नागपुरात सराफा व्यापारी दागिने घेऊन पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 09:33 PM2018-12-06T21:33:36+5:302018-12-06T21:34:57+5:30

ग्राहकांनी गहाण म्हणून ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने घेऊन नंदनवनमधील सराफा व्यापारी पळून गेला. हा प्रकार उघड झाल्याने अयोध्यानगरात खळबळ उडाली असून, फसगत झालेल्यापैकी एकाने नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

In Nagpur, bullion traders took away ornaments and ran away | नागपुरात सराफा व्यापारी दागिने घेऊन पळाला

नागपुरात सराफा व्यापारी दागिने घेऊन पळाला

Next
ठळक मुद्देगहाण ठेवणाऱ्याची तक्रार : नंदनवनमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्राहकांनी गहाण म्हणून ठेवलेले लाखो रुपयांचे दागिने घेऊन नंदनवनमधील सराफा व्यापारी पळून गेला. हा प्रकार उघड झाल्याने अयोध्यानगरात खळबळ उडाली असून, फसगत झालेल्यापैकी एकाने नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
हसनबागेतील रहिवासी सय्यद अशरद अब्दुल गफ्फार (वय ३०) यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी अयोध्यानगर, नंदनवनमधील येरपुडे ज्वेलर्स या सराफा दुकानात १० आॅगस्टला दुपारी २ वाजता सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी हे दागिने गहाण ठेवले होते. आर्थिक गरज दूर झाल्यानंतर सराफा येरपुडे यांची रक्कम परत करण्यासाठी अशरद काही दिवसांपूर्वी येरपुडे ज्वेलर्समध्ये गेले असता त्यांना दुकान बंद दिसले. विशेष निमित्तामुळे दुकान बंद असावे, असे समजून अशरद यांनी काही दिवस वाट बघितली. मात्र, आजूबाजूच्यांना विचारल्यानंतर येरपुडे पळून गेल्याचे त्यांना कळाल्याने त्यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी येरपुडे ज्वेलर्सच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
अनेक जण पीडित?
येरपुडे यांनी अशरदसारखेच अनेक ग्राहकांचे दागिने पळविल्याची चर्चा आहे. मात्र, तक्रार केवळ एकाचीच आल्यामुळे आम्ही याबाबत ठोस काही सांगू शकत नसल्याचे नंदनवन पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: In Nagpur, bullion traders took away ornaments and ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.