Musician Pt Appasaheb Indurkar dies | संगीतसाधक पं. अप्पासाहेब इंदूरकर यांचे निधन
संगीतसाधक पं. अप्पासाहेब इंदूरकर यांचे निधन

नागपूर : संगीतसाधक पंडित श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दिलीप, संजय ही मुले व सुलभा, रंजना या मुली आहेत. गायन, तबला वादन, हार्मोनियम वादन, बंदिशींची निर्मिती, सुगम संगीताच्या रचनांची निर्मिती असे चौफेर कार्य अप्पासाहेबांनी केले.

अप्पासाहेब अलाहाबाद बँकेत नोकरीला होते. ते दररोज नित्यनेमाने रियाज करायचे. निवृत्तीनंतर तर त्यांनी संपूर्ण आयुष्य संगीत क्षेत्रात घालविले. त्यांच्या सांगीतिक विचारांवर इंदोर घराण्याचे उस्ताद अमीर खाँ साहेबांचा चांगलाच प्रभाव होता. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाला त्यांनी दिलेली नवी चाल विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल. अनेक मोठ्या गायकांना त्यांनी हार्मोनियमवर साथसंगत केली होती. आडा चौताल हा त्यांचा विशेष आवडीचा ताल होता.

बुटी संगीत विद्यालयात अनेक वर्ष त्यांनी संगीत अध्यापनाचे कार्य केले. सुवर्णा माटेगावकर, मीनल इंदूरकर, अपर्णा अपराजित असे अनेक गुणवान संगीतसाधक त्यांनी तयार केले आहे. संगीताबरोबरच त्यांना नाटकाचीही आवड होती. त्यांनी ‘तीन चौक तेरा’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘काका किशाका’ अशा विनोदी नाटकाचे दिग्दर्शन केले होते.


Web Title: Musician Pt Appasaheb Indurkar dies
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.