नागपूर दर्शनाबाबत ‘एमटीडीसी’ उदासीन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:14 AM2018-12-14T01:14:18+5:302018-12-14T01:15:14+5:30

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नागपूर दर्शन सहल तसेच खाण पर्यटनाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र १९ महिन्यांमध्ये नागपूर दर्शन सहलीसाठी केवळ ८७ पर्यटक आले. तर खाण पर्यटकांचा आकडा ३००च्या वर गेला नाही. ही आकडेवारी पाहिली असता याबाबत योग्य प्रचार-प्रसार होतो आहे का तसेच नागपूर शहर पर्यटनाच्या बाबतीत समोर कसे येईल, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.

'MTDC' relieved about Nagpur darshan? | नागपूर दर्शनाबाबत ‘एमटीडीसी’ उदासीन ?

नागपूर दर्शनाबाबत ‘एमटीडीसी’ उदासीन ?

googlenewsNext
ठळक मुद्दे१९ महिन्यांत केवळ ८७ पर्यटक : खाण पर्यटनालादेखील हवा तसा प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नागपूर दर्शन सहल तसेच खाण पर्यटनाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र १९ महिन्यांमध्ये नागपूर दर्शन सहलीसाठी केवळ ८७ पर्यटक आले. तर खाण पर्यटकांचा आकडा ३००च्या वर गेला नाही. ही आकडेवारी पाहिली असता याबाबत योग्य प्रचार-प्रसार होतो आहे का तसेच नागपूर शहर पर्यटनाच्या बाबतीत समोर कसे येईल, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे विचारणा केली होती. एप्रिल २०१७ ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत खाण पर्यटन व नागपूर दर्शन सहलीला कसा प्रतिसाद लाभला, त्यापासून किती महसूल प्राप्त झाला, शिवाय १ जानेवारी २००५ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत पर्यटन वाढीसाठी कोणकोणते कार्यक्रम आयोजित करण्यात आले व किती प्रायोजकत्व मिळाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार नागपूर दर्शन सहलीचे उद्घाटन १५ डिसेंबर २०१६ ला करण्यात आले होते. १९ महिन्यांत केवळ ८७ पर्यटक लाभले. २०१७-१८ मध्ये तर अवघे ९ पर्यटक नागपूर दर्शन सहलीकडे वळले. १९ महिन्यांत सहलीपासून ६७ हजार ४५० रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
दुसरीकडे १७ डिसेंबर २०१६ रोजी खाण पर्यटनाचे उद्घाटन झाले होते. २०१६-१७ मध्ये ११२ पर्यटक आले व त्यापासून ७२ हजार ८०० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. खाण पर्यटन हा एक वेगळा अनुभव असूनदेखील लोक त्याकडे वळलेच नाही. एप्रिल२०१७ पासून १९ महिन्यांत २७८ पर्यटकांनी खाण पर्यटनाला प्राधान्य दिले व त्यापासून १ लाख ७७ हजार ४५० रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
कालिदास महोत्सवाला साडेचार कोटींचे प्रायोजकत्व
नागपुरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने १९९८-९९ पासून कालीदास महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. एप्रिल २००५ पासून ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत १२ वर्ष या महोत्सवाला विविध माध्यमांतून प्रायोजकत्व प्राप्त झाले. प्रायोजकांकडून मिळालेली रक्कम ही ४ कोटी ६० लाख १८ हजार ५९ इतकी होती. मात्र हा महोत्सव नि:शुल्क असल्याने कुठलाही महसूल मिळाला नसल्याचा दावा महामंडळातर्फे करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी प्रायोजक तसेच राज्य शासनाकडून निधी मिळतो, असेदेखील महामंडळाने स्पष्ट केले.
कोराडी महोत्सवाला जास्त प्रायोजक
दरम्यान, दुसरीकडे कोराडी महोत्सवाला मात्र चांगले प्रायोजकत्व मिळत आहे. २०१६-१७ मध्ये ६१ लाख ५० हजार तर २०१७-१८ मध्ये १ कोटी ४ लाख २५ हजारांचे प्रायोजकत्व मिळाले. दोन वर्षांत प्रायोजकांकडून १ कोटी ६५ लाख ७५ हजारांचा निधी देण्यात आला. तर खाद्य महोत्सवाला ५८ लाख ५२ हजार ९०० रुपयांचे प्रायोजकत्व प्राप्त झाले.
‘मारबत’कडे दुर्लक्ष
‘मारबत’ महोत्सवाबाबत देशविदेशातदेखील उत्सुकता असते. मात्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे केवळ २०१३ व २०१४ मध्येच याचे आयोजन करण्यात आले. यासाठी साडेपाच लाखांचे प्रायोजकत्व प्राप्त झाले. मात्र त्यानंतर याच्या आयोजनासाठी महामंडळातर्फे पुढाकार का घेण्यात आला नाही हा प्रश्नच आहे.

 

Web Title: 'MTDC' relieved about Nagpur darshan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.