वाडीतील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा उलगडा : दत्तक मुलीने केला प्रियकराच्या मदतीने घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:17 AM2019-04-16T00:17:33+5:302019-04-16T00:19:01+5:30

वाडीच्या सुरक्षानगरातील शंकर अतुलचंद्र चंपाती (वय ७२) आणि त्यांची पत्नी सीमा (वय ६४) या वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या आठ तासात यश मिळविले. कोट्यवधींची मालमत्ता हडपण्याच्या हेतूने मृत दाम्पत्याच्या दत्तक मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने कट रचून हे निर्घृण हत्याकांड घडवून आणल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.

The murder of an old couple in Wadi exposed: Adopted girl killed with the help of a beloved boy | वाडीतील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा उलगडा : दत्तक मुलीने केला प्रियकराच्या मदतीने घात

वाडीतील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा उलगडा : दत्तक मुलीने केला प्रियकराच्या मदतीने घात

Next
ठळक मुद्देदोघांनाही अटक, गुन्हे शाखेची प्रशंसनीय कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/वाडी : वाडीच्या सुरक्षानगरातील शंकर अतुलचंद्र चंपाती (वय ७२) आणि त्यांची पत्नी सीमा (वय ६४) या वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या आठ तासात यश मिळविले. कोट्यवधींची मालमत्ता हडपण्याच्या हेतूने मृत दाम्पत्याच्या दत्तक मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने कट रचून हे निर्घृण हत्याकांड घडवून आणल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले असून, पोलिसांनी चंपाती दाम्पत्याची दत्तक मुलगी ऐश्वर्या ऊर्फ प्रियंका (वय २३) तसेच तिचा प्रियकर इकलाख (वय २२) या दोघांना अटक केली.
शंकर चंपाती हे वेकोलिचे निवृत्त अधिकारी असून, ते दत्तवाडीतील सुरक्षानगरात राहत होते. त्यांनी सहा महिन्यांची असताना प्रियंकाला दत्तक घेतले होते. ही त्यांची एकुलती एक वारस होती. चंपातींच्या प्रशस्त निवासस्थानी १२ भाडेकरू राहतात. कोट्यवधींची मालमत्ता, निवृत्ती वेतन आणि महिन्याला २५ ते ३० हजार रुपये घरभाडे मिळत असूनही शंकर चंपाती दत्तवाडी चौकात नारळ पाणी विकत होते. वृद्ध चंपाती दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना रविवारी रात्री ८ च्या सुमारास उघडकीस आली. प्रियंकाने वाडी पोलिसांना फोनवरून या दुहेरी हत्याकांडाची माहिती कळविली होती. घरातील साहित्य अस्तव्यस्त असल्यामुळे लुटमारीच्या उद्देशाने हे हत्याकांड घडल्याचे दिसून येत होते. वृद्ध दाम्पत्याच्या या निर्घृण हत्याकांडाने वाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, माहिती कळताच वाडी आणि गुन्हे शाखेचेही पोलीस तेथे पोहोचले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनीही घटनास्थळ गाठून आरोपींचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाडी तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. या गुन्ह्यात तक्रार देणारी प्रियंका वेळोवेळी विसंगत माहिती देत असल्याने, पोलिसांना शंकेची पाल चुकचुकली आणि तिची चौकशी केली असता तिने तब्बल पाच तास पोलिसांची दिशाभूल केल्यानंतर अखेर हत्याकांडाची कबुली दिली. प्रियकर इकलाखच्या मदतीने हे दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचेही सांगितले. पोलिसांनी त्यालाही सोमवारी सकाळी अटक केली. त्यानंतर संपूर्ण घटनाक्रम त्यांच्याकडून वदवून घेतला.
