‘मी टू’.. ‘नेव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:19 PM2018-10-20T12:19:11+5:302018-10-20T12:32:45+5:30

‘तू-तू-मी-मी’ असे आपले आपल्याच घरी करणाऱ्या आपल्यासारख्या पापभिरू निरुपद्रवी पुरुषांना हे ‘मी टू’चे प्रकरण बरेच जड जात आहे हे मान्य करावेच लागेल.

'me Two' .. 'Never' | ‘मी टू’.. ‘नेव्हर’

‘मी टू’.. ‘नेव्हर’

Next
ठळक मुद्देप्रेमपत्र लिहून देणे हासुद्धा गुन्हा आहे

आनंद देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
‘तू-तू-मी-मी’ असे आपले आपल्याच घरी करणाऱ्या आपल्यासारख्या पापभिरू निरुपद्रवी पुरुषांना हे ‘मी टू’चे प्रकरण बरेच जड जात आहे हे मान्य करावेच लागेल. शालेय जीवनात कधी कुणा सुकन्येशी बोलण्याचाही प्रश्न आला नाही, कारण तसे मुलामुलीने बोलणे वर्ज्य होते. पुढे अकरावी बारावीला अभ्यास एके अभ्यास याशिवाय काहीच माहीत नव्हते. क्वचित कधी कॉलेजमध्ये प्रवेश करताना गावातील तीन चार धटिंगण पोरे प्रवेशद्वाराशी दिसली की कुणीतरी कुणाच्यातरी बहिणीची छेड काढलेली आहे आणि त्याचे पर्यवसान कुणाला तरी तुडविण्यात होणार आहे याचे ज्ञान प्राप्त होत असे. तेव्हा सिनियरची मुलेमुली महाविद्यालयातील कॅन्टीन नामक भयंकर रोमांटिक जागेत गप्पा मारताना दिसत, याचे अप्रूप वाटे. परंतु आमच्या लहान गावातील प्राचार्यांचे दूत असणारे सेवक सर्वत्र जागता पहारा ठेवून असत. एखादा मुलगा एखाद्या मुलीशी बोलताना तसेच वहीची किंवा वैचारिक देवाणघेवाण करताना दिसला की निष्ठावान सेवक फुर्रर्र करून शिट्टी मारीत असे. आजकाल असे सेवक ठेवले तर महाविद्यालयात दिवसभर शिट्ट्यांचा गदारोळ ऐकू येईल. असो, तर सांगण्याचा मुद्दा असा की कुणी आपल्याकडे बोट दाखवून ‘मी टू’ असे म्हणावे असे आयुष्यात काही घडले नाही.
नाही म्हणायला इयत्ता नववीत एका थोराड षोडशेने, ‘तुझी इतिहासाची वही देशील का? अक्षर खूप छान आहे म्हणे तुझे’ असे मान वेळावीत म्हटले तेंव्हा मी खूपच भारावून गेलो होतो. पण पुढे दोन तीन दिवसात तिचे तीन भाऊ व्यायामपटू असल्याचे आणि अधूनमधून ते शाळेत फेरफटका मारीत असतात असे समजले. इतिहासाची वही देऊन स्वत:चा भूगोल बिघडवणे खूप धोकादायक वाटले म्हणून ती दिसली की मी रस्ता बदलून फरार होत असे. अर्थात त्या प्रकरणातही ‘मी टू’चा काही योग नव्हता हे बरेच झाले म्हणायचे.
महाविद्यालयात सोबतचा एक रूममेट मित्र एका ज्युनिअर मुलीच्या प्रेमात पडला होता. अर्थात त्याचे प्रेम एकतर्फी होते.
माझे मराठी आणि हस्ताक्षर चांगले असल्यामुळे तो मला तिच्यासाठी प्रेमपत्र लिहून देण्याचा आग्रह करायचा. सुरुवातीला मी त्याला स्पष्ट नकार दिला होता. पण मग त्याने मला सामिष पदार्थांचे आमिष दाखविले आणि मी राजी झालो. यात माझे दोन फायदे होते. पहिला म्हणजे तारुण्यसुलभ वयामध्ये आपणही कुणाला तरी प्रेमपत्र लिहावे ही इच्छा पूर्ण होणार होती आणि दुसरे म्हणजे आपल्या प्रतिभाशक्तीचा आविष्कार करणे शक्य होणार होते. दोन रात्री जागून आणि चंद्र, तारे, आकाश, समुद्र, सगळी फुले, निसर्ग या सर्वांची गुंफण करून मी तब्बल सात पानी प्रेमपत्र त्याला तयार करून दिले. आता तिची प्रतिक्रिया काय येईल या उत्सुकतेने मित्र बिचारा रात्रभर तळमळत होता. आज त्याच्या प्रेमाचा निकाल आणि माझ्या प्रतिभेचा कस लागणार होता.आम्ही दोघेही महाविद्यालयात पोहोंचलो. साधारण ११ वाजता शाळेचा सेवक वर्गात येऊन शिकविणाऱ्या प्राध्यापक महोदयांच्या हातात एक चिट्ठी देऊन गेला. त्रासिक चेहऱ्याने त्या प्राध्यापकाने मला तात्काळ प्राचार्यांना भेटण्याचा निरोप दिला. मी ‘येऊ का सर’ असे विचारले. प्राचार्य अत्यंत कृद्ध चेहऱ्याने बसलेले होते.
प्राचार्यांनी मला जवळ बोलावून घेतले. मी त्यांच्या खुर्चीजवळ जाऊन नम्रपणे उभा राहिलो. ते अचानक उभे राहिले आणि त्यांनी काडकन माझ्या मुस्काटात ठेवून दिली. प्रेमपत्रात उल्लेख करावयाचे राहून गेलेले काजवे मला दिवसा दिसले. मी त्यांना पण सर माझे ऐकून तर घ्या’ असे म्हणत होतो. मतितार्थ असा होता की आमच्या मराठीच्या सरांनी माझे अक्षर ओळखले होते. झालेल्या जखमेने माझे काळीज उभे चिरले गेले होते. प्राचार्य तिच्याकडे वळून आणि माझ्याकडे पहात ओरडले, ‘हाच ना तो भामटा?’. आश्चर्यचकित होत तिने नकारार्थी मान केली आणि नाही म्हणून सांगितले. माझा वर गेलेला श्वास खाली आला.
शेवटी पुढे मित्राला प्रेमपत्र लिहून देणे हासुद्धा गुन्हा आहे, असे सगळ्यांचे मत पडले. मी मात्र प्रेम या प्रकाराची धसकीच घेतली. हे सगळे सांगण्याचा उद्देश म्हणजे माझ्या स्वत:च्या मते मोठा साहित्यिक असूनही माझ्यावर ‘मी टू’चे आरोप अद्याप का होऊ शकले नाहीत हे सांगण्याचा होता. पुढे सौभाग्यवतीने ‘तुम्ही इतकं छान लिहिता पण मला कधीच पत्र लिहिले नाहीत’ अशी लाडिक तक्रार केली. तेंव्हा माझ्या शरीराला सुटलेला सूक्ष्म कंप कुणाला दिसला नाही. आणि हो, पुन्हा तुम्ही म्हणताय, सगळे ‘मी टू’ वर लिहित आहेत, तुम्ही का लिहित नाहीत.

Web Title: 'me Two' .. 'Never'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.