नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या : खंडणीसाठी शिवीगाळ केल्याने घडला थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 09:47 PM2019-07-08T21:47:13+5:302019-07-08T21:49:26+5:30

खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे चाकू दाखवून अश्लील शिवीगाळ करणारा कुख्यात गुंड नित्या ऊर्फ नितीन कुळमेथे याची चाकूचे घाव घालून तसेच विटांनी ठेचून अमानुष हत्या केली. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडाने पुन्हा एकदा उपराजधानीत खळबळ उडाली आहे.

The murder of a notorious goon in Nagpur: Incident happened due to demand for ransom | नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या : खंडणीसाठी शिवीगाळ केल्याने घडला थरार

नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या : खंडणीसाठी शिवीगाळ केल्याने घडला थरार

googlenewsNext
ठळक मुद्देधंतोलीत गुन्हा, दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे चाकू दाखवून अश्लील शिवीगाळ करणारा कुख्यात गुंड नित्या ऊर्फ नितीन कुळमेथे याची चाकूचे घाव घालून तसेच विटांनी ठेचून अमानुष हत्या केली. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडाने पुन्हा एकदा उपराजधानीत खळबळ उडाली आहे.
नित्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, त्याला यापूर्वी तडीपारही करण्यात आले होते. २००९ पासून नित्या गायब झाला होता. त्याची पत्नी पारिचारिका असून, ती पंढरपूरला नोकरीला असल्यामुळे नित्या तिकडे गेल्याचे म्हटले जात होते.तर, काही जण तो कारागृहात असल्याचे सांगत होते. महिनाभरापूर्वी नित्या धंतोलीत परतला. त्याने पुन्हा गुंडगिरी सुरू केली. परिसरातील छोट्या-मोठ्या
दुकानदाराकडून, अवैध धंदेवाल्याकडून नित्या खंडणी वसुली करीत होता. सोमवारी दुपारी त्याने दारूच्या नशेत खंडणीसाठी हैदोस घालणे सुरू केले. त्याने अनेकांना नको तशा शिव्या घातल्या. त्यामुळे या भागात मटका चालविणारे, दारूची लपूनछपून विक्री करणारे संतप्त झाले. आरोपी पंकज राऊत, मंगेश सोनवणे यांनी त्याचा काटा काढण्याची तयारी केली. दुपारी ४ च्या सुमारास नित्या खंडणी मागायला आला. त्याने शिवीगाळ सुरू केल्याने राऊत आणि सोनवणेसोबत त्याचा वाद झाला. दारूच्या नशेतील नित्याने चाकू काढून मारण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्याच्यावर लाकडी फळीने जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर त्याच्या हातातून चाकू हिसकावला. त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. एवढेच नव्हे तर आरोपींनी त्याला विटांनीही ठेचून काढले. अनेकांसमोर हा थरारक प्रकार घडला; मात्र नित्याच्या मदतीला कुणीही धावले नाही. आरोपी तेथून निघून गेल्यानंतर तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी जमली.
एकाने नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळविला; नंतर धंतोलीचे ठाणेदार प्रसाद सणस आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. तोपर्यंत नित्याचा मृत्यू झाला होता. माहिती कळताच परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिसही पोहचले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी नित्याचा मृतदेह मेडिकलमध्ये पाठविला. आरोपी राऊत आणि सोनवणे या दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: The murder of a notorious goon in Nagpur: Incident happened due to demand for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.