मराठीचा अभिमान मले, भारताचा गर्व : मिर्झा एक्स्प्रेसने हसता हसता अंतर्मुख केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:17 AM2019-02-14T00:17:49+5:302019-02-14T00:19:49+5:30

धर्मावरून कधी देशभक्तीवर तर कधी भाषेच्या ज्ञानावर शंका उपस्थित केली जाते. वऱ्हाडी हास्यकवी डॉ. मिर्झा बेग यांनाही असे प्रश्न विचारले जातात. त्यावर डॉ. मिर्झा त्यांच्या कवितेतून दिलेले उत्तर असे, ‘मराठीचा अभिमान मले भारताचा गर्व, मंदिर मशीद एकच मले हिंदुस्थानातले सर्व... काथासंग चुना असते जसा पानात, हिंदूसंग मुसलमान तसे हिंदुस्थानात...’ बुधवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांची मिर्झा एक्स्प्रेस तासभर निनादत राहिली आणि वऱ्हाडी बोलीच्या खास शैलीतून त्यांनी उपस्थित रसिकांना पोट धरून हसविता हसविता अंतर्मुख करून सोडले.

Marathi pride to me, India's pride: The Mirza Express laughs and laughs | मराठीचा अभिमान मले, भारताचा गर्व : मिर्झा एक्स्प्रेसने हसता हसता अंतर्मुख केले

मराठीचा अभिमान मले, भारताचा गर्व : मिर्झा एक्स्प्रेसने हसता हसता अंतर्मुख केले

googlenewsNext
ठळक मुद्देमहापौर करंडक एकांकिका स्पर्धेला सुरुवात

लोकमत  न्यूज नेटवर्क 
नागपूर : धर्मावरून कधी देशभक्तीवर तर कधी भाषेच्या ज्ञानावर शंका उपस्थित केली जाते. वऱ्हाडी हास्यकवी डॉ. मिर्झा बेग यांनाही असे प्रश्न विचारले जातात. त्यावर डॉ. मिर्झा त्यांच्या कवितेतून दिलेले उत्तर असे, ‘मराठीचा अभिमान मले भारताचा गर्व, मंदिर मशीद एकच मले हिंदुस्थानातले सर्व... काथासंग चुना असते जसा पानात, हिंदूसंग मुसलमान तसे हिंदुस्थानात...’ बुधवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांची मिर्झा एक्स्प्रेस तासभर निनादत राहिली आणि वऱ्हाडी बोलीच्या खास शैलीतून त्यांनी उपस्थित रसिकांना पोट धरून हसविता हसविता अंतर्मुख करून सोडले.
२२ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पूर्वरंगांतर्गत महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे, मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नागेश सहारे, अभिनेते डॉ. विलास उजवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर व्यासपीठाचा माईक डॉ. मिर्झा बेग यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनीही त्यांच्या खास शैलीत ‘जांगडगुत्ता’ जमवित तासभर प्रेक्षकांचा ताबा घेतला.
ऑनलाईन ऑर्डरच्या जमान्याचा विनोदाने त्यांनी आपल्या हास्य एक्स्प्रेसला सुरुवात केली. त्यांचा व त्यांच्या कवितेचा ५० वर्षाचा प्रवास त्यांनी खुसखुशीत शैलीत वर्णन केला. वऱ्हाडी भाषेतील विनोदी काव्य आणि त्यात असलेल्या नर्म विनोदाने रसिकांना पोट धरून हसायला भाग पाडले. राजकीय पक्ष, राजकारण, समाजकारण, देश, पर्यावरण, इंग्रजीचा अतिरेक, शेतकऱ्यांची अवस्था अशा सर्व विषयावर त्यांनी आपल्या तिरकस शैलीतून हास्य पिकवत प्रबोधनही केले. ‘जे लोकाले त्रास देते तिचे नाव सरकार’ असे सांगत ‘रेल्वेचे तिकीट नगद, कापसाचे चुकारे उधार’ ही कविता सादर केली. ‘देशीवर विदेशी अशी झाली सवार, पुढे गेली सोनिया मागे रायले पवार’ या हास्यकोटीवर प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. वाघही माणसाच्या वाटेला जात नाही हे सांगताना, ‘अशा जहरी माणसाची शिकार कोण करते, वाघ असलो तरी गवत खाणे पुरते...’ या कवितेतून माणसांच्या प्रकारावर तिरकस टीका केली. शेतकऱ्यांचे दु:खही त्यांनी विनोदातूनच सहजपणे मांडलं. ‘जो करते शेती, त्याच्या हाती माती... आराम नाही दिवसा झोप नाही राती’, ‘शेतकऱ्यावर प्रसंग फुटाणे फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त तीन लाखाचा’, ‘शेतकऱ्यांईचं करा घरदार सेल, दुखत असल डोक तर लावा नवरत्न तेल...’ अशा चारोळ््यांमधून त्यांनी रसिकांना अंतर्मुखही केले. त्यांच्या प्रत्येक विनोदावर रसिक प्रेक्षक उत्स्फूर्त दाद देत होते. नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे उपाध्यक्ष अजय पाटील यांनी आभार मानले.‘गटार’च्या प्रयोगाने स्पर्धेला सुरुवात
महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला बुधवारी ‘गटार’ या नाटकाने सुरुवात झाली. बहुजन रंगभूमीची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन वीरेंद्र गणवीर यांनी केले आहे. आतापर्यंत झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये ‘गटार’ या नाटकाला लेखन, दिग्दर्शन, अभिनय व तांत्रिक बाबींचे पारितोषिक प्राप्त झाले असून परीक्षक आणि प्रेक्षकांचीही मने या नाटकाने जिंकली आहेत. कविवर्य सुरेश भट सभागृहातही उपस्थित प्रेक्षकांनी गटारला पसंतीची पावती दिली. यानंतर ‘प्लॅटफार्म नंबर’ या एकांकिकेचा प्रयोग झाला. या नाटकालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. एकांकिका स्पर्धा १९ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून राज्यभरातील विविध स्पर्धांमध्ये नावाजलेल्या एकांकिका यामध्ये सादर होणार आहेत.

Web Title: Marathi pride to me, India's pride: The Mirza Express laughs and laughs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.