प्रियंकाने पोलिसांकडे सांगितलेल्या माहितीनुसार, शंकर चंपाती पैशाचे फारच लोभी होते. फारसा मोठा खर्च नसताना आणि महिन्याला एकूण ६० ते ७० हजारांची आवक असूनदेखील ते चौकात नारळपाणी विकायचे. प्रत्येक गोष्टीसाठी ते प्रियंकाला टोकत होते. पैशासाठी तिला नेहमी शिवीगाळ करायचे. त्यांच्या कटकटीला प्रियंका कंटाळली होती. त्यामुळे तिने तिचा प्रियकर इकलाखसोबत आई-वडिलांच्या हत्येचा कट रचला. ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी नाश्ता केल्यानंतर प्रियंकाने आई-वडिलांना टरबूजमध्ये गुंगीचे औषध मिसळवून खायला दिले. त्यामुळे काही वेळेतच ते दोघे बेशुद्ध पडले. ठरल्याप्रमाणे दुपारी इकलाख घरात आला. त्याने टोकदार सळीने बेशुद्धावस्थेतील शंकर आणि सीमाच्या डोक्यावर फटके मारून, गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर प्रियंका आणि इ.कलाख दोघेही दुपारी १ च्या सुमारास घरून निघून गेले. जाण्यापूर्वी हे हत्याकांड लुटमारीच्या प्रयत्नातून घडल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी या दोघांनी घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त केले. घराबाहेर पडताना प्रियंकाची नजर चुकवून इकलाखने घरातील दोन सोन्याचे कंगन, काही रोख रक्कम आणि एक मंगळसूत्रही खिशात घातले.
आपणच होऊ मालक!
आपल्या पापात घरातील श्वान अडसर ठरू शकतो. हे ध्यानात घेत आई-वडिलांसोबतच प्रियंकाने घरातील पाळीव श्वानालाही गुंगीचे औषध खाऊ घालून त्याला बेशुद्ध पाडले. आपल्यावर पोलीस संशय घेऊ शकणार नाही. आई-वडिलांच्या नंतर त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेची आपणच मालकीण बनू आणि मुक्तपणे जीवन जगू, असा प्रियंकाचा डाव होता. मात्र गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून अखेर तिला गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले. तिच्या कबुलीजबाबानंतर इकलाखनेही हत्याकांडाची कबुली दिली.
सुपारी किलरचाही समावेश ?
या दुहेरी हत्याकांडात आरोपी प्रियंका आणि इकलाखने आणखी काही जणांना सुपारी देऊन त्यांचाही वापर केला असावा, असा संशय आहे. कारण ज्या पद्धतीने हे दुहेरी हत्याकांड घडले आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आरोपींनी काही चीजवस्तूंची विल्हेवाट लावली, ती पद्धत या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असल्याचे संकेत देणारी आहे. प्रियंकाने बेशुद्ध केले आणि आपण एकट्यानेच दोघांनाही मारल्याचे इकलाख पोलिसांना सांगतो आहे. त्यानेही पोलिसांना दिवसभरात अनेकदा दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. त्यामुळे या दोघांनी भाडोत्री गुन्हेगारांचाही वापर केला असावा, असा संशय आहे.
दोनदा प्रयत्न, तिसऱ्यांदा साधला डाव
आरोपींनी शंकर चंपाती यांची हत्या करण्यासाठी यापूर्वी दोनदा प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. एकदा चंपाती यांचा गेम करण्यासाठी प्रियंका आणि इकलाखने त्यांचा घात करण्यासाठी अपघात घडवून आणला होता. जानेवारी २०१९ मध्ये असाच एक प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी शंकर चंपाती यांना संशय आल्याने त्यांनी वाडी पोलिसांकडे तक्रारही दिली होती. मात्र, पोलिसांनी ती एनसी (अदखलपात्र) केली होती, असे समजते. दोनदा अयशस्वी झालेल्या आरोपींनी अखेर प्रियंकाने तिसऱ्यांदा डाव साधला अन् वृद्ध आई-वडिलांचा घात केला.
ते रक्ताच्या थारोळ्यात, ती ब्युटी पार्लरमध्ये
या हत्याकांडाची मास्टर माईंड असलेली प्रियंका कॉम्प्युटर इंजिनिअर असून, आरोपी इकलाख नामवंत क्रिकेट खेळाडू आहे. त्याने व्हीसीएच्या माध्यमातून झिम्बाब्वेसह देश-विदेशात आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले आहे. हे हत्याकांड घडवून आणण्यापूर्वी आरोपी प्रियंकाने स्वत:च्या बचावाची आधीच तयारी करून ठेवली होती. वृद्ध आई-वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर प्रियंका थेट ब्युटी पार्लरमध्ये निघून गेली. तेथे मेकअप करून घेतल्यानंतर तिने तिच्या मावसबहिणीला फोन केला. तिला बिगबाजारमध्ये बोलवून घेतले. तेथे खरेदी केल्यानंतर बाहेर खाणेपिणे केले आणि रात्री ८ च्या सुमारास घरी पोहोचली. त्यानंतर तिने आई-वडिलांच्या हत्याकांडाचा कांगावा केला. मात्र, तिला कसलेही दु:ख झाले नसल्याचे पोलिसांनी टिपले अन् अखेर ती पोलिसांच्या चौकशीत अडकली.

Web Title: The murder of an old couple in Wadi exposed: Adopted girl killed with the help of a beloved boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.