मेट्रोच्या जास्त वेगाला ‘आरडीएसओ’ मंजूरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 10:19 PM2018-09-12T22:19:00+5:302018-09-12T22:20:51+5:30

ताशी २५ कि.मी. वेगाने धावणारी नागपूर मेट्रो आता लवकरच ताशी ९० कि.मी. वेगाने धावायला तयार असेल. पुढे ताशी ९० कि.मी. वेगाने महामेट्रोच्या नागपूर मेट्रोचे ट्रायल रन होणार आहे.

More speed for Metro Rails 'RDSO' approval | मेट्रोच्या जास्त वेगाला ‘आरडीएसओ’ मंजूरी 

मेट्रोच्या जास्त वेगाला ‘आरडीएसओ’ मंजूरी 

Next
ठळक मुद्देताशी ९० कि़मी. वेगाने ट्रायल रन : तीन सदस्यीय पथकाचा दौरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताशी २५ कि.मी. वेगाने धावणारी नागपूरमेट्रो आता लवकरच ताशी ९० कि.मी. वेगाने धावायला तयार असेल. पुढे ताशी ९० कि.मी. वेगाने महामेट्रोच्या नागपूर मेट्रोचे ट्रायल रन होणार आहे.
ट्रायल रन पूर्वीच्या तयारीचे परीक्षण करण्यासाठी बुधवारी ‘आरडीएसओ’ने (रेल्वे डिझाईन सुरक्षा आॅर्गनायझेशन) नागपूरचा दौरा केला. ताशी ९० किमी वेगाने धावण्याच्या तयारी संबंधीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा होता. उच्चस्तरीय चमूने संपूर्ण दिवस नागपूर मेट्रोचे व इतर संबंधित बाबींचे परीक्षण केले. एच.के. रघू यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांचे नागपुरात आगमन झाल्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी प्रकल्पाची माहिती अधिकाऱ्यांना दिली. चमूत कार्यकारी संचालक (शहरी वाहतूक व उच्च गती) एच.के. रघू, संचालक (बांधकाम) कमलेश कुमार आणि उपसंचालक (यांत्रिक) नमनकुमार यांचा समावेश होता.
‘आरडीएसओ’ने प्रथम एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनचे निरीक्षण करून तेथील सुविधांची तपासणी केली. त्यानंतर मिहान मेंटनन्स डेपोसह एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन, न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन व खापरी मेट्रो स्टेशनला भेट दिली. न्यू एयरपोर्ट आणि खापरी मेट्रो स्टेशनचे निरीक्षण करून दोन्ही स्टेशनवरील सुविधांची पाहणी केली. यासह आॅपरेशन कंट्रोल सेंटर (ओसीसी) व खापरी येथील स्टेशनचे कंट्रोल रूम तसेच मिहान कार डेपोमधील सोर्इंचा आढावा घेत अपघातग्रस्त परिस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षेसंबंधित उपायांचे परीक्षण केले आणि इतर यंत्रणांची पाहणी केली. महामेट्रोच्या शंटर, हायड्रॉलिक जॅक आणि इतर बचाव उपकरणांचे निरीक्षण ‘आरडीएसओ’ने केले. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी चमूला प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. प्रकल्पाची प्रगती व इतर सविस्तर माहिती सिव्हिल लाईन्सच्या मेट्रो हाऊसमध्ये देण्यात आली. संपूर्ण दिवस मेट्रो आणि संबंधित बाबींचे परीक्षण झाल्यानंतर ‘आरडीएसओ’ने यावर समाधान व्यक्त केले.
यावेळी महामेट्रोचे महाव्यवस्थापक (रोलिंग व स्टॉक) जनक कुमार गर्ग, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ट्रॅक) नरेश गुरबानी, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ट्रॅक्शन) आलोक कुमार सहाय, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिंग्नल) जय सिंग यांच्यासह महामेट्रोचे इतर अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.

Web Title: More speed for Metro Rails 'RDSO' approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.