The Maoist Saibaba is in the high court for the bail | माओवादी साईबाबाची जामिनासाठी  हायकोर्टात धाव

ठळक मुद्देवैद्यकीय कारण दिले : नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड

लोकमत न्यूज नेटवर्क   
नागपूर : बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याने वैद्यकीय कारणावरून शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथीदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी धरून कमाल जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध साईबाबासह इतर आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले असून ते अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेण्यात आले आहे. साईबाबा ९० टक्के दिव्यांग आहे. सत्र न्यायालयात शिक्षा होण्यापूर्वी तो जामिनावर बाहेर होता. दरम्यान, त्याच्या जामिनावरून बराच वाद निर्माण झाला होता. त्यावेळी त्याला वैद्यकीय कारणावरूनच जामीन देण्यात आला होता. जामिनावर बाहेर असताना अटींचे काटेकोर पालन केले असे साईबाबाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने अपीलवर अंतिम निर्णय होतपर्यंत शिक्षेवर स्थगिती व जामीन मागितला आहे. साईबाबा दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. तेथून तो नक्षल चळवळ हाताळीत होता. यापूर्वी साईबाबाचे साथीदार प्रशांत राही नारायण सांगलीकर (५४) व विजय नान तिरकी (३०) यांनी शिक्षेवर स्थगिती व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दोघांचेही अर्ज फेटाळून त्यांना दणका दिला. परिणामी, साईबाबाच्या अर्जाचे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Web Title: The Maoist Saibaba is in the high court for the bail
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.