ठळक मुद्देतारा भवाळकर : ‘स्त्री संतांच्या काव्यातील मुक्ती संकल्पना’वर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजच्या काळात स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून हिणवले जाते व यामुळे आपल्या संस्कृतीला धोका निर्माण होत असल्याचा कांगावा संस्कृतीरक्षकांच्या झुंडांकडून केला जातो. मात्र भारतात शेकडो वर्षापासून जातीयतेची व पुरुषी व्यवस्थेची बंधने स्त्रियांवर लादली होती, हे सत्य लपविता येत नाही. मध्ययुगीन काळातील स्त्रीसंतांनी ही बंधने झुगारण्याचे बंड केले होते. आज दिसणाºया स्त्रीमुक्ती चळवळीची बीजे स्त्रीसंतांनी आधीच पेरली आहेत, असे प्रतिपादन संत साहित्य व लोकसंस्कृतीच्या गाढ्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्टÑसंत तुकडोजी महाराज अध्यासन व स्नातकोत्तर मराठी विभागाच्यावतीने ‘स्त्री संतांच्या काव्यातील मुक्ती संकल्पना’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. रुपा कुळकर्णी-बोधी या उपस्थित होत्या. डॉ. भवाळकर यांनी सांगितले, संत सर्व जाती, धर्माचे होते. एकूणच स्त्री-पुरुष संतांनी स्त्रीमुक्ती नाही तर संपूर्ण मुक्तीचा विचार दिला. या संत साहित्यामुळेच शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा मिळाल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या विस्तृत अशा भाषणात त्यांनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या स्त्रीसंतांचा उल्लेख आणि त्यांच्या लेखनाची उदाहरणे दिली. महाराष्टÑातील जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, काश्मिरातून शैव परंपरेतील लल्लेश्वरी, उत्तरेतील मीराबाई, रंगनायिका, कान्होपात्रा, दक्षिण भारतातील अक्कमादेवी अशा अनेक स्त्रीसंतांनी त्यांच्या कालखंडात समाजव्यवस्थेविरुद्ध बंड केले.
पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांची होणारी कुचंबणा स्त्रीसंतांच्या साहित्यात दिसते. संतांनाही त्या काळात जातीयता व आर्थिक विषमतेची बंधन सहन करावी लागली. स्त्रियांना तर मंदिर प्रवेशच नाकारण्यासह अनेक प्रकारची बंधने होती. या बंधनाचे समर्थन करण्यासाठी स्त्रीसंतांच्या जीवनाच्या दंतकथाही रचल्या गेल्याचे डॉ. भवाळकर यांनी सांगितले. स्त्रीला उपभोगाची वस्तू मानल्या जाणाºया समाजात कायम तिच्या चारित्र्याचा मुद्दा उपस्थित करून दडपल्या जात होते.
मात्र स्त्रीसंतांचे आयुष्य व त्यांचे साहित्य अभ्यासल्यास त्यांनी लैंगिक आक्षेपच झुगारल्याचे दिसून येत असल्याचे डॉ. भवाळकर यांनी ओवी, अभंगातून स्पष्ट केले. स्त्रीसंतांनी नर-नारी हे द्वंद नाकारून देहाच्या पलिकडे गेलेल्या परमेश्वराचा स्वीकार केला. जातीयता व सरंजामशाहीची उतरण आजही कायम आहे. पुरुषप्रधान व्यवस्था व धार्मिक बंधने टिकून रहावी म्हणून त्या काळात दंतकथा रचल्या गेल्या व आजही तसे प्रयत्न केले जात आहेत.
संतांच्या शिकवणीनंतरही आणि आपल्याला समजल्यानंतरही समाज व स्त्रिया या बंधनात व दडपणात रेंगाळत असून त्यांना ही सरंजामशाही आवडते हीच मोठी शोकांतिका असल्याची खंत डॉ. भवाळकर यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना डॉ. रूपाताई बोधी यांनी मध्ययुगीन संतांच्या अगोदर बौद्ध धम्मातील ‘थेर गाथा’मधून आणि जैन धर्मातील साध्वी अभिव्यक्त झाल्याचे स्पष्ट केले. बुद्धाच्या समकालीन स्त्रिया मुक्त वातावरणात होत्या व त्यांच्या साहित्यातून हे दिसून येते. त्यानंतर मात्र जातीय उतरंड व बंधने लादली गेली. आज तर बलात्कार, विनयभंग व अत्याचाराच्या गर्दीत स्त्री स्वातंत्र्य हरविल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केली. संचालन उषा निनावे यांनी केले. मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी आभार मानले.