ही पार्वतीच्या रुपात पर्वत राजाच्या पोटी जन्माला येते. उन, पाऊस व थंडी याची तमा न करता शिवाची आराधना करते व अखेर त्यांना प्राप्त करून विवाह होतो. देवीचे हे दोन्ही रुप दर्शक संमोहित होऊन पाहत असतात.
नृत्यनाटिकेच्या दुसऱ्या भागात देवी दुर्गा मातेच्या रुपात दर्शकांसमोर येते. महिषासूर राक्षसाच्या क्रूर प्रवेशाने नाटिकेचा हा भाग सुरू होतो. त्याच्या अत्याचाराने आक्रोशित झालेली जनता व देवगण देवी पार्वतीची आराधना करतात व ती दुर्गा अवतारात रक्षणासाठी दाखल होते. एक एक प्रसंग घटित होत असताना रौद्र रुप धारण करून महिषासुराचा वध करण्यापर्यंतचे दृश्य प्रेक्षक एकटक लावून तल्लीनपणे पाहत असतात. अखेर वाघावर स्वार होऊन ती मंचावर आली तेव्हा उपस्थित दर्शक उभे राहून टाळ्यांच्या गजरात तिचे अभिवादन केले.
शक्तीची आराधना करणारे दुर्गा मातेच्या रुपातील भावपूर्ण अभिनय, आनंददायी संवाद, गीतसंगीताने सुशोभित अतिशय सुंदर अशी नृत्यनाटिका होती. स्वप्न सुंदरीचा भावपूर्ण अभिनय, प्राचीन आख्यायिकेतील प्रसंगाचे हुबेहूब वर्णन करणारा त्यांचा हावभाव, या वयातही प्रेक्षकांच्या मनाला संमोहित करणारे नृत्यकौशल्य आणि मनमोहक वेशभूषा अशा विविध खुबीने सजलेल्या ४० कलावंतांची ही नृत्यनाटिका खरोखरीच रसिकजनांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारीच होती.

ही तर नागपूरची सांस्कृतिक ओळख : मुख्यमंत्री
यावेळी दीपप्रज्वलनासाठी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महोत्सवाचे भरभरून कौतुक केले. खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरच्या सांस्कृतिक जगताची ओळख ठरला आहे. संत्रानगरीसह देशभरातील प्रतिभावंत कलावंतांना यामुळे एक मंच प्राप्त झाला आहे. देशविदेशातील प्रतिभावंतांनाही हा मंच मिळावा अशी अपेक्षा असते. दुसरीकडे या महोत्सवाने कलारसिकांची सांस्कृतिक भूकही भागवल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार, सुधाकार कोहळे, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर नंदा जिचकार, रमेश मंत्री, जयप्रकाश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

मै फिर आऊंगी : हेमा मालिनी
यावेळी नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्याहस्ते हेमा मालिनी यांचा सत्कार करण्यात आला. एखाद्या एकदोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे कठीण असते, मात्र गडकरी यांनी १८ दिवसांचे असामान्य आयोजन केले आहे. यापूर्वी अनेकदा नागपूरला आले, यावेळी मात्र नागपूर पूर्णपणे बदलल्यासारखे वाटते. मी मागच्या वर्षीही या महोत्सवात ‘द्रौपदी’ नृत्य सादर केले होते. हा महोत्सव असाच पुढेही चालणार असल्याने गडकरी यांनी बोलाविले तर मी पुन्हा येथे येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Nagpur Festival: Hema Malini's dance drama mesmerizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.