नागपूर जिल्ह्यातील मोहगाव येथे शेतीच्या वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:10 PM2018-01-22T23:10:01+5:302018-01-22T23:12:05+5:30

वडिलोपार्जित शेती हडपल्याच्या  वादातून मोठ्या भावाने दुचाकीवर असलेल्यांवर काठीने वार केला. त्यात लहान भाऊ गंभीर जखमी झाला तर त्याच्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव-पिपळा (केवळराम) मार्गावरील मोहगाव (भदाडे) येथे रविवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली.

The murder of farming in Mohgaon in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील मोहगाव येथे शेतीच्या वादातून खून

नागपूर जिल्ह्यातील मोहगाव येथे शेतीच्या वादातून खून

googlenewsNext
ठळक मुद्देअन्य एक जखमी, वडिलोपार्जित शेती हडपल्याच्या  वादातून  घडला थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : लहान भावाने त्याच्या अन्य एक भावाची आणि चार बहिणींची शेती हडपल्यानंतर उरलेल्या दोन भावांची शेती हडपण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्याने दोन्ही भावांना फोनवर धमकी देण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर तो त्याच्या दोन मित्रांना घेऊन भावाच्या घरी भांडण करायला गेला. लहान भाऊ व त्याचे दोन मित्र मोटरसायकलवर असतानाच मोठ्या भावाने दुचाकीवर असलेल्यांवर काठीने वार केला. त्यात लहान भाऊ गंभीर जखमी झाला तर त्याच्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य एक मित्र पळून गेला ही घटना नरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव-पिपळा (केवळराम) मार्गावरील मोहगाव (भदाडे) येथे रविवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली. यात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अमोल रमेश अटाळकर (३२, रा. काटोल) असे मृताचे तर वैभव प्रकाश कावडकर (३१, रा. काटोल) असे जखमीचे नाव असून, बालाजी काशिनाथ कावडकर (४८) व चंद्रभान काशिनाथ कावडकर (५०) दोघेही रा. मोहगाव (भदाडे), ता. नरखेड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वैभव हा मूळचा मोहगाव (भदाडे) येथील रहिवासी असून, तो काटोल येथे स्थायिक झाला. वैभव, बालाजी व चंद्रभान हे भाऊ असून, त्यांना आणखी एक भाऊ व चार बहिणी आहेत. त्यांच्याकडे एकूण साडेसात एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीची वाटणी झाली असून, प्रत्येकाच्या वाट्याला ३३ आर शेती आली.
वैभवला मात्र संपूर्ण शेती हवी होती. त्याने मध्यंतरी खटाटोप करून चार बहिणींची तसेच एका भावाची शेती स्वत:च्या नावे करून घेतली. त्यानंतर त्याची नजर बालाजी व चंद्रभान यांच्या प्रत्येकी ३३ आर शेतीकडे गेली. त्याला या दोघांचीही शेती हवी असल्याने त्याने त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. दोघांचीही शेती विकत घेण्याची वैभवने तयारी दर्शवली होती. त्यामुळे त्याने बालाजी व चंद्रभानकडे तगादा लावला होता. दोघेही जुमानत नसल्याने त्याने दोघांसोबत भांडणे करण्यासोबतच फोनवर वारंवार धमक्या देणे सुरू केले. वैभव दोन मित्रांना घेऊन मोहगाव येथे दोघांसोबत भांडण करण्याच्या उद्देशाने गेला होता. तिघेही मोटरसायकलवर असतानाच बालाजी व चंद्रभानने काठी व कुऱ्हाडीने   तिघांवर वार केले. त्यात अमोलचा मृत्यू झाला तर वैभव गंभीर जखमी झाला.
दुचाकीवर असतानाच केला वार
बालाजी व चंद्रभानसोबत भांडण करण्यासाठी वैभव त्याचा मित्र अमोल अटाळकर व तिलक ऊर्फ ईलू राजकुमार हाटे (२६, रा. अन्नपूर्णानगर, काटोल) यांना सोबत घेऊन मोटरसायकलने रविवारी दुपारी मोहगाव (भदाडे) येथे गेला. तिलक दुचाकी चालवित होता तर, वैभव मध्ये आणि अमोल मागे बसला होता. तिघेही बालाजीच्या घराजवळ घुटमळत असतानाच बालाजीच्या मुलीने वडिलांना याबाबत माहिती दिली. बालाजी व चंद्रभानने लगेच घर गाठले. तिघेही मोटरसायकलने घराजवळून हळूहळू जात असताना बालाजीने काठीने वार केला. पहिला वार मागे बसलेल्या अमोलवर झाला तर दुसरा वैभववर झाला. त्यात दोघेही जखमी झाले.
उपचारादरम्यान मृत्यू
ताबा सुटल्याने दुचाकी खाली कोसळली. दोघेही जखमी झाल्याचे लक्षात येताच तिलकने दुचाकीसह पळ काढला. माहिती मिळताच सावरगाव पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले त्यांनी दोन्ही जखमींना लगेच नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती केले. शिवाय, आरोपी बालाजी व चंद्रभानला ताब्यात घेत अटक केली. अमोलचा मेयोमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तर वैभववर उपचार सुरू आहेत. तो बेशुद्ध असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी आरोपी बालाजी व चंद्रभानला भादंवि ३०२, ३०७, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखन करून अटक केली. शिवाय, त्यांच्याकडून काठी व कुऱ्हाड जप्त केली. दोघांनाही सोमवारी दुपारी नरखेड येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पुरी यांच्या न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने दोघांनाही गुरुवारपर्यंत (दि. २५) पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास नरखेडचे ठाणेदार दिलीप मसराम करीत आहेत.

Web Title: The murder of farming in Mohgaon in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.