‘अर्थ डे नेटवर्क’च्या स्पर्धेत नागपूरला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:39 PM2019-07-18T22:39:03+5:302019-07-18T22:40:06+5:30

पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात कार्यरत असलेल्या अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील शहरांसाठी ‘शहर ग्रीन करो’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १० लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण ४९ शहरांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नागपूर शहराचा समावेश विजेत्या उत्कृष्ट दहा शहरांमध्ये झाला आहे. नागपूरसह महाराष्ट्रातील दोन शहरांचा या यादीत समावेश असून नागपूरपाठोपाठ मुंबई शहरानेही यात स्थान पटकाविले आहे.

Nagpur awarded for 'Earth Day Network' competition | ‘अर्थ डे नेटवर्क’च्या स्पर्धेत नागपूरला पुरस्कार

‘अर्थ डे नेटवर्क’च्या स्पर्धेत नागपूरला पुरस्कार

Next
ठळक मुद्देविजेत्या दहा शहरांची यादी घोषित : मनपा आणि ग्रीन व्हिजीलला बहुमान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात कार्यरत असलेल्या अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून भारतातील शहरांसाठी ‘शहर ग्रीन करो’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १० लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण ४९ शहरांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नागपूर शहराचा समावेश विजेत्या उत्कृष्ट दहा शहरांमध्ये झाला आहे. नागपूरसह महाराष्ट्रातील दोन शहरांचा या यादीत समावेश असून नागपूरपाठोपाठ मुंबई शहरानेही यात स्थान पटकाविले आहे.
पर्यावरण संंरक्षणासाठी ‘अर्थ डे नेटवर्क’ नामक आंतरराष्ट्रीय संस्था सन १९७० पासून कार्यरत आहे. वॉशिंग्टन डी.सी. या शहरात मुख्यालय असलेल्या संस्थेसोबत १९२ देशातील सुमारे ७५ हजार भागीदार संस्था जुळलेल्या आहेत. सुमारे एक बिलियन सदस्य या माध्यमातून पर्यावरणविषयक कार्यात जुळलेले आहेत. वसुंधरा वाचविण्याचा संदेश देत वर्षभर पर्यावरणविषयक जनजागृतीचे उपक्रम जगभरात राबविले जातात. याच संस्थेच्या माध्यमातून नागपुरात नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशन वर्षभर पर्यावरणविषयक जनजागृतीसंदर्भात उपक्रम राबवित असतात. ऊर्जा बचतीसाठी पौर्णिमा दिवस, शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता अभियान, ओला आणि सुका कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्ती, हरितम् नागपूर (वृक्षारोपण) आणि पर्यावरण शिक्षण आदी पर्यावरणाशी संबंधित उपक्रम राबविले जातात. यावर्षी नागपूर महानगरपालिकेने झाडांचे डी-चोकींग करण्यावर विशेष भर दिला. सोबतच झाडे किंवा झाडांच्या फांद्या कापण्यासंदर्भात विशेष धोरण तयार करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी अर्थ डे नेटवर्क या संस्थेला ४७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘शहर ग्रीन करो’ ही स्पर्धा सुरू करण्यात आली. त्यावर्षी ४७ शहरांसाठी, मागील वर्षी ४८ शहरांसाठी तर यावर्षी ४९ शहरांसाठी ही स्पर्धा होती. या स्पर्धेत देशातील मोठी शहरे सहभागी झाली होती. या प्रत्येक शहरांमध्ये स्थानिक पर्यावरणप्रेमी संस्थांनी अर्थ डे नेटवर्कच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. ज्या शहरातील उपक्रमांची व्याप्ती मोठी होती, त्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती झाली, या जनजागृतीचा लोकजीवनावर प्रभाव पडला अशा दहा शहरांना ‘शहर ग्रीन करो’ स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले.
विजेत्या शहरांमध्ये समाविष्ट शहरे
‘शहर ग्रीन करो’ स्पर्धेत सहभागी असलेल्या दहा शहरांमध्ये नागपूरसह अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू, चंदीगड, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, रायपूर आणि वाराणसी या शहरांचा समावेश आहे. या दहा विजेत्यांमधील नागपूर हे एकमेव असे शहर आहे ज्यामध्ये पर्यावरणविषयक जनजागृतीमध्ये पर्यावरणवादी संस्थेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग आहे. नागपुरातील ग्रीन व्हिजील फाऊंडेशन या पर्यावरणवादी संस्थेसोबत नागपूर महानगरपालिकेचा सहभाग आहे. अर्थ डे नेटवर्क (भारत)चे कंट्री डायरेक्टर करुणा सिंग यांनी या पुरस्काराबद्दल नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे अभिनंदन केले आहे. भविष्यात नागपुरात पर्यावरण जनजागृतीसंदर्भात मोठी क्रांती दिसून येईल, असेही त्या म्हणाल्या.
नागपूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनीही या कार्याबद्दल संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे.
नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
पर्यावरणविषयक कार्यात ‘अर्थ डे नेटवर्क ’ने नागपूरला दिलेला हा बहुमान म्हणजे येथील पर्यावरणवाद्यांच्या कार्याला मिळालेला सन्मान आहे. हा संपूर्ण नागपूरकरांचा सन्मान आहे. नागपूरकर आता स्वच्छतेविषयी आणि पर्यावरण रक्षणाविषयी जागरूक झाले आहे. या पुरस्कारामुळे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नंदा जिचकार, महापौर

नागपूरचा सन्मान वाढला
कुठल्याही समस्येवर मात करायची असेल तर जनजागृती आणि लोकसहभाग महत्त्वाचा असतो. पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी नागपुरातील ग्रीन व्हिजील फाऊंडेशन नेहमीच पुढाकार घेते. नागपूर महानगरपालिका त्यांच्या खांद्याला खांदा लावून या उपक्रमात सहभागी झाली. या पुरस्काराने आता जबाबदारी आणखी वाढली आहे. मनपा आयुक्त या नात्याने आता संपूर्ण जिल्हाभरात असे उपक्रम राबविण्याचा आपला प्रयत्न राहील.
अभिजित बांगर, मनपा आयुक्त

हा नागपूरकरांचा सन्मान
‘अर्थ डे नेटवर्क’ ही जागतिक स्तरावर कार्य करणारी संस्था आहे. अशा पुरस्कारांमुळे कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. ग्रीन व्हिजील फाऊंडेशन योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याचे हे प्रमाणपत्र आहे. यामुळे आता पुढील उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वात संपूर्ण अधिकारी-कर्मचारी यांनी आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. हा सन्मान खऱ्या अर्थाने नागपूरच्या जनतेचा आहे.
कौस्तुभ चॅटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजील फाऊंडेशन

Web Title: Nagpur awarded for 'Earth Day Network' competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.